राजेंद्र श्रीकृष्ण भट

ज्या झाडांना काटे असतात, त्यांना उन्हाची जास्त गरज असते. गुलाबाच्या झाडांना जेवढे ऊन मिळेल, तेवढी त्यांची वाढ चांगली होते आणि जेवढी चांगली वाढ होते, तेवढी जास्त फुले येतात. गुलाबाचा प्रकार कोणताही असो, सर्व गुलाबांना नेहमीच नवीन फांदीवर फुले येतात. स्थानिक गुलाबाच्या झाडाच्या जून फांदीपासून रोप तयार करता येते. अशी रोपे तयार करण्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर करावे.

गॅलरीत गुलाब लावताना फ्लोरिबंडा किंवा मिनिएचर गुलाब लावावेत. हायब्रिड गुलाब गच्चीत लावण्यासाठी उत्तम असतात. कलमे करताना त्यांचा डोळा भरलेला असतो. या भरलेल्या डोळ्यातून गुलाबाचे झाड वाढते. या डोळ्याच्या खालच्या बाजूस मूळ काडी फुटते. ही फूट वेळोवेळी काढावी लागते. या फांद्या कुंडीत लावताना नवीन रोप ९० अंशांच्या कोनात येईल, अशा अंदाजाने, म्हणजेच थोडय़ा तिरक्या लावाव्यात. फुले कापताना फांदीही कापावी. पानांचे निरीक्षण करावे. पाच संयुक्त पाने आणि सात संयुक्त पाने अशी रचना असते. ५ संयुक्त पानांपर्यंत फांदी कापावी.

गुलाबांवर अनेक प्रकारचे कीटक येतात. पानांवर केसाळ अळ्या दिसतात. त्या चिमटय़ाने काढाव्यात. फांद्यांना ढेकणांसारखे दिसणारे खवले किडे असतात. ते जुन्या टूथब्रशने काढावेत. शक्यतो रासायनिक कीटकनाशके फवारू नयेत. त्यांचा घरातील व्यक्तींना त्रास होतो. एक लीटर पाण्यात कपभर गोमूत्र मिसळून बुरशीनाशक, कीडनियंत्रक आणि अन्नद्रव्य पुरवठा अशी तिन्ही कामे करते.

कीड जास्त असेल, तर मिरची आणि लसणाची चटणी पाण्यात मिसळून फवारावी. काही वेळा पिठय़ा ढेकूण म्हणजेच मिली बग आढळतात. त्यावर उपाय म्हणून केसांच्या शॅम्पूचे अर्धे पाकीट एक लीटर पाण्यात मिसळून फवारावे. नवीन फूट सतत येईल, याची काळजी घ्यावी, कारण त्यावर फुले येतात. त्यासाठी योग्य छाटणी करावी. दर महिन्याला पेंड खत आणि हाडांचे खत एकत्र करून चमचाभर द्यावे.