विजय दिवाण

ऑस्ट्रेलियातील सगळेच रहिवासी इंग्लंडमधील लोकांसारखेच गोरे असतात असा समज दिसतो. पण गोरे लोक हे काही ऑस्ट्रेलियातील मूळचे स्थानिक रहिवासी नव्हेत. ते १८ व्या शतकात युरोपातून तिथे दाखल झाले, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हे जर खरे असेल तर मग ऑस्ट्रेलियातले मूळचे रहिवासी कोण? या प्रश्नाचे ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात केर्न्‍स प्रांतात मिळते. तिथे ज्जापुकाई हे ऑस्ट्रेलियातील मूलनिवासींचे केंद्र आहे.

ऑस्ट्रेलियातील इतिहासतज्ज्ञांच्या मते प्राचीन काळापासून ऑस्ट्रेलियात स्थानिक लोक हे काळे किंवा गहूवर्णीयच होते. त्यांना इंग्रजीमध्ये ‘अ‍ॅब्ओरिजिनल’ (मूलनिवासी) म्हटले जाते. हे मूलनिवासी सुमारे ६५ हजार वर्षांपासून तिथे वास्तव्य करून आहेत. काही मानववंश-शास्त्रज्ञांच्या मते आजच्या जगातल्या बहुतेक मानवी प्रजाती या सुमारे २ लाख ७० हजार वर्षांपूर्वी आफ्रिका खंडातून इतरत्र स्थलांतरित झाल्या होत्या. ऑस्ट्रेलिया खंडातील मूलनिवासी लोकही त्यांच्यापैकीच एक आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मते ऑस्ट्रेलियातील मूलनिवासी आग्नेय आशियातून समुद्रमार्गे ऑस्ट्रेलियात दाखल झाले, तर काहींच्या मते ईशान्य ऑस्ट्रेलियातील अरुंद टोरेस खाडीमधील लहान लहान साखळी बेटांवरून हे लोक ऑस्ट्रेलियाच्या मुख्य-भूमीत दाखल झाले. ऑस्ट्रेलियन मूलनिवासी हे दक्षिण भारतातून छोटय़ा छोटय़ा नौका घेऊन ऑस्ट्रेलियात आले असाही सिद्धांत आहे. यातील कोणताही सिद्धांत खरा मानला, तरी गोरे इंग्रज हे १८ व्या शतकात जेव्हा इथे आले, तेव्हा ऑस्ट्रेलियात जागोजागी सुमारे सात ते दहा लाख मूलनिवासी होते, हे उघड आहे.

या मूलनिवासींच्या तीन-चार प्रमुख जमाती होत्या. अनांगु पिज्जान्जात्जारा, अर्रेरन्ते, ज्जाबुगाई आणि अनांगु लुरित्जा. नंतरच्या काळात या खंडाजवळच्या सुलावेसी, न्यू-गिनी, तिमोर आणि इतर बेटांवरून आणखी काही दक्षिणपूर्व-आशियायी जमातीही ऑस्ट्रेलियात दाखल झाल्या. हे सर्व मूलनिवासी विमुक्त भटके जीवन जगणारे होते. ते लाकडांवर लाकूड घासून अग्नी पेटवत. रानोमाळ फिरून फळे-झाडपाला गोळा करून किंवा शिकार करून आणि थोडीबहुत शेती करून गुजराण करत. १७८८ नंतर इंग्लंडमधून आलेल्या गोऱ्या वसाहतकारांकडून यांतले बरेच मूलनिवासी मारले गेले. बरेचसे निरनिराळ्या साथीच्या रोगांना बळी पडले. त्यामुळे १७८८ ते १९३० या काळात ऑस्ट्रेलियन मूलनिवासींची लोकसंख्या १२ लाखांपासून झपाटय़ाने कमी होत अवघी ५० हजारांवर आली. त्याउलट इंग्लंड आणि युरोपमधून ऑस्ट्रेलियात आलेल्यांची संख्या बेसुमार वाढत गेली. या एकविसाव्या शतकात तर या मूलनिवासी जमातींची एकूण संख्या फारच रोडावलेली आहे. २०१६ साली ऑस्ट्रेलियात झालेल्या जनगणनेची आकडेवारी पाहिली तर आजच्या ऑस्ट्रेलियन समाजात तब्बल ७६.८ टक्के गोरे लोकच आहेत. सर्व बाहेरून आलेल्या लोकांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियातील मूलनिवासींची संख्या केवळ २.८ टक्के उरली आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्यातल्या पर्वतीय जंगलांत राहणाऱ्या ज्जाबुगाई जमातीच्या मूलनिवासींनी सुमारे ३० वर्षांपूर्वी केर्न्‍स येथे ‘ज्जापुकाई’ नावाचे एक सामाजिक-सांस्कृतिक केंद्र सुरू केले. या केंद्रातर्फे तिथल्या मूलनिवासींची संस्कृती, त्यांची पारंपरिक जीवनपद्धती, त्यांच्या कला, चालीरीती इत्यादींचे संवर्धन करण्यात येते. कैर्न्‍समध्ये उंच खांबांवरून तिथल्या घनदाट पर्जन्यवनाच्या माथ्यावरून एक स्काय-रेल गाडी धावते. या स्काय-रेलच्या ‘काराव्होनिका’ नावाच्या स्थानकाजवळ हे ज्जापुकाई केंद्र आहे. या केंद्रात त्या समाजातील युवकांना त्यांच्या पारंपरिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना रोजगारक्षम बनवले जाते. तसेच कैर्न्‍स भागात येणाऱ्या देशी-परदेशी पर्यटकांना इथल्या कुरांडा परिसरातील घनदाट अरण्यात हजारो वर्षांपासून राहणाऱ्या ज्जाबुगाई जमातीच्या संस्कृतीची ओळख करून देणारे कार्यक्रमही हे केंद्र आयोजित करते. तिथे त्यांचा नृत्य-नाटय़-संगीताने परिपूर्ण असा एक तासाचा कार्यक्रम सादर केला जातो. कार्यक्रम संपल्यानंतर शेवटी बाहेरच्या पटांगणात ते ‘बुमरँग’ हे हत्यार कसे फेकायचे आणि भाला फेकून शिकार कशी करायची याची प्रात्यक्षिकेही दाखवतात. पर्यटकांनाही बुमरँग फेकण्याचा प्रयत्न करून पाहण्याची संधी दिली जाते.

भारतापासून तब्बल ९ हजार किलोमीटर एवढय़ा दूरच्या अंतरावर, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात, ऑस्ट्रेलिया खंडावरील एका घनदाट पर्जन्यवनात, गेली ६५ हजार वर्षे नांदत असलेल्या एका आदिम संस्कृतीची अतिशय संस्मरणीय अशी झलक या केंद्रात पाहायला मिळते. या स्मृती पर्यटकांसाठी अत्यंत मोलाच्या ठरतात.

ज्वाला नृत्य, शिकारकथा

  • केंद्रातील कार्यक्रमात ‘ज्वाला-नृत्य’ सादर केले जाते. लाकडावर लाकूड घासून अग्नी प्रज्वलित करणे हा त्यांच्या पिढीजात कौशल्याचा एक भाग आहे. परंतु आता तो त्यांचा एक पवित्र विधी बनला आहे. दोन लाकडांच्या घर्षणाने अग्नी पेटवून, प्रथम त्याची ‘पूजा’ केली जाते, मग त्याभोवती नृत्य केले जाते आणि नंतरच ते अग्नीचा वापर करतात.
  • त्यांच्या कार्यक्रमांत शिकारीच्या कहाण्या, कांगारूंची गाणी, कासोवारी आणि क्रौंच पक्ष्यांची गाणीही सादर केली जातात. सर्प-नृत्याचाही समावेश असतो. या सर्व कार्यक्रमांत कलाकार ‘दिज्जेरिडू’ नावाची एक लांबलचक लाकडी पुंगी वाजवतात. जंगलात वाळवीनी पोखरून पोकळ केलेल्या झाडाच्या खोडापासून ही पुंगी तयार केली जाते.

vijdiw@gmail.com