आशुतोष बापट

शनिवार

खान्देशी संस्कृती जपणारे धुळे ऐतिहासिकदृष्टय़ासुद्धा प्रसिद्ध आहे. धुळ्याशेजारी असलेल्या सोनगीर किल्ल्यावर जावे. अगदी छोटेखानी किल्ला आहे. चढायला १० मिनिटे लागतात. तटबंदी सुंदर आहे. तिथून पुढे ३५ कि.मी. वर असलेल्या मेथी गावी जावे. विष्णू मंदिर आणि त्याशेजारी असलेले लक्ष्मी मंदिर खूप सुंदर आहे. विष्णूची वैकुंठ रूपातली महाराष्ट्रातली एकमेव मूर्ती इथे पाहायला मिळते. तिथून पुढे बलसाणे गावी जावे. ४ मंदिरांचा समूह आहे. त्यातल्या एका मंदिराला मठ असे म्हणतात. मंदिराचे वैशिष्ठय़ म्हणजे येथे सभागृहात १२ खोल्या आहेत. सगळा प्रवास सुंदर आहे. आजूबाजूला झाडी आणि शेती आहे. धुळ्याला परत आल्यावर राजवाडे संशोधन संस्था, त्यांचे संग्रहालय पाहावे. तसेच समर्थ वाग्देवता संस्था पहावी.

रविवार

धुळ्यावरून ८ किमीवरील लळिंग किल्ल्यावर जावे. लळिंग गावातून पाण्याच्या टाकीशेजारून किल्ला चढायला अर्धा तास पुरतो. तटबंदी सुंदर आहे. अप्रतिम निसर्गसौंदर्य दिसते. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठय़ा प्रमाणात आहेत. एका पाण्याच्या टाक्यात पुन्हा ६ टाक्या खोदलेल्या दिसतात. किल्ला उतरून मालेगावच्या दिशेला जावे. पुढे १५ कि.मी. वर झोडगे गाव लागते. डाव्या हाताला माणकेश्वर महादेवाचे अतिशय अप्रतिम प्राचीन मंदिर आहे. मंदिर स्थापत्यानुसार हे भूमिज मंदिर आहे. मंदिरावरील शिल्पकाम निव्वळ देखणे आहे. महादेवाच्या विविध मूर्ती आणि सुरसुंदरींचे शिल्पांकन पाहण्याजोगे आहे. तसेच मंदिराचे स्थापत्यसुद्धा देखणे आहे. या मंदिराचे शिखर पाहिले की रतनवाडीतल्या अमृतेश्वर मंदिराची आठवण होते.

ashutosh.treks@gmail.com