किन्नरी जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन्डिड’ अशी म्हण आहे. गरजेला म्हणा वा अडचणीत जो धावून येतो, तो खरा मित्र! पण खऱ्या मैत्रीची गरज व्यवसायातही लागते, याचे उत्तम उदाहरण महाविद्यालयीन शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींनी घालून दिले आहे. एकत्र येऊन खाद्यपदार्थ बनवायचे. गाणं गायचं वा एखाद्या बडय़ा कार्यक्रमाचं आयोजन करण्याचे ध्येय तीन गटांनी केलं आहे. त्यांच्या या ध्येयवेडय़ा प्रवासाविषयी.

नेटके आयोजन

साठय़े महाविद्यालयात एकत्र शिकणारे कल्पेश बावसकर आणि चेतन साळवी हे दोघे मित्र. महाविद्यालयातच असताना एका खासगी सांस्कृतिक महोत्सवासाठी गेले होते. या महोत्सवात काही काम केल्यावर महोत्सव आयोजनातही उत्तम करिअरच्या संधी आहेत, याची जाणीव या दोघा मित्रांना झाली आणि इथून या दोघांचा प्रवास सुरू झाला तो गेली चार वर्षे कायम आहे. कॉर्पोरेट सभा, महोत्सव, सांस्कृतिक महोत्सव, लग्न, फॅशन शो, बॉलीवूड शो, बॉलीवूड पार्टी या सगळ्या कार्यक्रमांचे नियोजन कल्पेश आणि चेतन करतात. या महोत्सवाच्या आयोजनातून दोघा मित्रांनी आर्थिक बाजू भक्कम केली आहे. आतापर्यंत ७० पेक्षा अधिक महोत्सवाचे नियोजन या दोघांनी केले आहे. सध्या स्वत:ची इव्हेंट कंपनी सुरूकरण्यासाठी हे दोघे प्रयत्नशील आहेत.

खा, प्या, मजा करा!

ते चार मित्र-मैत्रिणी, त्यातील दोन मित्र आणि दोन मैत्रिणी. सागर रणशूर आणि वर्षां गोडांबे हे एकाच महाविद्यालयातील विद्यार्थी. नोकरी करण्यापेक्षा आपला स्वत:चा काहीतरी व्यवसाय असावा हे त्यांनी सुरुवातीलाच ठरवले होते. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर एक वर्षे या दोघांनी नोकरी करून काही पैसे कमवले. आता वेध होते व्यवसायाचे. त्या दोघांना स्वत:चे रेस्टॉरंट सुरू करायचे होते. काही पैसे जमले होते पण खाद्यपदार्थ बनवण्यासाठी शेफ नव्हते. एका दिवशी सागरने हॉटेल मॅनेजमेंट केलेला आपला मित्र शाल्विकला संपर्क केला. शाल्विक आणि श्रुतिका त्यावेळी एकत्रच होते. श्रुतिका हिनेही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले होते. आश्चर्य म्हणजे, या दोघांनाही स्वत:चे रेस्टॉरंट सुरू करायचे होते, पण पैसे नव्हते आणि आणखी सोबत हवी होती. सागरने संपर्क साधल्यावर या चार मित्र-मैत्रिणींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. दोन-तीन महिन्यांत शाल्विक आणि श्रुतिकाने नवीन खाद्यपदार्थावर काम केले. साधारण ९० खाद्यपदार्थाचे प्रकार बनवल्यावर त्यातील उत्कृष्ट १२ खाद्यपदार्थ खवय्यांसाठी द्यायचे ठरवले. व्यवसायासाठी लागणारे कर्जाची प्रक्रिया सागर आणि वर्षांने सांभाळली. आज या चौघांचे ठाण्यात ‘टकिन स्केअर’ नावाचे रेस्टोरंट खाद्यपदार्थाच्या गर्दीत स्वत:चे वेगळेपण टिकवून आहे.

केवळ गप्पा, पाटर्य़ा नाही..

महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणी. एकत्र अभ्यास करतात. वयाने मोठे असताना काही सवंगडी करिअरच्या प्रवासातही एकत्रच राहण्याचा विचार करतात. या निखळ मैत्रीच्या नात्याला जोड मिळते व्यावसायिक नात्याची. महाविद्यालयीन प्रवास संपल्यावर यांना वाट खुणावत असते ती स्वत:चे काहीतरी वेगळे करण्याची. मैत्रीच्या नात्याने ओळखत असतानाच एखाद्या व्यवसायाचे प्रमुख म्हणून ओळख व्हावी, मैत्रीतील विश्वासाच्या बळावर  एखादा व्यवसाय उभा राहावा आणि आर्थिक बाजू भक्कम व्हावी या उद्देशाने मित्र-मैत्रीण एकत्र येऊन काहीतरी कल्पना साकारतात. आजवर मैत्रीच्या नात्याला व्यावसायिक ध्येयाची जोड मिळते आणि अर्थार्जनाला पूरक असा मित्र-मैत्रिणींचा व्यवसाय सुरू होतो. केवळ गप्पा, पार्टी, सहल यापुरतेच मर्यादित न राहता व्यवसायातील संधीचे सोने केले आहे.

स्वरांचे सहप्रवासी..

महाविद्यालयीन स्तरावरील गायन स्पर्धा, विद्यापीठाच्या स्पर्धा यात खूप यश त्यांना मिळत होते. महाविद्यालयीन स्तरावर खूप कौतुक होत होते. पण गाण्याला दाद देणारा श्रोता एका मर्यादेपर्यंत सीमित होता. हा श्रोतावर्ग मोठय़ा स्तरावर वाढवणे आता त्यांचे ध्येय होते. एकाच महाविद्यालयात शिकणारे रोहन पाटील, प्रतीक्षा पांढरे, राहुल शहा आणि सुमित कनबरकर हे मित्र-मैत्रीण पूर्वाग एन्टरटेन्मेंट या संस्थेमार्फत गाण्याचे अनेक कार्यक्रम करत आर्थिक बाजू सांभाळतात. या चार जणांची भूमिका महत्त्वाची असली तरी संपूर्ण गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन उत्तम होण्यासाठी २५  कलाकार एका वेळी व्यासपीठावर असतानाच २५ जणांचा समूह पडद्यामागची धुरा सांभाळत असतात. प्रत्येकवेळी कार्यक्रमात काहीतरी नावीन्य देण्याचा या समूहाचा प्रयत्न असतो. ठाणे, मुंबईतील नाटय़गृहात या समूहाचे कार्यक्रम सादर होत असतानाच दूरचित्रवाणीवरील अनेक संगीत कार्यक्रमात आपले संगीत कौशल्य या मित्रांनी सिद्ध केले आहे. स्वरांजली, संगीत फॅक्टरी, सा से सा, पंचम द मॅजिक असे अनेक कार्यक्रम आयोजित करून या मैत्रीने आपले व्यावसायिक गणित सांभाळले आहे.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about business friendship
First published on: 28-11-2018 at 02:34 IST