आशिया चषकाची तयारी म्हणून आयोजित झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेतल्या दुसऱ्या लढतीत श्रीलंकेचा धक्कादायक पराभव झाला. आयसीसीच्या टी२० क्रमवारीत झिम्बाब्वेचा संघ १२व्या स्थानी आहे तर श्रीलंकेचा सातव्या. पहिल्या टी२० लढतीतही झिम्बाब्वेचा संघ श्रीलंकेला दणका देण्याच्या तयारीत होता. मात्र दिलशान मधुशनकाच्या हॅट्ट्रिकमुळे श्रीलंकेने निसटता विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र सर्वांगीण खेळाच्या जोरावर झिम्बाब्वेने श्रीलंकेला ५ विकेट्सनी धूळ चारली.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीचा नूर ओळखून सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. जबरदस्त फॉर्मात असलेला पाथुम निसांका ८ धावा करुन तंबूत परतला. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध कुशल मेंडिस एका धाव करू शकला. कर्णधार चरित असालंकाकडून श्रीलंकेला मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र तो १८ धावा करुन माघारी परतला. कामिंदू मेंडिसला भोपळाही फोडता आला नाही. अनुभवी दासून शनकाने १५ धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनाही मोठी खेळी करता आली नाही आणि १७.४ षटकात श्रीलंकेचा डाव ८० धावांतच गडगडला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा आणि ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. ब्लेसिंग मुझाराबानीने २ विकेट्स घेत या दोघांना चांगली साथ दिली.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रायन बेनेट आणि ताडीवानाशे मारुमानी यांनी २० धावांची सलामी दिली. मात्र यानंतर हे दोघेही तंबूत परतले. अनुभवी शॉन विल्यम्स शून्यावरच बाद झाला. दुश्मंत चमीराने सिकंदर रझाला त्रिफळाचीत करत झिम्बाब्वेला अडचणीत टाकलं. मात्र रायन बर्लने किल्ला लढवला. त्याला ताशिंगे मुसेकिवाने साथ दिली. बर्लने २२ चेंडूत २० तर मुसेकिवाने १४ चेंडूत २१ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. झिम्बाब्वेच्या विजयासह मालिका १-१ स्थितीत आहे. तिसरा आणि अंतिम सामना रविवारी होणार आहे.