पावसाळा म्हणजे खरे तर उन्हाळ्याची रूक्षता मागे सरून संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य मिळण्याचा ऋतू. त्यामुळे या काळात जे पेराल ते चटकन उगवतं. पाणी नैसर्गिकरीत्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. त्यामुळे मुख्य पिकांची लागवडही या काळात केली जाते. शहरी भागात गॅलरीत किंवा गच्चीत झाडे लावणाऱ्यांना मात्र या काळात आपल्या बागेची काळजी घ्यावी लागते.

झाडांना पाण्याची गरज असते. मात्र अतिरिक्त पाणीसुद्धा घातक ठरू शकते. जमिनीत लावलेल्या झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाले तरी त्याचा सहज निचरा होऊन जातो किंवा ते जमिनीत मुरते. परिणामी जास्त पाऊस पडला तरी मुळे सुरक्षित राहतात. कुंडीत लावलेल्या झाडांचे मात्र असे नसते. बाल्कनीला छत असले, तरी वाऱ्याच्या झोताने बरेच पाणी आत येते आणि कुंडय़ांमध्ये साचून राहते. कुंडय़ांतील अतिरिक्त पाणी इतरत्र सांडू नये म्हणून अनेकांनी कुंडय़ांखाली ताटली ठेवलेली असते. ती एरवी अतिशय उपयुक्त ठरत असली तरी पावसाळ्यात मात्र त्रासदायक ठरते. कुंडय़ांखालच्या अशा ताटल्या पाण्याने भरून वाहू लागतात. हे पाणी फार काळ साचून राहिल्यास त्यात डासांची उत्पत्ती होण्याची भीतीही असते. मातीत पाणी साचून राहिल्यास मुळे कुजून झाड मरू शकते.

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी शक्य असल्यास बाल्कनीवर प्लास्टिकचे आच्छादन तयार करावे. जिथे सोसाटय़ाचा वारा थेट पोहोचणार नाही आणि पाण्याचा मारा होणार नाही, अशा ठिकाणी कुंडय़ा ठेवाव्यात. ज्या झाडांना अतिशय कोरडय़ा, मोकळ्या मातीची सवय असते, त्यांना शक्यतो घरातच ठेवावे. झाडांखालील ताटल्यांतील पाणी दिवसातून एकदा तरी काढून टाकावे. अतिरिक्त पाण्यामुळे बुरशीजन्य रोगांची लागण होऊन नये म्हणून योग्य त्या जंतुनाशकांचा वापर करावा. एवढी काळजी घेतल्यास वर्षभर जपलेली झाडे या ऋतूतही आनंदी राहतील.