अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा मुंबई संघात परतले
वानखेडे स्टेडियमवर ६ फेब्रुवारीपासून रणजी विजेत्या मुंबई संघाची इराणी चषक जेतेपदासाठी लढत रंगणार आहे ती शेष भारत संघाशी. महिन्याच्या प्रारंभी पायाच्या पोटरीला झालेल्या दुखापतीतून वेगवान गोलंदाज झहीर खान अद्याप सावरला नसल्याने मुंबईच्या संघात त्याचा समावेश करण्यात आलेले नाही. तथापि, भारतीय संघातून इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणारे अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा मुंबईच्या संघात परतले आहेत.
‘‘झहीर अजूनही बरा झालेला नाही. तो मैदानावर पुन्हा परतण्यासाठी तीन आठवडे आणखी लागतील,’’ अशी माहिती निवड समितीच्या बैठकीनंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव नितीन दलाल यांनी दिली.
डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या गुजरातविरुद्धच्या अखेरच्या रणजी साखळी सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज झहीरच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे मुंबईच्या बाद फेरीच्या तिन्ही सामन्यांमध्ये झहीरला खेळता आले नव्हते. चेन्नईमध्ये २२ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिल्या काही सामन्यांना झहीर मुकण्याची शक्यता आहे.
सोमवारी मुंबईने सौराष्ट्रचा एक डाव आणि १२५ धावांनी पराभव करून ४०व्यांदा रणजी विजेतेपदाला गवसणी घातली. या संघातील निखिल पाटील (ज्यु.) आणि सुशांत मराठे यांच्या जागी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती दलाल यांनी दिली.
मुंबईचा संघ : अजित आगरकर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वासिम जाफर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, कौस्तुभ पवार, अभिषेक नायर, हिकेन शाह, आदित्य तरे (यष्टीरक्षक), अंकित चव्हाण, जावेद खान, शार्दुल ठाकूर आणि विशाल दाभोळकर.