घरातलं विज्ञान : सुधा मोघे-सोमणी,

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

गांधी जयंती बुधवारी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांची आठवण झाली की खादी वस्त्रांचा विचार आपल्या मनात आपसूकच येतो. स्वदेशी चळवळीत खादी खूप लोकप्रिय झाली. यामागे कारण म्हणजे खादीचे गुणधर्म. खादी हे सूत चरख्यावर तयार केले जाते व मग त्याची विविध प्रकारची वस्त्रे उदा. कुरता, पायजमा, जाकीट इत्यादी तयार केले जातात. खादीचे वैशिष्टय़ म्हणजे उन्हाळ्यात या वस्त्रांमध्ये आपल्याला उकाडा जाणवत नाही, तर हिवाळय़ात हे कपडे शरीराला ऊब देतात. थंड प्रदेशात वापरण्याकरिता खादीमध्ये लोकरीचादेखील वापर केला जातो. विशेष समारंभांसाठी खादी सिल्क म्हणजे खादीमध्ये सिल्कचा वापर करून हे वस्त्र तयार केले जाते.

खादीचा एक तोटा म्हणजे ती जाड असते व पाणी शोषून घेतल्यामुळे धुतल्यावर कोरडा होण्यास खूप वेळ लागतो. तसेच पाणी शोषल्यावर त्यातील कार्बन बंध विस्कळीत झाल्याने कपडा चुरगाळतो. वारंवार बंध विस्कळीत झाल्याने कालांतराने कपडा फाटतो.

गरज ही शोधाची जननी आहे. सर्व नैसर्गिक सूत (फॅब्रिक)चा एकच दोष- ते पाणी शोषून घेतात व अशाने तंतूंची ताकद कमी होते. खादीच्या समस्येवर उपाय शोधण्याकरिता अनेक ठिकाणी प्रयोग चालू होते व त्यात यश मिळाले डय़ूपॉन्ट यांच्या रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ वॉलिस ह्यूम कॅरोथर्स यांना. कोळसा, पाणी, नैसर्गिक वायू व पेट्रोलियम वापरून पहिल्यांदा नायलॉन तयार केला गेला. हे कृत्रिम बहुवारिक (पॉलिमर) आहे. बहुवारिक म्हणजे एका संयुगाचे अनेक रेणू आपसांत बंध तयार करून लांब शृंखला तयार करतात. त्यातील विविध घटकांमुळे त्याला विशेष गुणधर्म प्राप्त होतात. बहुवारिकीकरण हा गुणधर्म कार्बन अणूंचा विशेष गुणधर्म आहे. या गुणधर्माचा आपण भरपूर फायदा करून घेतला आहे. सर्व प्रकारचे प्लास्टिक हे बहुवारिक आहेत. प्लास्टिकचा सर्वात मोठा दोष, जी आज आपल्यासाठी एक भयंकर समस्या झाली आहे. ती म्हणजे वापरून झाल्यावर प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याचा यक्षप्रश्न!

नायलॉन पाणी शोषून घेत नाही, त्यामुळे लवकर कोरडा होतो व त्याच्या तंतूंची ताकद टिकून राहते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने अमेरिकेला रेशीम देणे बंद केले असता नायलॉन अतिशय लोकप्रिय झाले.

मोजे (स्टॉकिंग्स) बनवण्यासाठी याचा वापर झाला. कृत्रिम असल्यामुळे ते घाम टिपू शकत नव्हते व दमट हवेत त्यांचा त्रास होई. यावर उपाय म्हणून नायलॉनमध्ये कॉटन, स्पॅनडेक्स हे काही प्रमाणात मिश्रित केले गेले. हा नवीन मिश्रित (ब्लेंडेड) नायलॉन मग दमट हवेतपण वापरण्याजोगा झाला. याने नायलॉनच्या किमतीही कमी झाल्या. या सर्व घडामोडी १९३५-१९४० दरम्यानच्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पॅराशूट, टेंट यासाठी नायलॉनचा वापर केला गेला. आपण दररोज सकाळी उठून जो टूथब्रश वापरतो त्याचे दात (ब्रिस्ट्लस)देखील नायलॉनचे असतात. केवळ टूथब्रश कशाला, अनेक प्रकारच्या ब्रशांचे दात नायलॉनचे असतात.

ब्रिटनमध्येसुद्धा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुती कपडय़ांची कमतरता जाणवू लागली व ते महागदेखील होते. त्याला सहज उपलब्ध असणारे व कमी किमतीचे पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. १९४१ मध्ये जॉन विनफिल्ड व जेम्स डिक्सन यांनी पॉलिएस्टर प्रयोगशाळेत तयार केले. नायलॉनप्रमाणेच पॉलिएस्टरदेखील बहुवारिक (पॉलिमर) आहे. नायलॉन व पॉलिएस्टर दोन्ही सुतीपेक्षा कमी किमतीचे असल्याने लोकप्रिय झाले. हे घाम टिपू न शकल्यामुळे वापरताना त्रास होई. यावर उपाय म्हणून सुती व पॉलिएस्टर याचे मिश्रण असलेले कपडे तयार केले गेले.