सुकन्या ओळकर

युरोपात भटकताना काही खास पदार्थ खायला मिळतात. हल्ली तिकडे भारतीय पदार्थ मिळत असले तरी मुद्दाम त्यांचे असे खास पदार्थ चाखून पाहावेत. पाव हा पाश्चात्त्य खाद्य संस्कृतीतला एक अविभाज्य घटक आहे. आपल्याकडे जसे पोळी, रोटी, नान, फुलके, पराठे इत्यादी प्रकार दिसतात तसेच युरोप किंवा अमेरिकेत पावाचे प्रकार आढळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ‘प्रेतझेल’.

नाडी बांधल्यावर गुंता होतो तसा याचा आकार असतो. असं म्हणतात की काही युरोपियन भिक्षुकांनी हा प्रकार पहिल्यांदा तयार केला. निव्वळ पीठ आणि पाण्यापासून प्रेतझेल तयार करत असल्यामुळे ख्रिस्ती धर्मात याला खूप महत्त्व आहे. विशेष म्हणजे लेन्ट (गुड फ्रायडेच्या आधीचा ४० दिवसांचा पवित्र काळ) पाळतानासुद्धा हे खाल्ले जाते. जर कोणी कोणाला प्रेतझेल दिले तर ते भाग्याचे लक्षण मानले जाते. अशा खूप आख्यायिका या प्रेतझेलशी जोडलेल्या आहेत. जर्मन बोलीभाषेत याला ९-१० वेगळी नावं आहेत. हा नुसता पाव नसून त्यावर मीठ, तीळ, खसखस, जिरे, सूर्यफुलाच्या व भोपळ्याच्या बिया चिकटवलेल्या असतात. बटर किंवा चीज प्रेतझेल तर मुलांना फार आवडते. हा पदार्थ आपण न्याहारीपासून जेवणापर्यंत कधीही खाऊ  शकतो. युरोपच नव्हे तर अमेरिकेतदेखील तो प्रसिद्ध आहे.

जर्मनीतील बव्हेरिया प्रांतामध्ये व्हाइट-सॉसेजबरोबर प्रेतझेल आणि मोहरीचा सॉस खाल्ला जातो. थोडी भूक लागली असेल आणि पटकन काही खावेसे वाटले तर खाण्यासारखा हा पदार्थ युरोपवारीत नक्की खावा.