झिम्बाब्वेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त खोटे असल्याचे समोर आले आहे. माजी गोलंदाज हेन्री ओलोंगा यांनीच सकाळी त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती. परंतु, आता त्यांनी पुन्हा ट्वीट करून हीथ स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली आहे.

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक याचं कर्करोगाशी लढताना निधन झाल्याचे वृत्त पसरले होते. माजी क्रिकेटपटू आणि हीथ स्ट्रीक यांचे मित्र हेन्री ओलोंगा यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यांच्या ट्वीटनंतर अवघ्या क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. जगभरातील प्रसिद्धी माध्यमांनी हीथच्या मृत्यूची बातमी दिल्यानंतर आता हीथ स्ट्रीक जिवंत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह सर्वांनाच सुखद धक्का बसला आहे. ओलोंगा यांनी एका चॅटचा स्क्रीनशॉट ट्वीट केला असून त्यात तो जिवंत असल्याचं सांगण्यात आलं आहे. ओलोंगा यांनी आधीचं ट्वीट डिलिट केले आहे.

“हीथ स्ट्रीकच्या निधनाचे वृत्त अफवा आहे. मी त्याच्याकडूनच जाणून घेतले आहे. तो जिवंत आहे”, असं ट्वीट ओलोंगा याने केलं आहे. यासोबत त्याने हीथसोबतचे चॅट ट्वीट केले आहे.

झिम्बाब्वेच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या स्ट्रीकने २००० ते २००४ दरम्यान आपल्या देशाचे नेतृत्व केले. त्याच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ६५ कसोटी सामने आणि १८९ एकदिवसीय सामने खेळलेत. झिम्बाब्वेच्या क्रिकेटची प्रतिष्ठा देखील काही वेळा त्याने एकट्यानेच राखली. झिम्बाब्वेकडून कसोटी सामन्यांत १०० विकेट घेणारा तो एकमेव क्रिकेटर आहे.

स्ट्रीकची गोलंदाजी कौशल्ये ही त्याची संपत्ती होती, पण तो बॅटींगमध्येही कमी नव्हता. हरारे येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने नाबाद १२७ धावा केल्या, हे त्याचे एकमेव कसोटी शतक आहे.

स्ट्रीकच्या कारकिर्दीची सुरुवात १९९३ मध्ये त्याच्या पाकिस्तानविरुद्धच्या पदार्पणाने झाली. २००५ मध्ये त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीनंतर, स्ट्रीक झिम्बाब्वे, स्कॉटलंड, बांग्लादेश, गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना प्रशिक्षण देत होते. भ्रष्टाचारविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली होती. तेव्हा त्याची कारकीर्द धुळीला मिळाली.