गेल्या वर्षभरापासून देशातील वाहन उद्योगावरील मंदीचे मळभ हटण्यास दसरा-दिवाळी सणांनी मदत केली आहे. गेल्या दहा महिन्यांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. मारुती सुझुकीच्या कारची विक्री ऑक्टोबरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेचार टक्कय़ांनी वाढली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीची तुलना करता वाहन उद्योगवरील मंदीचे ढग मात्र कायम असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील काळात कार कंपन्या याला कसे तोंड देतात हे पाहावे लागणार आहे. विक्रीमध्ये काही वाढ दिसत असली तरी खरेदीदारांचा बदलता पसंतीक्रम पाहता त्यांच्या अपेक्षांना उतरून कार कंपन्यांना पुढील काळात परवडणाऱ्या कार बाजारात आणाव्या लागणार आहेत.

गेले दहा महिने वाहन उद्योगात खरेदीदारांचा निरुत्साह पाहावयास मिळत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती मंदीसदृश किंवा उदासीन आहे. त्यामुळे मोटारीसाठी अतिरिक्त खर्च करण्याची स्थिती पाच वर्षांपूर्वी जशी होती, तशी ती आज नाही. तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत या ग्राहकाचे स्वागत करणाऱ्या वित्तीय संस्था आज त्या आर्थिक स्थितीत नाहीत. हप्ते बुडतील असा संशय जरी आला, तरी कर्जे तात्काळ नामंजूर होत आहेत. व्याजदर घटूनही ही स्थिती बदललेली नाही. याही परिस्थितीत मोटारी बाजारात आणणे आणि ग्राहकांची वाट पाहणे अव्याहत सुरूच आहे. दसरा-दिवाळीनिमित्त कार कंपन्यांनी ‘ऑफर्सचा गिअर’ टाकला होता. तसेच मारुतीसारख्या आघाडीच्या कंपनीने आपल्या किमतीही कमी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर दिवाळीत विक्रीत वाढ दिसत आहे. असे असले तरी मालाला उठाव केवळ एखाद्या उत्सवी हंगामातून मिळण्याची शक्यता नाही. दसरा-दिवाळी हंगामात जरी विक्रीमध्ये वाढ दिसत असली तरी ती यापुढे कायम राहील याची शक्यता नाही. अर्थात, ही मरगळ आणखी किमान दोन वर्षे अशीच राहण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे पुढील काळ हा वाहन उद्योगासमोर आव्हानात्मक आहे.

मारुती सुझुकी इंडियाची वाहन विक्री ऑक्टोबर महिन्यात मागील वर्षांच्या तुलनेत ४.५ टक्कय़ांनी वाढली आहे. १ लाख ५३ हजार ४३५ वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने १ लाख ४६ हजार ७६६ वाहने विकली होती, तर सप्टेंबर २०१९मध्ये १ लाख २२ हजार वाहनांची विक्री केली होती. महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहनांच्या विक्रीतही मागील वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत ११ टक्कय़ांनी घट झाली आहे. ५१८९६ वाहने विकली गेली आहेत. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत विक्री वाढली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये कंपनीनं ५८४१६ कार विकल्या होत्या,तर सप्टेंबर २०१९मध्ये कंपनीनं ४३३४३ कार विकल्या होत्या. दरम्यान, एमजी मोटरच्या एसयूव्ही हेक्टरच्या विक्रीतही वाढ नोंदवली गेली आहे.

या वर्षी ऑक्टोबरमध्ये कारची विक्री पाहता खरेदीदारांचा पसंतीक्रमही पाहावा लागेल. कारण बदलता पसंतीक्रम हाही वाहन उद्योगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘हॅचबॅक’ म्हणजे छोटय़ा मोटारींची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ, असे भारताचे वर्णन अगदी अलीकडेपर्यंत केले जायचे. मात्र ग्राहकांचा कल हॅचबॅकपेक्षा ‘कॉम्पॅक्ट सेडान’ म्हणवल्या जाणाऱ्या मोटारींकडे वळला. इतका, की गेल्या वर्षी जवळपास दशकभरानंतर मारुतीची ‘डिझायर’ ही कॉम्पॅक्ट सेडान श्रेणीतील मोटार याच कंपनीच्या ‘आल्टो’ या हॅचबॅक मोटारीला मागे टाकून भारतातील सर्वाधिक विकली जाणारी मोटार बनली. देशातल्या आणि जगातल्याही उत्पादकांनी या श्रेणीमध्ये मोठी गुंतवणूक केली.

ही बाजारपेठ स्थिरावत असतानाच, भारतीय ग्राहकांचा पसंतीक्रम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेहिकल किंवा एसयूव्ही या वाहनांकडे वळला. त्यामुळे गेल्या वर्षभरात कार कंपन्यांनी अनेक एसयूव्ही बाजारात आणल्या. २०१९ हे वर्ष या एसयूव्हींनी गाजवले. मात्र असे असले तरी कारच्या किमती हा फॅक्टर यातही महत्त्वाचा ठरू लागला आहे. कारण आर्थिक मंदीत एसयूव्हीं सेग्मेंट हवे पण ते परवडणारे अशी मानसिकता सध्या खरेदीदारांची दिसत आहे. कारण दिवाळीपूर्वी मारुतीने आपली ‘मिनी एसयूव्ही’ एस क्रॉस दाखल केली आणि तिने ऑक्टोबरच्या कार विक्रीत ‘टॉप टेन’मध्ये स्थान पटकावले आहे. त्यामुळे खरेदीदारांचा पसंतीक्रम व आर्थिक मंदी हे आव्हान कार कंपन्यांना पेलावे लागणार आहे.

बदलता पसंतीक्रम

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील खरेदीदारांची पसंतीची तुलना या ऑक्टोबरशी केली असता पुन्हा खरेदीदारांच्या पसंतीत बदल दिसत आहे. विक्रीत पहिल्या दहा कारमध्ये मारुती सुझुकीच्या सर्वाधिक कार आहेत.

डिझायरला पहिली पसंती

मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट सेडान डिझायर कारची सर्वात जास्त विक्री झाली आहे. गेल्या महिन्यात १९ हजार ६५९ इतक्या कारची विक्री झाली असून तिने आल्याच अल्टोला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी टॉपवर असलेली अल्टो या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे.

बलेनोचे स्थान कायम

मारुतीची प्रीमियम हॅचबॅक कार बलेनोला आजही पसंती आहे. गेल्या वर्षी १८६५७ कारची विक्री करीत ती दुसऱ्या स्थानावर होती. या वर्षी ती चौथ्या स्थानावर असून १६,२३७ कारची विक्री झाली आहे.

मारुतीच्या मिनी एसयूव्हीची दमदार एंट्री

मारुतीने दिवाळीपूर्वी बाजारात आपली बहुप्रतीक्षित अशी ‘एस प्रेसो’ ही कार आणली. तसे पाहिले तर ती एसयूव्ही प्रकारातील नाही, पण मारुतीने ती परवडणारी व एसयूव्हीसारखी दिसणारी अशी कार डिझाइन केली असून तिने पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांतच १०६३४ एस प्रेसो कारची विक्री झाली आहे.

ह्युंदायची क्रेटा टॉप दहामधून बाहेर

टॉप टेनच्या यादीत ह्युंदायची इलाईट आय २० चे स्थान कायम राहिले असून ती पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली एसयूव्ही ‘क्रेटा’ मात्र या यादीतून बाहेर गेली आहे.

किआच्या सेल्टोसची टक्कर

भारतीय कार बाजारात किआ या कोरिएन कंपनीने गेल्या काही महिन्यात आपले स्थान निर्माण केले आहे. केवळ एक एसयूव्ही सेल्टोस भारतीय बाजारात आणली असून तिच्या विक्रीचा आकडा ६० हजारापर्यंत पोहचला आहे. ऑक्टोबरमध्ये या कारची विक्री १२८५४ इतकी झाली असून तिने सातव्या स्थान पटकावले आहे.