केदार आपटे, नेरूळ, नवी मुंबई</strong>

दि. बा. मोकाशींची ‘आपलातुपला चहा’ नावाची एक लघुकथा आहे. घरात पाहुण्यांची वर्दळ असते. पाहुण्यांच्या सरबराईत वेळ जातो. दोन-चार दिवसांनी सगळे पाहुणे निघून जातात आणि अचानक एक प्रकारचा रिकामेपणा त्याला आणि तिला जाणवतो. घरात हा पसारा झालेला असतो. सुन्न मन:स्थिती झालेली असते आणि अचानक दोघांना प्रकर्षांने जाणवतं की या सगळ्या गडबडीत ‘आपलातुपला चहा’ झालाच नाही. दोघांनाही मग उत्साह येतो आणि मग ती चहा बनवते आणि समोरासमोर बसून छान गप्पा मारत ते दोघं ‘आपलातुपला चहा’ पितात आणि मग दोघंही नॉर्मल होतात. किती छान कथा आहे ती!

ती आठवायचं कारण म्हणजे आता या करोना नावाच्या दैत्याने सक्तीने घरी बसायला लावलं आहे. डोक्यात सतत कामाचे विचार सुरू असतात. आज रविवार अमुक तारीख म्हणजे उद्या ती अमुक मिटिंग आहे, मग आपलं प्रेझेंटेशन आहे.. हा डेटा हवाय.. हा टीम मेंबर कुठे आहे..  हे पेमेंट करायचं आहे.. तो रिप्लाय द्यायचा आहे.! हे असे अनंत विचार डोक्यात घोळत असतात. यामध्ये ब्रेक म्हणून आठवडाभराची रजा घेतली तरी ऑफिसचे व्यवहार सुरूच असतात म्हणजे डोक्यात विचार सुरूच असतात. आता या करोनामुळे सगळेच घरी. सगळं ठप्प. कुणाचे फोन नाहीत की काही काम करणं शक्य नाही. जिवावरच बेतलंय.

मागच्या वर्षी डोंबिवलीमधली एक वाचनालय बंद झाले, तेव्हा त्यांनी सर्व पुस्तकं मिळतील त्या भावात विकली. मी ताबडतोब जाऊन तीन खोके भरून पुस्तकं आणली. जुन्या जमान्यातील लेखक- द. पां. खांबेटे, दत्तू बांदेकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके तसंच शांताबाई शेळकेंचं गद्य लेखन, नारायण धारपांच्या कादंबऱ्या, जयवंत दळवी, दि. बा. मोकाशींचं ‘संध्याकाळचं पुणं’ असा खजिना गवसला होता. सगळी पुस्तकं छानपैकी बाइंड करून ठेवली होती. आज वाचू, उद्या वाचू करत वाचायला काही मुहूर्त लागत नव्हता. ती पुस्तकं तशीच कपाटात पडून होती.

आपण वेळोवेळी विविध हप्ते भरून त्यांच्या पावत्या कपाटात नुसत्या ठेवलेल्या असतात. घराचे हप्ते आणि वेगवेगळे कागद नुसते नंतर बघू म्हणून कपाटात फेकलेले असतात. प्रचंड पसारा झालेला असतो. त्यात कुठे गणपतीपुळ्याहून आलेल्या अंगाऱ्याच्या पुडीचा सुगंध येत असतो. सेल बदलायला लागणार म्हणून बंद पडलेली घडय़ाळं असतात. बँकेची चेकबुक अधूनमधून डोकावत असतात. हे सगळं व्यवस्थित फाइल करायचं आहे हे गेले अनेक दिवस मनाला बजावत आलेलो असतो.

फ्रीज उघडला तर डोअर लायनिंग काळं पडलेलं रोज बघून आज स्वच्छ करू, उद्या करू असं मनाला बजावत असतो. किचनचा प्रांत माझा नसला तरी उंचावरचे कप्पे नीट लावायचं माझंच काम असतं. जुने कुकर, मिक्सर दुरुस्त करायचे म्हणून तिथे ठेवलेले असतात. बेडवर गादीखाली जुने एक्स-रे रिपोर्ट ठेवले आहेत त्याचं काय करायचं याचा अजून निर्णय होत नाहीये. बेडखालचं स्टोरेज म्हणजे अचाट काम आहे. जुनी बेडशीट्स, चादरी एकामेकाला चिकटून वडय़ा झाल्या आहेत. तिथेच पूजेचे लाकडी पाट ठेवले आहेत. ड्रेसिंग टेबलजवळ संपलेल्या अत्तराच्या बाटल्या, पावडरचे डबे, क्रीमच्या चपटय़ा डब्या यांचा पसारा नीट लावायचा आहे. बाथरूममध्ये शाम्पूची डबडी, साबण हा वेगळाच पसारा असतो तो आवरायचा आहे.  आता या करोनामुळे मिळालेल्या सुटीचा विचार करताना जाणवलं की किती कामं करायची राहिली आहेत. आपण कामावर सगळं वेळापत्रकानुसार करतो मग घरी अशी चालढकल का करावी!  आता या करोनामुळे मिळालेल्या या सुटीचा नेमका उपयोग करायचा ठरवलं आहे. आपले आनंद हे पर्यटन, प्रवास, हॉटेलिंग, पाटर्य़ा यापेक्षा वेगळे असू शकतात. मऊ भात, थालिपीठ, वरणभात, बटाटय़ाच्या काचऱ्या, तळणीची मिरची असा मेन्यू करायचा आहे. मी हे सर्व झरझर आठवतो.. बशीत खारेदाणे भरतो.. आरामखुर्चीत छान बैठक जमवतो आणि म्हणतो, अगं, ‘आपलातुपला चहा’ कर गं जरा!!

मैदानी खेळांची आवड निर्माण करावी

 परमेश्वर गोजे,नाशिक

आजच्या आधुनिक विज्ञानाच्या युगात माणसाला संगणकाने आपल्या मगरमिठीत घेतले आहे. पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब असल्याने घरात भरपूर माणसे असायची. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीत ते नाही. आत्ताच्या पिढीला आपल्या जवळच्या नातेवाईकांचीही माहिती नसते.  त्यामुळे आपले सर्व नातेवाईक आणि नाती याची माहिती मुलांना करुन द्यावी. मैदानी खेळ खेळण्यास या मुलांना प्रवृत्त करावे. लेखनाची, वाचनाची आवड निर्माण करावी.  स्वयंम शिस्तीचे धडे द्यावेत. मी माझा वेळ यात सत्कारणी लावत असून त्यामुळे एक वेगळेच मानसिक समाधान मिळत आहे.

योगासने, इंग्रजीचा सराव

 रोहित कैलास माळी, डोंबिवली (प)

मी डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर अरुणोदय माध्यमिक या शाळेत इयत्ता नववीत शिकत आहे. माझे आई बाबा दोघेही प्राथमिक शाळेत शिक्षक/शिक्षिका आहेत. मोठी बहीण महाविद्यालयात शिकत आहे. करोनामुळे घरात बसून काय करायचे हा प्रश्न सगळ्यांनाच सतावत आहे. सकाळच्या प्रसन्न व आल्हाददायी वातावरणात आम्ही १९ मार्च २०२० पासून दिवसागणिक अनुक्रमे दोन, चार, सहा, आठ अशी संख्यावाढ करीत सूर्यनमस्कार घालण्याचे ठरवले आहे. वडिलांचे प्राथमिक योग शिक्षण पूर्ण झालेले असल्याने ते आम्हा सर्वाना नवनवीन योगासने व प्राणायाम शिकवतात. आम्ही सर्व जण नियमित वृत्तपत्र वाचतो. संध्याकाळी मी अभ्यास करतो व इतर सदस्य अवांतर पुस्तकाचे वाचन करतात. इयत्ता पहिली ते आठवीच्या परीक्षा जरी रद्द झाल्या असल्या, तरी नववीची परीक्षा होणार असल्याने अभ्यास क्रमप्राप्त आहे. रात्री जेवणाबरोबर सह्य़ाद्री वाहिनीवरील साडेनऊच्या बातम्या पाहतो. त्यानंतर आम्ही वज्रासनात बसतो. या सर्व वेळात मी आईला मदत सुद्धा करतो. दररोज झोपण्याच्या आधी ‘श्यामची आई’ या पुस्तकातील एक गोष्ट वाचतो व आम्ही झोपतो. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून संपूर्ण दिवस इंग्रजीतच संभाषण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यामुळे सर्वाचे इंग्रजी तर सुधारेलच त्याचबरोबर आमचे संभाषण कौशल्य देखील सुधारण्यास मदत होईल.

आठवणींना उजाळा

 पूर्णिमा शेंडे, चेम्बूर, मुंबई</strong>

खरंतर हा करोना कुटुंबाबरोबर कसं जगायला हवं ते शिकवतोय. आताची पिढी नातेवाइकांपेक्षा मित्र परिवारांना जास्त प्राधान्य देत आहे. यात वाईट काहीच नाही पण मित्रांच्या कार्यक्रमाला लांब लांब पण जातील.

पण घरातल्या कार्यक्रमाला काहीबाही सबबी देऊन उपस्थित न राहणे अंगवळणी पडले होते. घरची माणसंच घरापासून, आपल्या परिवारापासून, सख्खा, जवळच्या नातेवाइकांपासून लांब पडली जारत आहेत. त्यांना गृहीत धरत आहेत. याला कुठेतरी आळा घालण्यासाठी जसं काही हे करोना निसर्गरूपाने आले. सर्व जण घरी म्हणजे घरातल्या स्त्रीला परमानंद होतो. मग काय मी घरातल्या अडगळीतले खेळ काढले. प्रथम कॅरम खेळलो, पत्ते खेळलो, वेगवेगळे खेळ खेळून भरपूर हसलो. सापशिडी पाटय़ांवरचा गेम.. खूपच मजा केली. मुलांच्या लहानपणीचे, फिरायला गेलो तेव्हाचे, सहलींचे फोटो असलेले सर्व अल्बम काढून सर्व जण एकमेकांना दाखवून भरपूर आनंद लुटत आहोत. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि घर आनंदानी भरून गेले.

वाचन आणि लेखनाचा छंद जोपासतोय

 विलास समेळ, घणसोली, नवी मुंबई

मी स्वत: ज्येष्ठ नागरिक असून बराच काळ घरातच बसून काढतो.  आता मात्र कैदेतच असल्यासारखे वाटत आहे. दैवी देणगी लाभलेल्या सुंदर हस्ताक्षर आणि सुलेखनातून मी सतत काहीतरी लिहित असतो. लेखन ,वाचन हा माझा छंदच आहे आणि त्याला लागणारा भरपूर वेळ आता मला मिळत असल्याने मी खूष आहे.

जमेल तेवढे वाचन आणि लेखनात वेळ कसा जातो ते कळतही नाही.या बरोबरच आकाशवाणीवरील गाणी ऐकण्याची मजा काही वेगळीच आहे. घरातील सर्व सदस्यांसह जेवणे, त्यांच्या कामात मदत करणे देवपूजेबरोबरच काही स्तोत्रं ,पोथी वाचनही करत आहे.