आनंद लेले

मध्यंतरी फेसबुकवर ‘टेन इयर्स चॅलेंज’ लोकप्रिय झालं होतं. तेव्हा अनेकांनी प्रसारित केलेल्या जुन्या-नव्या फोटोंमधून हेच दिसत होतं की, माणूस दिवसागणिक बदलत असतो. पण तो नुसताच चेहऱ्याने बदलत नाही तर, विचारांनीही बदलतो. माझ्याही बाबतीत असंच घडलं.

मी शाळेत असताना लहानपणी दिवाळीत खूप फटाके फोडायचो. पण एका दिवाळी सुट्टीत मामाकडे गेलो असता त्याने फटाक्यांची गोष्ट आम्हा मुलांना सांगितली. अतिशय लहान मुलांचे अपहरण करून त्यांना तमिळनाडू येथे शिवकाशी शहरात नेले जाते. फटाके बनवण्याच्या कामाला जुंपले जाते. हे काम करत असताना चुकून स्फोटकांनी पेट घेतला तर प्रचंड मोठय़ा अपघातात लहान मुलांना आपला जीव गमवावा लागतो किं वा ते अपंग होतात. मामा आम्हाला म्हणाला, ‘ही मुलंसुद्धा तुमच्याच वयाची किं वा तुमच्यापेक्षा लहान असतात आणि चांगल्या घरातली असतात’.

ही गोष्ट तेव्हा माझ्या बालमनाला अत्यंत जिव्हारी लागली आणि वाटलं की, ‘अरे, हे कदाचित आपल्या बाबतीतही होऊ  शकलं असतं. पण आपण किती भाग्यवान आहोत’. मामाने त्याचं मत आमच्यावर मुळीच लादलं नाही. त्याच्या पुढच्या वर्षी फक्त रोषणाईचे आणि जास्त आवाज न करणारे फटाके उडवले आणि अजून थोडा मोठा झाल्यावर फटाके उडवणंच पूर्णपणे बंद केलं. पुढे इतरांना सुद्धा समाजातील वंचितांवर अन्याय्याकारी ठरणाऱ्या गोष्टींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू लागलो. वाढत्या वयाने आणखी एक गोष्ट शिकवली. आईने आपल्यासाठी कष्ट घेऊ न केलेल्या जेवणाला नावे ठेऊ  नयेत. तेव्हापासून खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी पूर्ण बंद केल्या आणि जे समोर येईल त्याला नावं न ठेवता खाऊ लागलो. इथे घरची व्यक्ती असली तरी तिचा मान राखण्याचा धडा मिळाला.लहानपणी फक्त कार्टून नाहीतर क्रिकेट या दोनच आवडी होत्या. राजकारण आणि बातम्या या नावडीच्या गोष्टी होत्या. टीव्हीवर बातम्या लागल्या असतील तर आईबाबा हे काय पाहतायात ? असं वाटायचं. काय चाललंय कळायचं नाही. पण जसजसं वय वाढू लागलं तसा त्यात वेगळाच रस निर्माण होऊ लागला. हळूहळू बातम्या पाहू लागलो. सुरुवातीला अजाणतेपणाने त्यावर मतप्रदर्शन करायचो. नंतर कळलं की, सर्वात जास्त महत्त्वाची असलेली राजकीय साक्षरता आपल्याकडे सर्वात जास्त दुर्लक्षित आहे.