Yuzvendra Chahal Special Birthday Surprise Video: युझवेंद्र चहलने २३ जुलै रोजी त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. त्याला सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि त्याच्या मित्र परिवाराने भरभरून शुभेच्छा दिल्या. पण याशिवाय चहलला त्याच्या वाढदिवशी एक स्वप्नवत सरप्राईज मिळालं. ज्याचा व्हीडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर करत गेल्या ३ दशकांतील माझ्या वाढदिवसाचं पहिलं सरप्राईज असल्याचं त्याने म्हटलं आहे. आरजे महावशने त्याला हे सरप्राईज दिल्याची चर्चाही रंगली आहे.

युझवेंद्र चहल सध्या लंडनमध्ये असून तो काऊंटी क्रिकेट खेळत आहे. नॉर्थम्पटनशायर संघाकडून खेळत असल्याने त्याने लंडनमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवशी त्याला मिळालेल्या छान सरप्राईजने तो भावुक झाला होता.

युझवेंद्र चहलला वाढदिवसाचं खास सरप्राईज

लंडनच्या रस्त्यावर चहल त्याच्या मित्राबरोबर उभा होता आणि तितक्यात एका मुलीने त्याला हात धरून पुढे आणलं. तिने चहलच्या हातात गुलाब देत त्याला उभं केलं. तितक्यात डान्सरच्या एका ग्रुपने बॉलीवूड गाण्यावर डान्स करायला सुरूवात केली. चहल हे पाहून एकदम चकित झाला. यानंतर डान्स करताना त्या ग्रुपने त्याला मध्ये बोलावत त्याच्याभोवती गोल करत डान्स करायला सुरूवात केली आणि चहलला चियर करत डान्स करायला लावलं.

चहल त्या ग्रुपचा डान्स बघून व्हीडिओमध्ये भावूक झाल्याचही पाहायला मिळत आहे. दरम्यान त्या डान्स करणाऱ्या ग्रुपने पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट घातलं होतं. त्या टीशर्टवर मागे हॅपी बर्थडे शब्दाचं प्रत्येक अक्षर इंग्रजीत लिहिलेलं आहे. याशिवाय डान्सनंतर या ग्रुपने चहलबरोबर फोटोही काढला.

चहलने या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “आम्हा मुलांचं संपूर्ण आयुष्य वाढदिवस साजरा न करताच कधी कधी निघून जातं. गेल्या ३ दशकांतील हे माझं पहिलं बर्थडे सरप्राईज आहे आणि जे भन्नाट आहे. सगळं घडत असताना जणू जगच फिरतंय असं वाटत होतं! सुन्न झालो होतो, भारावलो होतो… पण खूप आभार. आपल्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी प्रयत्न करणारे मित्र सर्वांना भेटू दे. हे असं काही खरंच घडलंय हे मी अजूनही पचवायचा प्रयत्न करतोय!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चहलची कथित गर्लफ्रेंड आरजे महावश हिने चहलसाठी हे बर्थडे सरप्राईज केल्याचं चाहते म्हणत आहेत. आरजे महावशदेखील सध्या लंडनमध्ये आहे. याशिवाय चहलच्या वाढदिवसाच्या पार्टीला देखील ती उपस्थित होती. त्याच्या वाढदिवसानिमित्त आरजे महावशने कोणीही न पाहिलेला खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.