ऋषिकेश बामणे

सध्या संपूर्ण भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ‘गेम बनाएगा नेम’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. खेळाडूंच्या नावापेक्षा त्यांच्या कामगिरीला अधिक महत्त्व आहे, हेच यामधून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळांमध्येही असे अनेक क्रीडापटू आहेत ज्यांनी कठीण परिस्थितीवर मात करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. आजचा लेख अशाच निवडक क्रीडापटूंना समर्पित.

रेश्मा राठोड : खो-खो

१५ बाय १०च्या खोलीत आठ जणांचे वास्तव्य, वडील ट्रकचालक तर मोलमजुरी करणाऱ्या आईमुळे कसाबसा घराचा चरितार्थ चालत असताना बदलापूरच्या १७ वर्षीय रेश्मा राठोडने खो-खोमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला. गतवर्षी झालेल्या १८ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत तिने सर्वोत्तम खेळाडूला दिल्या जाणाऱ्या जानकी पुरस्काराला गवसणी घालून महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यातही मोलाची भूमिका बजावली. वयाच्या १०व्या वर्षी खो-खोकडे वळणाऱ्या रेश्माची यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी हुकली. मात्र यामुळे निराश न होता आगामी आव्हानांसाठी सज्ज होण्याचे ध्येय नुकताच १२वीची परीक्षा दिलेल्या रेश्माने डोळ्यासमोर ठेवले आहे.

यशस्वी जैस्वाल – क्रिकेट

बांगलादेशमध्ये झालेल्या युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सवरेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळवून भारताला विजेतेपद मिळवून देणाऱ्या यशस्वी जैस्वालची कहाणी फारच प्रेरणादायक आहे. एकेकाळी मुंबईतील झोपडपट्टीत राहणाऱ्या यशस्वीकडे दोन वेळचे खाण्यासाठीही पैसे नसायचे. कधीकधी रस्त्यावर पानीपुरी वगैरे विकून तो स्वत:चे पोट भरायचा. परंतु ज्वाला सिंग यांनी एकदिवस क्रिकेटची आवड असणाऱ्या यशस्वीला आझाद मैदानावर खेळताना पाहिले व त्यानंतर यशस्वीचे आयुष्यच पालटले. सध्या यशस्वी भारताच्या युवा संघाचा कर्णधार असून पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकासाठी त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

लोकप्रिय क्रीडापटूंवरही अशी वेळ

विजेंदर सिंग, मोहम्मद अली (बॉक्सिंग), मिल्खा सिंग (धावपटू), नोव्हाक जोकोव्हिच (टेनिस), ख्रिस्तियानो रोनाल्डो, पेले, दिएगो मॅराडोना (फुटबॉल) यांसारख्या अनेक नामांकित आजी-माजी खेळाडूंनीदेखील घराच्या बिकट परिस्थितीला सामोरे जात आपापल्या खेळात सर्वोच्च स्थान मिळवले. आजची पिढी यांसारख्या खेळाडूंना पाहूनच खेळाकडे वळत असून भविष्यात यांच्यामुळेच देशाला व जगाला अत्यंत प्रतिभावान तसेच खेळाच्या बळावर नाव कमावणारे खेळाडू लाभतील, यात तिळमात्रही शंका नाही.

युवराज वाल्मीकी – हॉकी

सध्या मुंबईच्या मरिन लाइन्स परिसरात राहणाऱ्या युवराज वाल्मीकीने भारतीय हॉकी संघात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र एकेकाळी युवराजला घराच्या गरिबीमुळे व शेजारांच्या त्रासामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा. लहानपणापासूनच हॉकीच्या प्रेमात पडणाऱ्या युवराजने २०११मध्ये झालेल्या आशिया करंडकात विजेत्या भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या रोख पुरस्कारांच्या बळावर युवराजने मुंबईत स्वत:चे घर घेतले असून भविष्यात भारताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे.

काजल कुमारी : कॅरम

बिहारमधील चणपटियासारख्या छोटय़ा खेडय़ांतून मुंबईत स्थायिक झालेल्या २२ वर्षीय काजल कुमारीने अल्पावधीतच कॅरममध्ये अनेक विजेतेपदांना गवसणी घातली आहे. काजलच्या कॅरम खेळण्याला घरातील इतर वडिलधाऱ्यांचा विरोध होता, त्याशिवाय स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन फक्त ‘चूल आणि मूल’ सांभाळावे, अशी त्यांची समज होती. मात्र आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे २०१६मध्ये काजल मुंबईत आली. गतवर्षी दक्षिण कोरियात झालेल्या कॅरम विश्वचषकात विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाची काजल सदस्य होती. त्याशिवाय व्यावसायिक पातळीवर ती इंडियन ऑइलचे प्रतिनिधित्व करत असून २०१५-१६चे राष्ट्रीय विजेतेपद मिळवणाऱ्या काजलचे प्रत्येक स्पर्धेत किमान उपविजेतेपद ठरलेलेच असते.