ऋषिकेश बामणे

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रमुख खेळापैंकी फुटबॉल, बॉक्सिंग असे काही खेळ सोडल्यास सध्या बहुतांश क्रीडाक्षेत्रात ‘ऑफ पीरियड’ सुरू आहे. वर्षभरातील व्यग्र कार्यक्रमातून वेळ मिळाल्यानंतर काही क्रीडापटू विविध ठिकाणांच्या भटकंतीला पसंती देतात, तर काही भविष्यातील तारे घडवण्याच्या उद्देशाने क्रीडा अकादम्यांना भेट देतात. आजचे सदर हे अशाच काही निवडक खेळाडूंच्या ‘ऑफ द फिल्ड’ कामगिरीवर.

सुरुवात करायची झाल्यास सर्वात प्रथम डोक्यात विचार येतो तो म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा. क्रिकेटच्या मैदानावर सातत्याने १०० टक्के योगदान देणाऱ्या कोहलीच्या तंदुरुस्तीविषयी काही वेगळे सांगण्याची आवश्यकताच नाही. मालिकेच्या दरम्यान किंवा इतर देशांतील दौऱ्यावर असल्यास एक किंवा दीड तास जिममध्ये जाणारा कोहली सुट्टीच्या दिवशी मात्र तब्बल ४-५ तास स्वत:च्या शरीरावर मेहनत घेतो. कदाचित गेली अनेक वर्षे त्याच्या अप्रतिम शरीरयष्टीमागील हेच रहस्य असेल.

फॅशनचा आणि भटकंतीचाही कोहली तितकाच वेडा आहे. पत्नी अनुष्कासोबत न्यूझीलंडमधील विविध स्थळांना भेद देतानाचे या दोघांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर फार पसरले होते. त्याशिवाय विराटचे टेनिसप्रेम सर्वश्रुत आहे. महान माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अनुष्कासह आतापर्यंत तो अनेकदा विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांमध्ये आढळला आहे.

क्रिकेट सोडून फुटबॉल, बाइकस्वारी

याव्यतिरिक्त काही खेळाडू वेगवेगळ्या संस्थांसाठी सामने खेळतात. भारतीय क्रिकेटपटू व बॉलिवूड चाहत्यांमध्ये अशाच प्रकारचा एक फुटबॉल सामना गेली दोन वर्षे अंधेरीतील क्रीडा संकुलात आयोजित केला जात आहे. महेंद्रसिंह धोनीचे भारतीय जवानांविषयी असलेले प्रेम यापूर्वीसुद्धा अनेकवेळा आपण सर्वानी पाहिले आहे. वर्षांतून किमान दोनदा तरी सीमेवरच्या जवानांना भेट देत त्यांचा आनंद द्विगुणित करतो. याव्यतिरिक्त दुचाकीचा (बाईक) भन्नाट चाहता असलेला धोनी त्याच्याकडे असलेल्या मोटांरीपैकी दररोज एक-एक नवीन मोटार बाहेर काढून शहराची भटकंतीही करतो.

सिंधूचे ‘व्हॉलिबॉल’प्रेम

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे आई-वडील दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू असल्याने सिंधू फावल्या वेळेत कधी-कधी कुटुंबीयांसह व्हॉलीबॉल खेळते. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकनंतर सिंधूनेच या गोष्टीचा खुलासा केला होता. मात्र सध्या बॅडमिंटनच्या वाढलेल्या स्पर्धामधून तिला तिचा हा छंद जोपासण्यासाठी वेळ काढणे कठीणच जात असेल.

नदाल गुरुजींचा तास

लाल मातीचा बादशाह म्हणून जगभरात लोकप्रिय असलेला टेनिसपटू राफेल नदाल कोर्टवर जितका आक्रमक व चिडखोर स्वभावाचा वाटतो, तितका खऱ्या आयुष्यात मात्र नाही. स्पेनमधील मारलोका येथे नदालची टेनिस अकादमी सुरू असून तेथे असंख्य युवा खेळाडूंना टेनिसची बाराखडी शिकवली जाते. त्याशिवाय ऑक्टोबर, २०१८मध्ये येथे आलेल्या महापुरात अनेकांनी स्वत:चे घर गमावले. अशा वेळी नदालने त्यांच्यासाठी अकादमीत मोफत राहण्याची सोय करत स्वत:देखील शहराच्या स्वच्छतेसाठी पुढे सरसावला होता.