राजेंद्र श्रीकृष्ण भट
पुष्पगुच्छात फुलांच्या दांडय़ांमध्ये प्रामुख्याने निशिगंध आणि ग्लॅडिओलस असतात. आपल्याकडे ग्लॅडिओलस चांगला फुलतो. त्यात असंख्य मनमोहक रंग आहेत. दांडय़ावर येणाऱ्या फुलांच्या संख्येवरून बाजारात त्याची किंमत ठरते. त्याची लागवड कंदांपासून करतात. मध्यम आकाराच्या कंदांना चांगली फुले येतात. लागवड करताना कंदांवरील सालीचे पापुद्रे काढावेत आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. कंद उथळ लावला, तर फुले लवकर येतात. थोडा खोल लावला, तर फुले येण्यास वेळ लागतो पण नवीन कंद जास्त येतात. या कंदांच्या मुळांच्या टोकाला नवीन कंद येतात. त्यांना कार्मेल म्हणतात. नवीन छोटे कंद उथळ लावून त्यापासून लागवडीयोग्य कंद तयार करता येतात.
साधारण दीड-दोन फूट उंचीचे दांडे येऊन फुले खालपासून फुलू लागतात. पहिले फूल फुलल्यावर कळीचा रंग दिसू लागतो. रंग दिसू लागताच दांडा कापतात. पुष्पगुच्छात किंवा पाण्यात ठेवलेले दांडे रोज एक एक फूल याप्रमाणे फुलत राहतात. फुलदांडे येऊन गेल्यावर कुंडीतील मातीत बुरशीनाशकाचे पाण्यातील द्रावण मिसळावे. नंतर पाणी देणे बंद करावे. पूर्ण सुकल्यावर कंद मातीतून बाहेर काढावेत आणि वेगळे करावेत. कार्मेल परत लावता येतात.
या कंदांना जातीनुसार सहा ते नऊ महिने सुप्तावस्था असते. त्याआधी त्यांना कोंबच येत नाहीत. सुप्तावस्था सोडण्यासाठी छिद्रे असलेल्या काळ्या पॉलिथिन पिशवीत भरून फ्रिजमधील भाज्यांच्या ट्रेमध्ये ठेवावेत. नंतर काही दिवसांनी बाहेर काढून बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून कापडात गुंडाळून ठेवावेत. मोड आल्यावर लागवड करावी.