धनुष्यावर लावलेला बाण खेचण्याची कृती या आसनातून प्रकट होते म्हणून त्यास आकर्ण धनुरासन असे म्हणतात. हे आसन थोडे अवघड असल्याने काळजीपूर्वक आणि योगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे. या आसनामुळे हाताचे स्नायू बळकट होतात. पोटाला आणि छातीलाही चांगला व्यायाम मिळतो. त्याशिवाय हाता-पायांचे सांधे, मानेचा सांधा व स्नायू आणि पाठीच्या कण्यालाही ताण मिळत असल्याने तेही बळकट होण्यास मदत होते.

कसे करावे?

* प्रथम दोन्ही पाय पसरून एकमेकांजवळ घ्यावेत आणि डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या मांडीवर घ्यावा.

* डाव्या हाताने पसरलेल्या उजव्या पायाचा अंगठा धरावा आणि उजव्या हाताने डाव्या हाताखालून येणाऱ्या डाव्या पायाचा अंगठा धरून तो पाय उजव्या कानाजवळ आणावा.

* शक्यतो ताठच बसावे. पायाचा ताण क्रमाक्रमाने वाढवत न्यावा. श्वसन संथ असावे.

* आसनस्थितीत काही सेकंद थांबावे. सुरुवातीला जितका वेळ थांबता येईल तितकाच वेळ थांबावे.

* आता पायाला अलगद खाली आणावे. हात मोकळे करावे. काही वेळ थांबून हेच आसन दुसऱ्या बाजूने करावे.