सुहास जोशी

कोणत्याही पर्यटनस्थळी गेल्यानंतर शक्यतो तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यावा. तिथे जाऊन पुन्हा घरच्यासारखेच जेवण हवे, असा हट्ट धरण्यात काही अर्थ नाही. एक तर स्थानिक पदार्थ हे बहुतेक वेळा तिथल्या स्थानिकांनीच केलेले असतात, त्यामुळे त्यांना दोन पैसे मिळतात आणि दुसरे म्हणजे आपल्याला नवीन पदार्थाची चव घेता येते. उच्चभ्रू हॉटेलांचा अशा पदार्थाशी फारसा संबंध नसतो.

मनालीत हल्ली सर्वच प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. पण तेथील बाजारात काही अगदी स्थानिक पदार्थाचा आस्वाद घेता येतो. मनाली एसटी स्थानकाच्या बाजूलाच असलेल्या बैठय़ा चाळसदृश बाजारात एक चहाची टपरी आहे. फौजी टी स्टॉल. या टपरीच्या बाहेर दोन-तीन बाकडी असतात. त्यावर अगदी पारंपरिक हिमाचली पेहरावातील व्यक्तींचा वावर असतो. काही गाइड असतात तर काही असेच वेळ घालवायला आलेले. या टपरीचे वैशिष्टय़ म्हणजे येथे मिळणारा स्थानिक पदार्थ ‘सिदू’.

दिसायला करंजीच्या आकाराचा, मात्र नेहमीच्या करंजीपेक्षा चौपट मोठा असा हा पदार्थ एकदम स्थानिक आहे. सोयाबीन, चना वगैरे जाडेभरडे पीठ एकत्र करून त्यांचे मिश्रण तांदळाच्या पिठामध्ये भरून त्याला मोठय़ा करंजीसारखा आकार दिला जातो. असे चार-पाच सिदू एका वेळी मोठय़ा चाळणीत ठेवून उकडले जातात.

टपरीवर न उकडलेले सिदू तयार असतात. तुम्ही ऑर्डर दिलात की पाच-दहा मिनिटांत गरमागरम सिदू तयार होतो. मनालीच्या त्या थंड हवेत असे गरमागरम खाण्याचे सुख काही वेगळेच आहे. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ ठरावीक ठिकाणीच मिळतो. काही मोठय़ा हॉटेलमध्येदेखील हा पदार्थ मिळतो. तिथे सिदूवर तुपाची धारदेखील सोडली जाते.