News Flash

व्हॉट्सअ‍ॅपचा गमावलेला डेटा

बॅकअप’च्या माध्यमातून नियमित कालावधीत तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशांना गुगल ड्राइव्हवर साठवून ठेवत असते.

व्हॉट्सअ‍ॅपचा गमावलेला डेटा
(संग्रहित छायाचित्र)

व्हॉट्सअ‍ॅपचा वापर आता सार्वत्रिक झाला आहे. स्मार्टफोन वापरातील आपला बहुतांश वेळ व्हॉट्सअ‍ॅपवर जात असतो. अगदी दर सेकंदाला आपल्या व्हॉट्सअ‍ॅपवर नोटिफिकेशन येतच असतात. या संदेशांमध्ये फोटो, व्हिडीओ यांचाही समावेश असतो. हे फोटो, व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये साठवले जात असल्याने फोनची स्टोअरेज क्षमता भरून जाते. मग आयत्यावेळी आपण घाईगडबडीत व्हॉट्सअ‍ॅपचे फोटो किंवा व्हिडीओ डिलिट करून जागा मोकळी करतो. परंतु, हे करताना आपल्याला हवे असलेले किंवा आपण आवर्जून साठवून ठेवलेले फोटो किंवा व्हिडीओही डिलिट होतात. तुमच्यासमोर कधी असा प्रश्न पडला असेल तर आमच्याकडे त्यावर उपाय आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर तुमच्याकडून कळत-नकळत डिलिट झालेले व्हिडीओ, फोटो किंवा मेसेज पुन्हा मिळवता येणे शक्य आहे.  ही प्रक्रिया जाणून घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सर्वप्रथम तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमधील ‘बॅकअप’ पर्याय सतत सुरू असला पाहिजे. ‘बॅकअप’च्या माध्यमातून नियमित कालावधीत तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशांना गुगल ड्राइव्हवर साठवून ठेवत असते. त्यामुळे गमावलेला डेटा तुम्हाला यावरून मिळू शकतो. मात्र, ‘बॅकअप’ पर्याय कार्यान्वित नसेल तर मात्र तुम्ही काही करू शकणार नाही.

दुसरे म्हणजे,  या प्रक्रियेत तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप आधी अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करावे लागते. ही प्रक्रिया सुरू असतानाच्या कालावधीत येणारे संदेश तुम्हाला कदाचित मिळू शकणार नाहीत. तसेच तुमचे शेवटचे बॅकअप आणि मेसेज डिलिट होण्यापर्यंतच्या कालावधीतील महत्त्वाचे संदेशही गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे जर तुम्ही डिलिट केलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा असेल तरच, ही प्रक्रिया स्वत:च्या जबाबदारीवर हाताळा.

मोबाइलमधील बॅकअपद्वारे..

* तुमच्याकडे अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन असेल तर मोबाइलच्या फाइल मॅनेजरमध्ये जा. तेथे तुम्हाला ‘व्हॉट्सअ‍ॅप’ हे फोल्डर दिसेल. ते सुरू करून ‘डेटाबेस’वर क्लिक करा. या फोल्डरमध्ये तुमच्या सर्व व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप फाइली उपलब्ध असतात. यातील ‘msgstore.db.crypt12’ ही फाइल निवडा आणि तिला ‘msgstore_BACKUP.db.crypt12’ या नावाने ‘रिनेम’ करा. ही फाइल तुमची सध्याची बॅकअप फाइल असून ती ‘ओव्हरराइट’ होऊ नये, म्हणून तिला ‘रिनेम’ करणे आवश्यक आहे. जर समजा तुम्हाला आधीचा बॅकअप मिळाला नाही तर, ही फाइल पुन्हा तिच्या जुन्या नावाने ‘रिनेम’ करून तुम्ही सर्व संदेश पुन्हा मिळवू शकाल.

* ‘डेटाबेस’ फोल्डरमध्येच तुम्हाला ‘msgstore_BACKUP.db.crypt12’’ अशा स्वरूपातील फायली दिसतील. या तुमच्या जुन्या ‘बॅकअप’ फायली असून त्यात तुमचे आधीचे मेसेज जमा असतात. यातली तुम्हाला हव्या त्या कालावधीतील फाइल निवडून तिला ‘msgstore.db.crypt12’ या नावाने ‘रिनेम’ करा.

*  आता तुम्हाला तुमच्या ‘गुगल ड्राइव्ह’वर जावे लागेल. तेथे तीन उभ्या रेषा असलेल्या आयकॉनवर क्लिक करताच तुम्हाला ‘बॅकअप’ हा पर्याय दिसेल. तो खुला करून त्यामधील व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप डिलिट करा. जेणेकरून तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला फोनमधील बॅकअपचा आधार घ्यावा लागेल.

*  आता व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा. प्राथमिक नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ‘रिस्टोअर’विषयी विचारणा केली जाईल. ती करा आणि आपला जुना डेटा परत मिळवा.

लक्षात ठेवा

ही प्रक्रिया खात्रीशीर असली तरी, त्यामध्ये चूक झाल्यास तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचा इतर डेटाही तुम्हाला गमवावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडा. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला डिलिट झालेल्या मेसेजची आत्यंतिक गरज असेल तरच हा मार्ग निवडा.

‘क्लाऊड’द्वारे बॅकअप घेण्यासाठी..

*  तुमच्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप अनइन्स्टॉल करा आणि लगेच नव्याने हे अ‍ॅप इन्स्टॉल करा.

* अ‍ॅपवरील नोंदणी प्रक्रिया पूर्ण करताच तुम्हाला हे अ‍ॅप ‘बॅकअप’मधून ‘रिस्टोअर’ करण्याविषयी विचारणा करेल. ‘रिस्टोअर’ करताच तुम्हाला तुमचे सर्व संदेश मिळू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 12:17 am

Web Title: whatsapp lost data backup abn 97
Next Stories
1 घरातलं विज्ञान : दूध उतू का जातं?
2 नवलाई : ‘रिअलमी’चा चौकॅमेरा
3 परदेशी पक्वान्न : कुर्जेत रोस्टी विथ सार क्रीम
Just Now!
X