युरोपात भटकताना चीजचे अनेक प्रकार पाहायला, चाखायला मिळतात. युरोपातील स्लोव्हाकिया हेदेखील एका खास चीजसाठी प्रसिद्ध आहे. तिथे पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत. विशेषत: मध्ययुगीन राजवाडे (कॅसल) प्रसिद्ध आहेत; पण स्लोव्हाकियाच्या डोंगराळ भागांत गेल्यावर अगदी स्थानिक असे चीज मिळते. कोरबाचिक, म्हणजे लिटिल व्हिप म्हणजेच चाबूक. हे चीज दिसतेदेखील अगदी चाबकाच्या वळ्याप्रमाणे. या वळ्या तयार करणे हे येथील स्थानिक महिलांचे कौशल्य.

ओरवाच्या डोंगराळ भागात प्रामुख्याने हा पदार्थ मिळतो. पूर्णपणे बकरीच्या दुधापासून तयार केलेला हे चीज शेवटच्या टप्प्यात चक्क्याप्रमाणे कापडात बांधून टांगून ठेवले जाते. चीज तयार होत आले की तो गोळा गरम पाण्यात टाकला जातो आणि त्यापासून वळ्या खेचून काढल्या जातात आणि नंतर त्या वळ्यांची आकर्षक मांडणी केली जाते.

याचे स्मोक्ड आणि अनस्मोक्ड असे दोन प्रकार पडतात. स्मोक्ड चीज तयार करण्यासाठी स्मोक रूम असतात. मंद धुरावर चीज टांगून ठेवले जाते. दोन्ही चीजची चव खारट असते. हे चीज विशेषत: वाइनबरोबर खाल्ले जाते. शक्यतो ताजे चीज खाण्याला अधिक प्राधान्य दिले जाते.

हा प्रकार स्थानिक उद्योग म्हणून केला जातो. हल्ली एक-दोन ब्रॅण्ड आले आहेत; पण नाताळ आणि ईस्टरच्या वेळी किंवा अन्य महोत्सवांत हा प्रकार हमखास मिळतो. नाताळ वगैरे काळात या चीजपासून विविध इमारती, मूर्ती वगैरेदेखील साकारल्या जातात.