25 November 2020

News Flash

बालीपलिकडचा इंडोनेशिया

बालीमध्ये कुता बीच प्रसिद्ध आहे. चांगू बीच सर्फिगसाठी प्रसिद्ध आहे.

इंडोनेशिया म्हणजे बाली असंच समीकरण आपल्याकडे झालं आहे. पण इंडोनेशियात दोन आकर्षणं आहेत. एक म्हणजे नितांतसुंदर बेटं, समुद्रकिनारे, जागृत ज्वालामुखीमुळे निर्माण झालेली नैसर्गिक आश्र्चय आणि दुसरं तिथल्या राजसत्तांनी निर्मिलेल्या हिंदू आणि बौद्ध धर्मीयांच्या महाकाय वास्तू. हे सारं एकाच ट्रिपमध्ये पाहणं कठीणच आहे. पण हाताशी दहादिवस असतील तर दोहोंचा संगम करणारी टूर सहज शक्य आहे. बाली- फ्लोरेस बेट/ कोमोडो बेट/ लेम्बोनगन बेट- बाली- योग्यकर्ता- बाली असा प्रवास करता येईल.

बालीमध्ये कुता बीच प्रसिद्ध आहे. चांगू बीच सर्फिगसाठी प्रसिद्ध आहे. इंडोनेशिया हा अधिकृतपणे मुस्लीम देश म्हणून घोषित केलेला आहे, पण बाली हा हिंदूबहुल भाग आहे. येथील उबुद भागात साधारण दर शे-दोनशे मीटरवर एक मंदिर आहे. अगस्ती ऋषींनी ही मंदिरं स्थापन केली, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. अगस्तींनी इथं स्थापन केलेलं पहिलं मंदिर एका नदीच्या उगमापाशी आहे. याच परिसरात सरस्वतीचं मंदिरही आहे. उबुदच्या राजवाडय़ाचंही बऱ्यापैकी जतन केलं आहे. एकूणच उबुदला पारंपरिक वास्तुरचनेचं वलय लाभलं आहे. सांस्कृतिक केंद्रात गेलात, विशेषत: रविवारी सकाळी गेलात तर बालीच्या संस्कृतीची सर्वागीण झलक अनुभवता येते. बालीमध्ये एक ते दोन दिवस भटकंती करून मग फ्लोरेस, कोमोडो किंवा लेम्बोनगन बेटाची एक ते दीड दिवसाची सफर करता येते.

फ्लोरेस बेट प्रसिद्ध आहे ते ज्वालामुखीच्या विवरात तयार झालेल्या तीन रंगांच्या तीन तळ्यांसाठी. इंडे किंवा मोमोरिलोला बालीहून विमानाने जावं. तिथं किलिमोतू राष्ट्रीय अभयारण्यातल्या मोनी या गावी हॉटेल आहेत. थोडा ट्रेक करून आपण या विवरांच्या तळ्याच्या काठावर येतो. निसर्गाचा चमत्कार म्हणावा असंच हे ठिकाण आहे. बाकी फ्लोरेस बेटावर फारसं पाहण्यासारखं काही नाही.

फ्लोरेसला जायचं नसेल तर मग बालीहून कोमोडो बेटाची सफर करावी. ही सफर करायची ती वाटेतल्या बेटांचं सौंदर्य आणि नयनरम्य समुद्रकिनारे पाहण्यासाठी. इंडोनेशियाला बेटांचा देश का म्हणतात त्याचं पुरेपूर प्रत्यंतर इथं येतं. ही सफरदेखील दोन दिवसांत करता येते. फ्लोरेस आणि कोमोडो दोन्हींसाठी बालीहून तास-दीड तासाचा विमानाचा प्रवास करावा लागतो. हे टाळायचं असेल आणि बेटाच्या सफरीचा आनंद घ्यायचा असेल तर लेम्बोनगन बेटाला बालीच्या सानुर बीचवरून बोटीने दीड-एक तासात पोहोचता येतं. हे बेटदेखील अतिशय सुंदर आहे. एक-दोन दिवसांत बेटावरची भटकंती पूर्ण होऊ  शकते.

यानंतर इंडोनेशियाच्या पुरातत्त्व वारशाकडे वळू या. त्यासाठी बालीहून योग्यकर्ता (जोग्जकर्ता) इथं जावं लागेल. तिथं मात्र किमान दोन दिवस हाताशी ठेवले तर उत्तम. योग्यकर्तापासून विमानाने साधारण एक तासात आपण बोरोबुद्दरला पोहोचतो. तिथं नवव्या शतकात राजा सैलेस याच्या कारकीर्दीत बांधलेली बौद्ध धर्माची अनोखी वास्तू आहे. पिरॅमिडसारख्या या वास्तूवरील सर्व शिल्पं पाहायची तर एक दिवसदेखील कमी पडेल. एकूण दोन हजार ६७२ शिल्पपट्टिका तिथं आहेत. बुद्धाचा निर्वाणाचा मार्ग मांडणारी ही वास्तू जगभरातील बौद्ध धर्मीयांचं श्रद्धास्थान आहे. तिथंच जवळ प्रांबनन प्लेन येथे बौद्ध आणि हिंदू धर्मीयांच्या वास्तूंची ३० ठिकाणं आहेत. या संपूर्ण भागाला ज्वालामुखीचा प्रचंड तडाखा बसला होता. भूकंपाने येथील बोरोबुद्दर बरंच उद्धवस्त झालं होतं. प्रांबनन प्लेनमधलीही काही मंदिरं जमीनदोस्त झाली होती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि त्यांचं वाहन अशी सहा मंदिरं पुन्हा पूर्वीसारखी उभारली आहेत. एक प्रकारे हे आश्चर्यच म्हणावं लागेल. योग्यकर्तामध्ये तुम्हाला रामायण बॅलेचा आनंददेखील घेता येईल. योग्यकर्ता हादेखील मुस्लीमबहुल प्रांत आहे. तिथं काही ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमही रस्त्यावरच सुरू असतात. ही भटकंती आटोपून पुन्हा बाली गाठून परतीच्या प्रवासाला लागावं.

नुकतीच गरुडा एअरलाइन्स या इंडोनेशियाच्या सरकारी विमान कंपनीने थेट मुंबई/ दिल्ली- बाली विमानसेवा सुरू केली असल्यामुळे पूर्वीसारखा दोन टप्प्यांत प्रवास करावा लागत नाही.

खाद्यसंस्कृती

  • इंडोनेशियात भात आणि मांस हेच जेवणातील मुख्य पदार्थ आहेत. तळलेले टोफू हा पनीरसारखा प्रकार रस्त्यावर मिळतो. बालीमध्ये अनेक भारतीय रेस्टॉरन्ट आहेत. योग्यकर्तामध्ये रात्रीच्या वेळी भटकंतीचा, फुटपाथवरच पथाऱ्या मांडून कॉफी, ज्यूसचा आस्वाद घेता येतो.
  • इंडोनेशियाचं चलन रुपय्या आहे आणि एक भारतीय रुपया म्हणजे साधारण २०९ रुपय्या होतात. पण त्याचं मूल्य साधारण आपल्याएवढंच आहे. म्हणजे एक कप कॉफी आपल्याकडे २० रुपयांना असेल तर तिथं साधारण चार हजार १८० रुपय्यांना (भारतीय चलनात २० रुपयेच) मिळते. त्यामुळे त्यांच्याकडे वस्तूंच्या किमती हजारात सांगण्याची प्रथा आहे आणि सर्वात मोठी नोट एक लाखाची आहे.

खरेदी

  • योग्यकर्तात खरेदीची सुविधा आहे. ज्यांना खरेदी करायची आहे (विशेषत: प्रसिद्ध बाटिक कपडे) त्यांना तर प्रचंड वाव आहे. रस्त्यावरील खरेदीत प्रचंड घासाघीस करता येते, किंबहुना करावीच. अगदी भारतातल्यासारखीच!
  • बालीमध्ये काही विशिष्ट सुपरमार्केट असून तिथं भेटवस्तूंचे अनेक पर्याय मिळतात. श्रीकृष्ण मार्केट हे त्यासाठी प्रसिद्ध आहे. इंडोनेशियातील कॉफी प्रसिद्ध आहे, या कॉफीचे सुंदर लाकडी बॉक्सदेखील मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 2:12 am

Web Title: indonesia bali island
Next Stories
1 सुंदर माझं घर : सुबक सुगड
2 खाद्यवारसा : भरली वांगी
3 सांगे वाटाडय़ा : पूर्वाभ्यास गरजेचा
Just Now!
X