संहिता, दिग्दर्शन, पात्रांचा अभ्यास, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजना यांचा एकदा का नाद लागला की नंतर तो सोडवत नाही. मग घर सुटतं. मित्र-मैत्रिणी दुरावतात. प्रसंगी आई-वडिलांचा रोषही ओढवून घ्यावा लागतो. पण तोही सोसत नाटकाची तालीम सुरूच राहते. अगदी रात्री उशिरापर्यंत. मग हे असं रोजच.. नाटकाशी जमलेली ही गट्टी ९८व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनापर्यंत कायम राहिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संमेलनात व्यवस्थापक, अभिनेते, दिग्दर्शक, नेपथ्यकार, अशा अनेक भूमिका चोख बजावल्या.. अशा या उगवत्या नाटय़दासांविषयी सांगताहेत भाग्यश्री प्रधान.

वैचारिक बैठक

रंगभूमीवर विविध धाटणीचे विषय आणणे महत्त्वाचे आहे. ही वैचारिक बैठक ‘शिकस्ते इश्क’ या नाटकातून मिळते. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीच्या प्रगल्भतेसाठी पडलेले हे एक पाऊल आहे. प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ असो किंवा प्राजक्त देशमुख दिग्दर्शित ‘देवबाभळी’, या व्यावसायिक नाटकांमध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद आहे. प्रायोगिक नाटकांमध्येही खूप वेगळे विचार मांडता येतात. ते स्वत:चे विचार असतात त्यात व्यावसायिक गणितं नसतात. अशा प्रायोगिक नाटकांनाही निर्मात्यांनी पाठिंबा द्यावा. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक प्रयोग पाहता येतील. नाटय़संमेलनातून खूप काही शिकता आले, असे सिद्धार्थ साळवी सांगतो.

गावाकडची नाटय़ऊर्जा

महाविद्यालयात प्रथम वर्षांत शिकणाऱ्या नम्रताला नाटकापायी घरातून थोडी बोलणी खावी लागलीच. नाटकाच्या तालमीला जातेय, असं तिनं फक्त आईला कळवलं. पण ते तितकं पुरेसं नव्हतं. सुरुवातीला घरातून होकारच आला. पण जसा तालमींना उशीर होऊ लागला तसा नम्रताला आईशिवाय बाबांचाही ओरडा खावा लागला. पण घरात रोज आईबाबांनी ओरडायचं आणि नम्रताने तो ओरडा खायचा, हे नाटय़ रोजच रंगू लागलं. पुढेपुढे नम्रता नाटकाच्या सर्व जबाबदाऱ्यांमध्ये बुडून गेली. यापेक्षा नम्रताच्या महाविद्यालयाच्या एक कोपरा नाटय़मय होऊन गेला. तिच्यासोबतचे इतर विद्यार्थी-विद्यार्थिनी कलासक्त होतेच. जिथे वाव मिळाला तिथे तेही घुसले. लेखकाने लिहून दिलेली संहिता हातात पडल्यापासून ते स्पर्धेच्या प्रयोगाची तिसरी घंटा होईपर्यंत त्यांची जय्यत तयारी साऱ्यांनी मिळून केली. पूर्वी हे सारे फक्त मुंबई आणि पुणे शहरांपर्यंत मर्यादित होते. मात्र या स्पर्धामध्ये गावागावातील तरुण पुढे आले. या साऱ्यांनी नाटय़संमेलनाच्या तीन दिवसांत रंगभूमीची सेवा केली.

रंगकर्मीच व्यवस्थापक

कालिदास परिसर सजवणे, विविध कार्यक्रमांचे योग्य नियोजन करणे, कार्यक्रम वेळेत सुरू करणे, सुरक्षा सांभाळणे, रंगमंचावरील व्यवस्थेसाठी मदत करणे या सर्वच गोष्टी सातत्याने ६० तास सांभाळायच्या होत्या. यात डहाणूकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कालिदास नाटय़गृहाच्या बाहेरील परिसर सजवला. तसेच बाकी सर्वच व्यवस्था तरुण रंगकर्मीच्या मदतीने कामगार रंगमंच या संस्थेने सांभाळल्याचे रत्नकांत जगताप आणि विजय गोळे सांगतात. मुळातच कामगार रंगमंचाला अशा प्रकारचा कार्यक्रम व्यवस्थापनेसाठी देणे हा तरुण निर्माते प्रसाद कांबळी यांचा निर्णय होता. या संमेलनात २५० जणांकडे काम करण्याची प्रचंड ऊर्जा होती. या सर्वानाच रंगमंचावर काम करण्याची सवय असल्यामुळे काम करणे सोपे झाले. २५० जणांचे एकूण १० समूह करण्यात आले होते. प्रत्येकाला दहा तास काम करायचे होते. यात आरामाचाही हेतू होता. समारोप, उद्घाटन आणि दिंडीच्या कार्यक्रमांना मात्र सगळ्यांची उपस्थिती अनिवार्य केली होती.

‘आरादी’तून आराधना

‘झाडेपट्टी’ या नाटक प्रकारातील ‘आरादी’ हे नृत्य रात्री १२ वाजता सुरू झाले. १८ मिनिटांच्या या नृत्याने रसिकांवर गारूड केले. या नाटय़चमूत काही महाविद्यालयीन तरुण आहेत. त्यातील काही जण संशोधक आहेत, असे अनुप खोत सांगतो. मुळातच ‘आरादी’ हे नृत्यदेवीची आराधना करणारे आहे. पारंपरिक कलेचा गाभा म्हणजे हे नृत्य. ही नृत्यकला भविष्यातही जिवापाड जपणे हीच सर्वाची भावना आहे. त्यासाठी अनेक राज्यांत ‘आरादी’ सादर केले जाते, असे अनुप म्हणाला.

एकांकिकेचा पडदा उघडला

आजूबाजूच्या कहाण्या ऐकण्यापेक्षा, कहाण्या खऱ्या आहेत हे समजण्यापेक्षा इतिहास पुन्हा पुन्हा वाचा. जे बघितले नाही जे ऐकले नाही ते ऐकून घेण्याची, बघण्याची ताकद ठेवा. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. म्हणून कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा संदेश देणाऱ्या ‘इतिहास गवाह है’ या एकांकिकेद्वारे उत्तम कलाकृती रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरली. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही एकांकिका सादर केली. चित्र, नृत्य, संगीत, प्रकाशयोजना आणि व्यवस्थापन असे कला पैलू रंगभूमीवर अवतरले होते.