अमित सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील सह्य़ाद्रीच्या रांगांवर ऊन, वारा, पाऊस आणि वाहते पाणी यांच्या वर्षांनुवर्षे होणाऱ्या माऱ्यामुळे त्यांची झीज होऊन अनेक भौमितिक आकार आणि रचना तयार झालेल्या आहेत. नेढ ही रचना त्यापैकीच एक आहे. नेढ या शब्दाचा अर्थ सुईच्या टोकाला दोरा ओवण्यासाठी असलेले छिद्र. सह्य़ाद्रीच्या डोंगरमाथ्यांना नैसर्गिकरीत्या पडलेल्या अशा छिद्रांना नेढ म्हणतात. सह्य़ाद्रीत अशी अनेक नेढी आहेत. महाबळेश्वरच्या एलिफंट पॉइंटवरून दिसणारे नेढे, सप्तशृंगी गडावरून दिसणारे नेढे ही सर्वसामान्यांना माहिती असणारी नेढी आहेत. याशिवाय सह्य़ाद्रीत भटकणाऱ्यांना मदनगड, मोहनदर (शिडका किल्ला), सोनगीर इत्यादी  गडावरील नेढीही माहीत असतात. त्यात ते उतरलेले असतात किंवा पार करूनही गेलेले असतात.

कोटय़वधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सह्य़ाद्रीची निर्मिती झाली आहे. त्या काळी जमिनीतून लाव्हारस बाहेर येऊन जमिनीवर पसरत असे. काही काळाने हा थर थंड होऊन पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक होई. अशा प्रकारे लाव्हारसाचे थर एकावर एक बसून सह्य़ाद्रीची निर्मिती झालेली आहे. यातील काही भाग किंवा थर ठिसूळ असल्याने ऊन, वारा, पाऊस यांच्यामुळे त्यांची मोठय़ा प्रमाणावर झीज होत असते. वेगाने वाहाणारा वारा ठिसूळ थरातील माती वाहून नेतो. पावसाचे पाणी या भागात शिरून आपल्याबरोबर माती वाहून नेते. फटीमध्ये साचून राहिलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते. त्याच्या दाबाने दगडांना भेगा पडतात. उन्हाळ्यात तापलेल्या दगडावर पाणी पडून भेगा पडतात. अशा रीतीने सतत बदलणाऱ्या वातावरणाचा, तापमानाचा परिणाम होऊन या ठिसूळ भागाची झीज होत जाते. अशा प्रकारे डोंगराला छिद्र पडले की वारा, पाणी त्याला आत आत कोरत जाते आणि डोंगराच्या आरपार भोक पडले तर नेढे तयार होते.  अन्यथा गुहा तयार होते. या प्रक्रियेचा वेग अनेक घटकांवर अवलंबून असल्याने अतिशय मंद असतो. (वर्षांला एक सेंटिमीटर इतकी कमी झीजही होऊ  शकते.) त्यामुळे अशा प्रकारे नेढे तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागू शकतात.

चेमदेवला पोहोचण्यासाठी अहमदनगर जिल्ह्य़ातील, नगर तालुक्यात असलेले खिरवीरे गाव गाठावे लागते. या गावाच्या पुढे एक कच्चा रस्ता धारवाडीत जातो. धारवाडीच्या मागे चेमदेवचा डोंगर उभा आहे; पण चेमदेववर जाणारी पायवाट चेमदेवच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगरावरून आहे. चेमदेवचा डोंगर आणि त्याच्या बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी दाट झाडीचा पट्टा आहे. या झाडीतून चढत गेल्यावर पायवाट दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचते. खिंडीत लाकडी फळ्यांवर कोरलेले वाघदेव आहेत. शेंदूर फासल्यामुळे आणि झीज झाल्यामुळे ते ओळखण्यापलीकडे गेलेले आहेत. वाघदेव पाहून खिंडीतल्या वाऱ्याचा आनंद घेऊन चेमदेव डोंगरावर चढायला सुरुवात करावी. साधारणपणे १० मिनिटांत आपण शेंदूर लावलेल्या दगडांपाशी येतो. येथून एक पायवाट माथ्याकडे जाते, तर उजवीकडे जाणारी पायवाट डोंगराला वळसा घालून पाण्याच्या खोदीव टाक्याकडे जाते. या टाक्यावरून या डोंगराचा उपयोग टेहळणीची चौकी म्हणून होत असावा असे वाटते.

या डोंगरावरून उत्तरेला अवंधा, पट्टा आणि पूर्वेला बितनगड हे किल्ले आणि मोठा परिसर दृष्टिपथात येतो. पाण्याचे टाके पाहून डोंगरमाथ्यावर असलेल्या कातळकडय़ापाशी पोहोचल्यावर नेढय़ाचे उत्तरेकडील तोंड दिसते. यात चढून जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत. नेढय़ाचे उत्तरेकडील तोंड ५ फूट उंच आणि ३ फूट रुंद आहे. येथून विरुद्ध बाजूला असलेल्या दक्षिणेकडील नेढय़ाच्या तोंडातून येणारा प्रकाश दिसत असतो. या प्रकाशाच्या रोखाने जाण्यासाठी आपल्याला गुढग्यावर रांगत जावे लागते, कारण गुहेच्या आतील भागाची उंची जेमतेम अडीच ते तीन फूट आहे. साधारण पाच फूट गेल्यावर उजव्या (पूर्व) आणि डाव्या (पश्चिम) बाजूला नेढय़ाची दोन तोंडे आहेत.

या चार तोंडे असलेल्या नेढय़ाची रचना अधिक (+) चिन्हासारखी आहे. या अधिक चिन्हाची चारही टोके मध्यभागी जिथे मिळतात तिथे गुहेची उंची ५ फूट आहे. त्यामुळे येथे वाकून उभे राहाता येते. उजव्या बाजूला चेमदेवची अनघड मूर्ती आहे. दगड एकमेकांवर रचून त्यावर शेंदूर लावलेला आहे. त्यामुळे पूर्वेकडील तोंड झाकले गेले आहे. नेढय़ाची उरलेली दोन तोंडे (दक्षिण आणि पश्चिम) अडीच ते तीन फूट उंचीची आणि निमुळती आहेत. त्यामुळे सडपातळ माणूस किंवा लहान मुलेच या तोंडापर्यंत पोहोचू शकतात. नेढ पाहून बाहेर अल्यावर नेढय़ाच्या तोंडाजवळच या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. या वाटेने पाच मिनिटांत चेमदेव डोंगरच्या सर्वोच्च माथ्यावर जाता येते. चेमदेव डोंगर हा मुंबईहून अध्र्या दिवसाचा ट्रेक असल्याने उरलेल्या अध्र्या दिवसात पट्टा किल्ला किंवा बितनगडला भेट देता येते.

जाण्यासाठी

मुंबई-नाशिक रस्त्यावर घोटी गाव आहे. घोटी गावातून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर टाकेदला  जाणारा फाटा फुटतो. टाकेद गावातून म्हैसघाट चढून एकदरामार्गे खिरवीरे गाव गाठावे. गावाच्या पुढे धारवाडीत जाणारा कच्चा  रस्ता आहे. धारवाडीतून चेमदेवला जाता येते.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on chemdev hills ahmednagar abn
First published on: 01-11-2019 at 00:23 IST