आसिफ बागवान

‘टेक्नो’चा ‘कॅमन आय४’ हा अँड्रॉइडची अद्ययावत आवृत्ती आणि तीन कॅमेरे यांमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरतो. सध्या फारच कमी स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस तीन कॅमेऱ्यांचा पर्याय मिळतो. ज्या स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेरे आहेत, ते सगळे उच्च किंमत श्रेणीतील आहेत. मात्र, ‘कॅमन आय४’ची किंमत दहा हजार रुपयांपेक्षा कमी असल्याने तो सर्वसामान्यांनाही परवडण्यासारखा आहे. परंतु, खरंच हा फोन खरेदी करावा का?

स्मार्टफोनमध्ये कॅमेरा हा घटक नेहमीच महत्त्वाचा समजला जातो. कॅमेरा किती दर्जेदार असेल यावर फोनची पसंती ठरते. त्यामुळेच जास्तीत जास्त मेगापिक्सेलचे कॅमेरे असलेले स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी नंतर ‘डय़ुअल कॅमेरा’ अर्थात दोन कॅमेरे असलेल्या स्मार्टफोनच्या निर्मितीवर भर दिला. छायाचित्रण करताना समोरच्या दृश्याची ‘डेप्थ’ही स्पष्टपणे टिपता यावी, यासाठी दोन कॅमेऱ्यांचा संगम करण्यात आला. सुरुवातीला ही सुविधा उच्च किंमत श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये पुरवण्यात आली. पण अवघ्या काही वर्षांतच आता सहा-सात हजार रुपयांत मिळणारे स्मार्टफोनही डय़ुअल कॅमेऱ्याचे बिरूद मिरवताना दिसतात. त्यामुळे ‘डय़ुअल कॅमेऱ्या’च्या पुढे काय, असा प्रश्न निर्माण झाला. सॅमसंगने तीन कॅमेरा लेन्स असलेला स्मार्टफोन बाजारात आणल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर मिळाले. सध्या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे असलेले फोन हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. मात्र, ‘टेक्नो’ कंपनीने गेल्याच आठवडय़ात ‘कॅमन आय४’ हा स्मार्टफोन बाजारात आणून या पंक्तीत स्थान मिळवले आहे. तीन कॅमेरे असलेल्या या फोनची किंमत मात्र, साडेनऊ हजार रुपये आहे. त्यामुळे ‘कॅमन आय ४’ची चर्चा बाजारात जोरात सुरू आहे.

भारत ही स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ असल्याने जगभरातील कंपन्यांचा त्यावर डोळा आहे. या बाजारपेठेतील थोडासा टक्का तरी आपल्या वाटय़ाला यावा, यासाठी साऱ्यांचेच प्रयत्न सुरू असतात. बहुतांश भारतीय ग्राहक अजूनही स्मार्टफोनसाठी १५ हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करू इच्छित नाहीत किंवा ते करणे त्यांना शक्य नसते. अशावेळी १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोन तयार करून विकणाऱ्या कंपन्यांची सतत चढाओढ सुरू असते. या शर्यतीत ‘टेक्नो’ ही कंपनी आघाडीवर आहे. मोठमोठय़ा कंपन्यांच्या महागडय़ा ‘फ्लॅगशिप’ स्मार्टफोनमध्ये असलेली वैशिष्टय़े उचलून तशाच वैशिष्टय़ांनी युक्त असे स्वस्त स्मार्टफोन तयार करण्यावर ‘टेक्नो’ने नेहमीच भर दिला आहे. त्यामुळे तीन कॅमेरे असलेला ‘कॅमन आय४’ बाजारात येतो, तेव्हा आश्चर्य वाटत नाही.

या फोनमधील अन्य वैशिष्टय़ांकडे वळण्यापूर्वी त्याच्या कॅमेऱ्याबाबतच चर्चा करायला हवी. ‘कॅमन आय ४’मध्ये १३+८+२ अशा मेगापिक्सेलचे तीन कॅमेरे मागील बाजूस आहेत. यातील १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा हा मुख्य कॅमेऱ्याचे काम करतो. आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा ‘वाइड फ्रेम’ अर्थात विस्तीर्ण दृश्य टिपण्यासाठी उपयुक्त आहे तर, दोन मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा पाश्र्वभूमी आणि छायाचित्रणाचा विषय यांच्यातील खोलीत स्पष्टपणा आणण्यासाठी मदत करतो. आम्ही या फोनमधून छायाचित्रण केले असता, तिन्ही कॅमेरे आपली भूमिका योग्यपणे बजावत असल्याचे दिसले. आऊटडोअर अर्थात सूर्यप्रकाशातील छायाचित्रणात या कॅमेऱ्यांची कामगिरी अचूक आहे. मात्र, कमी उजेडातील छायाचित्रणाच्या बाबतीत ‘कॅमन आय ४’चा कॅमेरा थोडा उणा पडतो. या कॅमेऱ्यांमध्ये ‘एआर स्टिकर’, ‘बोके मोड’ या सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. त्या व्यवस्थित काम करतात. पुढील बाजूस असलेला १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा चांगला सेल्फी मिळवून देतो. एकूणच, ‘कॅमन आय ४’चा कॅमेरा काही बाबतीत उजवा असला तरी, तो तुम्हाला ‘डिजिटल’ छायाचित्रणाचा पूर्ण आनंद देईल, याची खात्री देता येणार नाही. मात्र, या फोनची तुलना ५०-६० हजार रुपयांच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याशी किंवा २५ हजारांपेक्षा अधिक किमतीच्या डिजिटल कॅमेऱ्यांच्या छायाचित्रणाशी करणे चुकीचे ठरेल.

‘कॅमन आय ४’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, यामध्ये अँड्रॉइडची अद्ययावत अर्थात ९.० ही आवृत्ती पुरवण्यात आली आहे. या आवृत्तीनुसार अँड्रॉइडच्या कार्यप्रणालीत असलेले बदल आपल्याला दिसून येतील. या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्टय़ांकडे नजर टाकल्यास त्यात फारसे सांगण्यासारखे काही नाही. ‘डॉट नॉच डिस्प्ले’, ६.२ इंचाची स्क्रीन, ७२० बाय १५२० रेझोल्युशनचा डिस्प्ले स्मार्टफोनची दर्शनी बाजू व्यवस्थित सांभाळतात. कामगिरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर या फोनमध्ये क्वाड कोअर प्रोसेसर असून दोन आणि चार जीबी रॅमचे पर्याय देण्यात आलेले आहेत. दोन्ही फोन रॅमच्या क्षमतेनुसार व्यवस्थित काम करतात. यात ३२ जीबीची अंतर्गत स्टोअरेज पुरवण्यात आली असून ती मेमरी कार्डने वाढवताही येते. या फोनमध्ये ३५०० एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली असून त्याला ‘एआय पॉवर मॅनेजमेंट’ सुविधेची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे फोन लवकर चार्ज होतो. अवघ्या दहा मिनिटांच्या चार्जिगने हा फोन दोन तास सहज काम करू शकतो.

‘कॅमन आय ४’ अनेक बाबतीत आपल्या किंमत श्रेणीतील स्मार्टफोनपेक्षा उजवा ठरतो. तीन कॅमेरे हे याचे प्रमुख कारण आहे. मात्र, म्हणून तो परिपूर्ण आहे, असेही म्हणता येत नाही. अर्थात दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फोनमध्ये थोडे उणे आणि थोडे दुणे दिसणारच. ‘कॅमन आय ४’मध्ये उणे आणि दुणे समान आहेत, हेच त्याचे वैशिष्टय़.