ऋषीकेश मुळे, भाग्यश्री प्रधान

‘लोकसत्ता लोकांकिका’ २०१८ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची तिसरी घंटा झाली आणि राज्यातील विविध महाविद्यालयांनी एकांकिकेच्या माध्यमातून समाजात घडलेल्या घटनांचा पडदा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रंगमंचावर उघडलेला पाहायला मिळाला. तरुणांनी मनातील विचार नाटय़कलाकृतीद्वारे सादर करून समाजातील घटनांचा आढावा प्रेक्षकांसमोर मांडला. चौकटीबाहेरच्या एकांकिका विविध महाविद्यालयांनी सादर केल्या. कधी ते राजकीय घडामोडींवर व्यक्त झाले तर कधी एखादा ‘बोल्ड’ विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. या सादरीकरणातील विषयातून तरुणांमध्ये असलेली सामाजिक जाणीव प्रकर्षांने जाणवली, असे मत या स्पर्धाचे परीक्षण करणाऱ्या परीक्षकांनी सांगितले. वेगवेगळ्या केंद्रांवर पार पडलेल्या एकांकिकांमध्ये नेमके काय विषय हाताळले गेले त्याचा हा आढावा.

मुंबई

पंढरपूरमधील वारीमध्ये चालणाऱ्या अनागोंदी कारभारावर भाष्य करणारी ‘देव हरवला’ ही एकांकिका सिद्धार्थ महाविद्यालयाने सादर केली. आज देवाच्या नावाखाली पैशांची लूट होते. यामुळे देवासह माणसातली माणुसकी लोप पावल्याचे एकांकिकेद्वारे दाखवण्यात आले आहे. नाटय़कलाकृतीद्वारे मनातील भावना व्यक्त करता येते. महाविद्यालयाीन तरुण चांगला विचार करत असतात. मात्र आजकाल तरुण स्वत:मध्येच मग्न असतात, असे हिणवले जाते. त्याला ‘देव हरवला’ ही एकांकिका चांगले उत्तर असल्याचे या एकांकिकेतील कलाकार सुमेध उन्हाळेकर याने सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असणाऱ्या राजकीय युद्धांमुळे सामान्य नागरिकांना कसे बळी पडावे लागते यावर म. ल. डहाणूकर महाविद्यालयाने ‘पैठणी’ एकांकिका सादर केली.

ठाणे

अवनी वाघीण नागरिकांसाठी कशा प्रकारे धोकादायक आहे, असे दाखवून तिच्या अधिकृतरीत्या करण्यात आलेल्या हत्येचा संदर्भ घेत वाढत्या बांधकामामुळे जंगलाचा होणारा ऱ्हास आणि वाघांचे नष्ट होणारे अस्तिव यावर भाष्य करणारी ‘वाघोबा’ ही एकांकिका गोवेलीच्या जीवनदीप महाविद्यालयाने सादर केली. महामानवांना जातीच्या चौकटीत अडकवून तरुणांमध्ये असंतोष निर्माण करून उदयास येणारा आरक्षणवाद यावर भाष्य करणारी ‘चौकट’ एकांकिका ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने सादर केली.

ज्या गोष्टींचा तरुण पिढी विचार करत नव्हती, त्या गोष्टी आता एकांकिकांच्या माध्यमातून सादर होत आहेत. एकांकिकेतील तरुण मुले आरक्षणाविषयीच्या बातम्या रोज पाहायचे. त्यामुळे तरुणही जातीयवादी आणि धर्मवादी होऊन कसा चिरडला जातो, अशी एकांकिका करण्यासाठी सगळ्यांनीच होकार दिला. यासारखे महत्त्वाचे विषय फक्त एकांकिकांपुरतेच मर्यादित न ठेवता त्याचे आचरण रोजच्या जीवनातही होईल याची आशा असल्याचे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘चौकट’ एकांकिकेचा दिग्दर्शक मनीष साठय़े याने सांगितले.

कोल्हापूर

कलाभान जागवणाऱ्या तरुणाईच्या उत्साही वातावरणात कोल्हापूरच्या देवी पार्वती महाविद्यालयाने ‘तुझ्या शब्दात सांगायचं तर’ या एकांकिकेमध्ये महिलांवरील अत्याचारांची मांडणी केली. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमाच्या आहारी गेलेल्या तरुणाईवर प्रकाश टाकला. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील आर. आर. पाटील महाविद्यालयाने जन्म , मृत्यू आणि मानवाचे अस्तिव यांचा वेध एकांकिकेच्या माध्यमातून घेतला.

नाशिक

हिंदू आणि मुस्लीम धर्मावर भाष्य करणारी कथा नाशिकच्या बी.वाय.के. वाणिज्य महाविद्यालयाने ‘तुकाराम डाऊनलोडिंग’ या माध्यमातून मांडली. नवीन गाडी घेऊन देण्याआधी एकांकिकेतील नायकाला ‘संत तुकाराम’ समजावून घेण्याची अट नायकाचे आजोबा घालतात. गुगल, फेसबुक अशा समाजमाध्यमांवर, नवीन पिढीच्या रॅप संस्कृतीतून तुकारामाच्या डाऊनलोडिंगचा नायकाचा तोडका प्रयत्न सुरू होतो. त्याचे आजोबाही मुस्लीम मुलीला सून म्हणून स्वीकारतात. चांगल्या कामाची कोणी दाद दिल्यास कौतुक घेऊन बसू नये तर पुढे जायला हवे, रोजच्या जीवनातील अनुभवण्यास येणारे प्रसंग हे एकांकिका खुलवतात, हाच मुद्दा घेऊन ‘तुकाराम डाऊनलोडिंग’ एकांकिका करण्यात आल्याचे या एकांकिकेची लेखिका प्रिया जैन हिने सांगितले. झोपलेल्या जाणिवा घेऊन जगणाऱ्या शहरावर, समाजावर भाष्य करणारी एकांकिका मुक्त विद्यापीठाच्या ‘जब शहर हमारा सोता है’ या माध्यमातून मांडली. डोळ्यावर पट्टी बांधून नियमांचे उल्लंघन करणारे शहरवासीय, सगळे झोपल्यावर जागी होणारी वेश्यावस्ती, त्यांच्या नाइलाजाकडे दुर्लक्ष करणारे शहर, समाजातील ‘ऑनर किलिंग’सारखे दुर्दैवी प्रकार, त्यावर दोन पिढय़ांमधील मतभेद याभोवती एकांकिकेची कथा फिरत असते.

औरंगाबाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नृत्य विभागातर्फे ‘मादी’ ही एकांकिका सादर करण्यात आली. या एकांकिकेत माणूस आणि जनावर यांच्या नातेसंबंधावर भाष्य करण्यात आले आहे. जनावरेदेखील माणसांसारखीच असतात. त्यांनाही भावना असते. अवनी वाघिणीची कथा या एकांकिकेत मांडण्यात आली आहे. दुष्काळामुळे शेतीतून काही उगवत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे हाल होतात. अशा वेळेस तो एक म्हैस विकत घेतो, त्यावरच त्याची उपजीविका चालत असते. पुढील काळात फक्त दुभते प्राणीच माणसाला तारू शकतात, असा संदेश देणारी ‘लाली’ ही एकांकिका अहमदनगरच्या न्यू कॉलेजने सादर केली.

रत्नागिरी

समाजात रोज दिसणाऱ्या विविध गोष्टींवर भाष्य करणाऱ्या एकांकिका रत्नागिरी विभागात सादर झाल्या. गावात दुष्काळामुळे असाहाय्य झालेल्या विधवा महिलेच्या लढय़ाला समाजातील सज्जन आणि नियतीने दिलेली साथ यावर भाष्य करणारी ‘फुगडी’ एकांकिका सिंधुदुर्ग येथील स. ह. केळकर महाविद्यालयाने सादर केली. चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाने राजकीय हेतूने केल्या जाणाऱ्या आंदोलनांमुळे रोजंदारीवर जगणाऱ्या कुटुंबाची होणारी परवड ‘बंद आहे’ या एकांकिकेतून सादर केली. लोककलेच्या जपणुकीच्या प्रयत्नामध्ये परंपरा आणि व्यवहार यातील संघर्ष गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने ‘नमन’च्या माध्यमातून उभा केला, तर उत्तम साहित्यनिर्मिती करण्याच्या नादात व्यवहाराचे भान सुटलेला लेखक आणि भक्कम आर्थिक स्थर्याशिवाय जीवन निर्थक मानणरी त्याची पत्नी, यांच्यातील टोकाचा भावनिक संघर्ष दाखवणाऱ्या ‘शब्द’ने आदिती चव्हाण या युवा कलाकाराच्या प्रगल्भ अभिनयातून वेगळीच उंची गाठली.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील महाविद्यालयांनी चालू घडामोडींवर आधारित संहिता घेऊन एकांकिका सादर केल्याचे पाहायला मिळाले. रत्नागिरी तसेच आजूबाजूच्या परिसरात ‘नमन’ या लोककलेला महत्त्व होते. मात्र या कलेतून पोटाची भूक भागेनाशी झाली. आणि या कलेचा ऱ्हास झाला. सध्या ही कला सादर करणारी मंडळी शहरात जाऊन आपले बस्तान मांडत असल्याचे ‘नमन’ एकांकिकेतील कलाकार शैलेश इंगळे सांगतो. मुळातच ही कलाकृती सादर झाल्यानंतर ‘नमन’ या एकांकिकेत काम करणाऱ्या कलाकारांच्या पालकांनीदेखील उत्तम विषय मांडल्याचे सांगत, या एकांकिकेमुळे भूतकाळात गेल्याचे त्यांनी सांगितले. ‘नमन’ ही लोककला बंद झाल्याची खंत व्यक्त केली.

पुणे

व्यक्तीच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची सांगड ही सामाजिक विषयांशी घालून दर्जेदार एकांकिका पुणे विभागात सादर झाल्या. सध्याच्या काळात लेखकाचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य कशा प्रकारे धोक्यात येत आहे यावर भाष्य करणारी ‘अफसाना’ ही एकांकिका मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाने सादर केली. मंटोंच्या लिखाणावर कशा प्रकारे गदा येत होती, त्याविरोधात त्यांनी कसा लढा दिला याचे चित्रण आजच्या परिस्थितीला जोडून ‘अफसाना’ या एकांकिकेची मांडणी करण्यात आली आहे. मॉडर्न महाविद्यालयाने ‘फेरी टेल’ या एकांकिकेच्या माध्यमातून सध्याच्या शिक्षणव्यवस्थेवर परखड भाष्य केले आहे. परीक्षेत नेहमीच अव्वल येणाऱ्या मुलीचे वडील परीक्षेच्या बोर्ड विभागात उच्च पदावर कार्यरत असतात, मात्र त्याच वडिलांवर पैशांकरिता पेपरफुटीचा गुन्हा दाखल होतो, या सर्व कथानकाला एकत्र करत आजच्या ढिसाळ शिक्षणव्यवस्थेची करुण कहानी ‘फेरी टेल’ या एकांकिकेच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. स्त्रीकडे सध्या समाज कशा पद्धतीने पाहतो, तिला समाजात कशा प्रकारे वागणूक मिळते याची कथा सांगणारी ‘आशा’ ही एकांकिका फग्र्युसन महाविद्यालयाने सादर केली.