21 November 2019

News Flash

कुरुंदवाडचा मसाला वडा

३० वर्षांपासून प्रसिद्ध असा हा वडा नुसता किंवा कटवडा म्हणून खाल्ला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

वडापाव म्हटलं की तो मुंबईचाच हे समीकरण अगदी पक्कं झालं आहे. लादी पावात मावणारा छोटा वडा ते अगदी जंबो वडापावपर्यंत अनेक प्रकार आहेत. मुंबईच्या वडापावाची चटक हल्ली राज्यातील इतर शहरांनाही लागली आहे. काही ठिकाणी तो मुंबई वडापाव म्हणून विकला जातो. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ातला कटवडा हा पूर्वीपासूनचा पदार्थ आहे. मोठा बटाटावडा आणि काहीसा जाडाभरडा वाटणारा पण मऊ आणि त्रिकोणी पेटी पाव यांची जोडी या भागात प्रसिद्ध आहे. यामध्येच आणखी एक वडा आहे तो म्हणजे मसाला वडा.

हा केवळ एका गावापुरताच मर्यादित असलेला पदार्थ. दत्तक्षेत्र नृसिंहवाडीपासून दोन किलोमीटरवर असलेल्या कुरुंदवाडमध्ये तो मिळतो. आकाराने कटवडय़ासारखाच मोठा. पण आतमध्ये बटाटय़ाच्या भाजीऐवजी एक विशिष्ट अशा चटकदार मसाल्याचा गोळा भरलेला हा वडा इथलं वैशिष्टय़ आहे. बाजारपेठेतील स्वामी यांच्या हॉटेलात मिळणारा हा मसाला वडा ना अन्य कोणत्या हॉटलेमध्ये तयार होतो ना आजूबाजूच्या गावांत.

३० वर्षांपासून प्रसिद्ध असा हा वडा नुसता किंवा कटवडा म्हणून खाल्ला जातो. कुरुंदवाडचे निव्वळ खवा घोटून अजिबात साखर न घालता केलेले पेढेदेखील प्रसिद्ध आहेत. ते देखील पेढे तयार करणाऱ्या अवधूत यांच्या दुकानाचा शिक्का उमटवलेले असतात. तीन-चार दिवस टिकतात. कुरुंदवाड नृसिंहवाडीजवळ तर आहेच, पण खिद्रापूर येथील यादवकालीन शिवमंदिराच्या वाटेवरचे हे मोठे गाव आहे. त्यामुळे थोडी वाट वाकडी करून या मसाला वडय़ाची आणि पेढय़ांची चव घ्यायला हरकत नाही.

First Published on March 29, 2019 12:10 am

Web Title: kurundwad masala wada
Just Now!
X