|| ओंकार वर्तले

साधारण दिवाळी संपली की सर्वाना भटकंतीचे वेध लागतात. पर्यटनाच्या दृष्टीने हा ऋतू सर्वोत्तम असतो. गुलाबी थंडी, आल्हाददायक वातावरण, धुक्याची दुलई यामुळे या दिवसांत फिरण्याची मजा काही औरच! उन्हाचा त्रासही जाणवत नाही आणि दमछाकही होत नाही. अशा वेळी जवळच्या पण गर्दी नसलेल्या ठिकाणांचा शोध सुरू असतो. ठिकाणाची निवड अचूक असेल तर भटकंतीचा आनंद द्विगुणित होतो. मावळ तालुक्यात अशी आडवाटेवरची खूप ठिकाणे आहेत, जी सर्वसामान्य पर्यटकांच्या नकाशावर आलेली नाहीत. त्यामुळे तिथे निवांतपणे फिरत येऊ  शकते. जंगल-किल्ला-मंदिर-लेणी-ऐतिहासिक स्मारके असे विविध पर्याय येथे आहेत.

अजिवलीची देवराई

मुळातच ‘देवराई’ कमीच शिल्लक राहिल्या आहेत. पवनमावळातल्या पवना धरणाच्या काठी अजिवली या गावात एक सुंदर देवराई आहे. लोणावळ्याहून सहारा रस्त्यावरील घुसळखांब फाटय़ामार्गे चावसर गावावरून अजिवली या गावात येता येते किंवा पुण्यावरून पौडफाटा गाठून हाडशी व जवण मार्गेही येथे जाऊ शकता. या गावात आलो की तुंगी किल्ल्याचे विलोभनीय दृश्य दिसते. तसेच पवना धरणाचे बॅकवॉटरही नयनरम्य आहे. येथे विविध प्रजातींचे पक्षी आहेत. याच गावात एक छान देवराई आहे. गावकऱ्यांनी जोपासलेली ही देवराई एखाद्या छोटय़ा जंगलाप्रमाणेच भासते. या देवराईचं संवर्धनही ग्रामस्थ मनापासून करतात. यात वाघजाई देवीचं मंदिर आहे. घरून जेवणाचे डबे घेऊन सहकुटुंब गेल्यास वनभोजनाचा आनंदही लुटता येतो.

‘मोरगिरी’च्या वाटेवर ..

हा मोरगिरी उभा आहे, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ. हा पुण्यातील मावळ तालुक्याच्या पश्चिमेला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला लोणावळ्याहून सहारा रस्त्यामार्गे घुसळखांब फाटय़ावरून तुंग गावाच्या दिशेला यावे लागते. पण आपण मात्र तुंग गावात जायचे नाही, तर घुसळखांब फाटय़ावरून तुंग रस्त्यावरच एक-दोन किलोमीटरवर असणाऱ्या कातकरी वस्ती जवळ यायचे. कातकरी वस्तीवरून थेट मोरगिरीकडे निघायचे. शक्यतो वाटाडय़ा घेतला तर चुकण्याची शक्यता कमी असते. परंतु या मार्गावर एका ट्रेकिंग ग्रुपने बऱ्याच ठिकाणी बाणांच्या खुणा केलेल्या दिसतात, वर जाण्यासाठी यांचा फार उपयोग होतो. गडाचा माथा अत्यंत छोटा असून यावर पाण्याच्या दोन टाक्याही दिसतात. बाकी तटबंदीचे, बुरुजाचे, दरवाजाचे अवशेष मात्र दिसत नाहीत. माथ्यावरून दिसणारा परिसर मात्र डोळ्यांचे पारणे फेडतो. जिकडे पाहावे तिकडे, चहूबाजूंनी अवाढव्य सह्याद्री दिसतो. मोरगिरी हे ठिकाण केवळ कसलेल्या डोंगर यात्रींसाठीच आहे.

वडगाव लढाईचे स्मारक

पुणे-मुंबई या राष्ट्रीय रस्ते महामार्गावर वडगाव-मावळच्या जवळ एक ऐतिहासिक ठिकाण आपल्याला थांबवते. हे स्मारक मराठय़ांच्या शौर्याचे प्रतीक आहे. १७७८ साली इंग्रज आणि मराठे यांच्यात पहिली लढाई झाली. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या युद्धात मराठी फौजांनी इंग्रजांचा मोठा पराभव केला. त्या विजयाप्रीत्यर्थ हे स्मारक उभारले गेले आहे. महादजी शिंदे यांचा पुतळा, दीपमाळ व सुंदर बगीचा आहे. या ठिकाणाला भेट देऊन आपल्या इतिहासाची ओळख करून घेणे गरजेचे आहे.

भंडारा लेणी

संत तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भंडारा डोंगर हे एक मोठे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. याच डोंगराच्या पश्चिमेस एक बौद्ध लेणी आहे, हे बहुतेकांना माहीत नाही. हजारो वर्षांपूर्वी खोदलेल्या या लेणींत जाण्यासाठी भंडारा डोंगराच्या माथ्यावरूनच एक वाट आहे. अगदी डोंगरावरील दुकानदारांना जरी विचारले तरी ते वाट दाखवतात. वाट रुळलेली आहे. खोदीव पायऱ्या, एक सुस्थितीतील विहार, आणि एक स्तूप दिसतो. या लेणी सभोवताली भरपूर झाडी आहे. खूप शांतता अनुभवायला मिळते. तळेगाव-चाकण रस्त्यावर भंडारा डोंगर आहे. येथे वपर्यंत वाहन जाते. भंडारा डोंगरावरून मावळ तालुक्याचे खूप सुंदर दर्शन घडते.

इंदोरीचा भुईकोट

तळेगाव-चाकण रस्त्यावरून जाताना इंदोरी गावाजवळ हमखास दिसणारा भुईकोट म्हणजे इंदोरी. इंद्रायणी नदीच्या पात्रामुळे याची एक बाजू नैसर्गिकपणे संरक्षित झाली आहे. मराठेशाहीतील पराक्रमी सरदार खंडेराव दाभाडे यांनी या किल्ल्याची निर्मिती १७२०-२१ मध्ये केली. भव्य बुरुज आणि खणखणीत तटबंदी ही या किल्ल्याची वैशिष्टय़े आहेत. हा किल्ला पाहून पहिले बाजीराव पेशवे यांनी शनिवारवाडा बांधल्याचे सांगितले जाते. इंद्रायणीच्या वळणदार आणि रुंद पात्रामुळे हा किल्ला आणखीनच देखणा झाला आहे.

ovartale@gmail.com