परीक्षा आली तर नेमकं काय होतं, हा सवाल तसा नित्याचाच आहे. पण याचं उत्तरही तसंच पट्टीतलं आहे. परीक्षा आली की ताण येतो. मग तो काही जण घेतात तरी एक, वा तो घालविण्याच्या नाना योजना लढवतात. आता यातही काहीजण यशस्वी होतात. तर काही जण नाही होत. नेमकं काय घडतं या ‘ताणकाळात.’ जाणून घेऊ या तर काही विद्यार्थ्यांच्या ताणनिवारणाच्या बाजू..

सध्या मुंबई, ठाणे परिसरातील महाविद्यालयात परीक्षांचा काळ सुरू आहे. महाविद्यालयांच्या कट्टय़ावर तासन्तास दिसणारे विद्यार्थी.

आता हे सारे ग्रंथालयात कोंडून घेताना दिसत आहेत. कॅन्टीनची गर्दी काही प्रमाणात ओसरली आहे. नोट्सच्या छपाईचं काम सुरू आहे. त्यामुळेच मग महाविद्यालयाच्या परिसरातील दुकानांत झुंबड उडाली आहे. प्रत्येक विषयांच्या नोट्सची छपाईचे गठ्ठे घरी आणले गेलेत. अभ्यासाला सुरुवात झाली आहे. तो खासगी आहे. काहींचा घोळक्याने आहे. अभ्यास सोडला तर ताण येतोच, ताण आला तर अभ्यास होत नाही. म्हणून मग कमी-अधिक ताण घेत सर्वचजण अभ्यास करीत आहेत.

तिचं खाणं!!

‘‘मी सांगू. कधी कधी अभ्यास करावासा वाटत नाही. अशा वेळी काहीतरी चटपटीत खावंस वाटतं. घरी आले की मग काहीतरी नवी पाककृती बनवते आणि दे ताव मारते.’’ द्वितीय वर्षांत शिकत असलेल्या महिमा हंबिरे हिनं केलेलं ताणाचं वर्णन तर तोंडाला पाणी आणणारंच..

जरा उशिराच पोहोचा ना हो..

परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी महाविद्यालयाच्या मी आवारातच घुटमळतो. त्यासाठी घरातून उशिराच निघणे, त्याही आधी स्वच्छतागृहात गरज नसताना वेळ घालवणे, हे ताण घालविण्यासाठीचे माझे उपाय आहेत. घोळक्यातील काही विद्यार्थी हे ठरवून करतात. म्हणजे परीक्षा केंद्रात दहा ते १५ मिनिटे उशिरा दाखल होतात. तीन तास परीक्षेला बसून लिहायचे काय, हाही काहींचा प्रश्न सतावत असतो. पण सराव परीक्षा असल्यावर काही विद्यार्थी या परीक्षेला फार महत्त्व देत नाहीत. कितीही केला तरी अभ्यास अपूर्णच राहतो. पण आहे हे असं आहे. ताणच घालवायचा तर मी हे सारं करतोच, असे परितोष हेडगे म्हणाला.

तिची झोप!

‘‘एकटय़ाने अभ्यास करायचा तर ताण येतो. म्हणून मग अभ्यासही होत नाही. मग झोप घ्यावीशी वाटते. मग मी झोपतेच. माझं असं आहे की दडपण दणदणीत असेल तर सडकून झोपते मी.’’ जोशी-बेडेकर महाविद्यालयातील एक विद्यार्थिनी सांगत होती.

तज्ज्ञांच्या मते.

विद्यार्थ्यांना परीक्षेपेक्षा त्याच्या निकालाची जास्त भीती असते. कमी गुण मिळाल्यास पालक काय म्हणतील, लोक काय म्हणतील या भीतीतून हा परीक्षेपूर्वी हा ताण उद्भवत असतो. झोप आणि खाणे हा ताण घालवण्यासाठी सोपे पर्याय आहेत. यातून त्या क्षणापुरते पटकन समाधान मिळते. मात्र यातील झोप हा पर्याय चांगला आहे. परीक्षेआधी चुकीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खाण्यावर निश्चितच मर्यादा हवी. झोपणे हा पर्याय उत्तम आहे. कारण झोपेत मेंदू पूर्ण शांत असतो. मात्र याची कल्पना पालकांना असायला हवी. तसेच झोपेची निश्चित वेळ ठरवणे आवश्यक आहे. ताण घालवण्यासाठी व्यसनांचा आधार घेणे निश्चितच वाईट आहे.

– डॉ. राजेंद्र बर्वे (माईंड फुलनेस गुरू)

‘‘आजकाल अभ्यास आणि सोबत हाती ‘स्मार्टफोन’ हे नित्याचंच झालंय.. तर ताण जाणवतोच. पण मग तो सोसावा म्हणून सोशलमीडिया आहेच की. गेमिंग हा ‘फेव्हरीट’ माझा प्रकार. दोन तास अभ्यास. त्यानंतर आपोआपच आलेला कंटाळा. त्यावर उपाय म्हणून बराच बंद असलेला व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक सुरू करायचे. त्यावर आवडत्या प्रोफाइल्सला स्टॉक करायच्या’’, पोद्दार महाविद्यालयातील स्वप्निल गटवे सांगतो.

दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यावर अभ्यासू विद्यार्थी त्वरित घराकडे वळतात. आम्हा मित्र-मैत्रिणी महाविद्यालयाच्या आवारातील कट्टय़ावर मोबाइलवर लूडो खेळतो. त्यामुळे खेळताना काही तास दुसऱ्या दिवशीच्या पेपरचा ताण जाणवत नाही. अनेकदा परीक्षा जवळ येऊ लागल्यावर ग्रुप स्टडी होत असतो. मित्र-मैत्रिणींच्या घरी रात्रीचा अभ्यास करण्याचे नियोजन केले जाते. रात्री अभ्यास करून अभ्यासाचा क्षीण जाणवल्यावर सिगरेटची तलफ येतेच. असे जोशी-बेडेकर महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांने सांगितले.