डॉ. नीलम रेडकर

फ्लूची लक्षणे आणि उपाययोजना

भारतात फ्लूची लागण प्रामुख्याने हिवाळ्यात होते. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढते. फ्लूची लक्षणे तरुणांमध्ये कमी तीव्रतेची असली तरी तुलनेने जेष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असल्याने मात्र गंभीर दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. फ्लूच्या आजाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिक दिसून येते. वरकरणी साधा वाटणारा हा आजार क्वचित गंभीर रूप धारण करू शकतो. लसीकरण आणि इतर उपाययोजनांच्या माध्यमातून याला नक्कीच वेसण घालता येऊ शकते.

फ्लूचा संसर्ग कसा होतो?

* फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. इन्फ्लुएंझा विषाणूच्या संसर्गामुळे हा आजार होतो

* हे विषाणू श्वसननलिकेद्वारे शरीरात प्रवेश करतात.

* फ्लूबाधित रुग्णाच्या शिंका व खोकल्यामधून तसेच या रुग्णांनी स्पर्श केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून (उदाहरणार्थ- दरवाजाचे हॅण्डल) जंतूसंसर्ग होण्याची शक्यता असते.

फ्लूची लक्षणे

विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यापासून ४ ते ६ दिवसांत फ्लूची लक्षणे दिसून येतात.

* सर्दी, खोकला होणे

* थंडी भरून ताप येणे

* घसा खवखवणे

* डोकेदुखी, अंगदुखी

* उलटय़ा, जुलाब होणे

* कानातून पाणी येणे

फ्लूची गंभीर लक्षणे

ज्या जेष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार, यकृताचे आजार, लठ्ठपणा हे आजार आहेत, त्यांना फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. अशा रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. खालील फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक आहे

* कमी न होणारा ताप किंवा शरीराचे तापमान नेहमीपेक्षा कमी होणे

* दम लागणे

* छातीत दुखणे

* अशक्तपणा जाणवणे

* उलटय़ा, जुलाब होणे

* शुद्ध हरपणे, आकडी येणे

उपाययोजना

* फ्लूची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे. वेळेत उपचार केल्यास पूर्णपणे आजारावर नियंत्रण मिळवता येते.

* निरोगी जीवनशैली आचरणात आणणे आणि पुरेशी विश्रांती घेणे.

* फ्लूबाधित रुग्णांपासून सहा फुटांपेक्षा अधिक अंतर राखून वावरणे, तसेच त्यांनी स्पर्श केलेल्या वस्तूंना स्पर्श करणे टाळणे. हे शक्य नसल्यास हात योग्यरितीने धुणे. यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा संभव कमी होऊ शकतो.

*  आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे.

फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी गरम सूप आणि पदार्थाचे सेवन करावे. त्यामुळे घसादुखीपासून आराम मिळेल. जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे, लसूण यांचा समावेश करावा. तिखट आणि अतितेलकट पदार्थ(वेफर्स) टाळावेत.

फ्लूच्या विषाणूंमध्ये दरवर्षी बदल होत असल्याने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी नवीन लस तयार करते. ही लस दरवर्षी हिवाळा सुरू होण्याआधी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.