ऑलिव्ह रिडले कासवांची नुकतीच जन्मलेली पिल्लं किनाऱ्यावरच्या वाळूतील घरटय़ांतून अथांग सागराकडे तुरुतुरु चालत जातात. सुरुवातीला लाटांमध्ये अडखळत, हळूहळू सरावतात आणि नंतर एखाद्या लाटेबरोबर समुद्राच्या पोटात सामावून जातात. पुढचं जवळपास अख्खं आयुष्य समुद्रातच राहणाऱ्या या कासवांचं बालरूप पाहण्यासाठी वेळास, आंजर्ले येथील किनाऱ्यांवर दर मार्च-एप्रिलमध्ये पर्यटकांची गर्दी जमते.

ओदिशाच्या किनाऱ्यावर हिवाळ्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या हजारो माद्या येतात. किनाऱ्यावर खड्डा खोदून त्यात अंडी घालून पुन्हा समुद्रात निघून जातात. हे स्तिमित करणारं दृश्य पाहण्यासाठी पूर्वी पर्यटकांची गर्दी होत असे, पण कासवांना, अंडय़ांना इजा होऊ नये म्हणून पर्यटनावर र्निबध घालण्यात आले, गहिरमाथा कासव अभयारण्य या नावाने हा सागरकिनारा संरक्षित करण्यात आला. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर इतक्या मोठय़ा  प्रमाणात हे दृश्य दिसत नसलं, तरी ऑलिव्ह रिडलेची नवजात पिल्लं पाहण्याची संधी मात्र नक्कीच मिळू शकते.

कोकण किनापरट्टीवरील विविध किनाऱ्यांवर ही समुद्री कासवं अंडी घालण्यासाठी येतात. पूर्वी किनाऱ्यावरील रहिवासी ही अंडी खाण्यासाठी चोरत. कधी कुत्रे, कोल्हे, उंदीर, घुशी ती गट्टम करत तर कधी ती बोटींखाली चिरडली जात. चिपळूण येथील ‘सह्य़ाद्री निसर्गमित्र संस्थे’ने हे चित्र बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

या प्रयत्नांची सुरुवात झाली वेळासपासून. संपूर्ण किनारा पालथा घालून संस्थेचे स्वयंसेवक घरटी शोधून काढू लागले. किनाऱ्यावर एक हॅचरी तयार करण्यात आली आणि त्यात ही अंडी ठेवण्यात येऊ लागली. हॅचरीला सर्व बाजूंनी मजबूत कुंपण घातलं जातं. मूळ घरटय़ाएवढाच खड्डा तिथे खोदला जातो आणि त्यात ही अंडी ठेवून घरटं वाळूने बंद करून त्यावर एक टोपली ठेवली जाते. घरटय़ाजवळ एक काठी रोवून त्यावर घरटं केव्हा मिळालं, त्यात किती अंडी आहेत अशी सगळी माहिती असलेला कागद डकवला जातो. साधारण ४५ ते ५० दिवसांत पिल्लं बाहेर येतात. रोज सकाळी आणि सायंकाळी सहा वाजता पर्यटक उत्सुकतेने हॅचरीजवळ गोळा होतात. घरटय़ांवरील टोपल्या उचलल्या जातात. पिल्लं बाहेर आली असल्यास त्यांना किनाऱ्याजवळ सोडलं जातं. पाण्याकडे जाणारी पिल्लं पर्यटकांच्या पायाखाली येऊ नयेत, त्या काळात तिथे बोट येऊ नये, याची दक्षता स्वयंसेवक घेतात. कासवांची नवजात पिल्लं पाहण्याची, त्यांचं मनसोक्त छायाचित्रण करण्याची संधी इथे मिळते.

आता श्रीवर्धन, हरीहरेश्वर, वेळास, आंजर्ले, केळशी, मुरुड (दापोलीतील), दाभोळ, गुहागर, गावखडी, माडबन, वायंगणी, पालघर या किनाऱ्यांवरही कासवांचे संवर्धन केले जाऊ लागले आहे. ग्रामपंचायती, स्थानिक संस्थाही संवर्धनाचे काम करत आहेत. मुंबईतील वर्सोवा किनाऱ्यावरही गतवर्षी कासवाची अंडी आढळली होती.

पिल्लांचा जन्म झाला की त्याच दिवशी ठरल्या वेळी त्यांना समुद्रात सोडलं जातं. त्यामुळे संवर्धनस्थळी भेट देणाऱ्या प्रत्येकाला पिल्लं पाहायला मिळतीलच याची काहीही शाश्वती नसते. पण साधारणपणे एखाद्या घरटय़ातील कासवं बाहेर येऊ लागली की मग लागोपाठ काही दिवस त्या घरटय़ातून पिल्लं येत राहतात. घरटं ज्या दिवशी सापडलं तेव्हापासून ४५-५० दिवसांनी भेट दिल्यास पिल्लं पाहायला मिळण्याची संधी अधिक असते. यंदा आंजर्लेमध्ये मार्च आणि एप्रिलच्या उत्तरार्धात पिल्लं पाहायला मिळण्याची संधी अधिक असल्याचं कळतं. वेळासमध्ये यंदा १३ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत, त्यामुळे तिथेही मार्च-एप्रिलमध्ये पिल्लं पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. पिल्लं पाहायला मिळाली नाहीत, तरी कासवांचं जीवनचक्र, त्यांचं सागरी पर्यावरणातलं स्थान, प्रजनन, समुद्रातला लांबलचक प्रवास यासंदर्भातला माहितीपट रोज संध्याकाळी दाखवला जातो. कासवांविषयीच्या सर्व शंकांच निरसन स्वयंसेवक करतात. याव्यतिरिक्त पक्षीनिरीक्षण, मातीची कासवं तयार करण्याचं शिबीर असे उपक्रमही राबवले जातात.

ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्म ज्या किनाऱ्यावर होतो त्याच किनाऱ्यावर त्या पिल्लांमधील मादी पूर्ण वाढ झाल्यावर अंडी घालण्यासाठी येते. कासवांच्या जीपीएस ट्रॅकिंमधून हे सिद्ध झालं आहे. हजारो सागरी मैलांचा प्रवास करून आपल्या जन्मस्थानी परताणाऱ्या या कासवांविषयी जाणून घेण्याची आणि त्यांची इवली पिल्लं पाहण्याची संधी मार्च-एप्रिलमध्ये साधता येईल.

अन्य आकर्षणे

आंजर्ले, वेळास परिसरात कडय़ावरचा गणपती, बाणकोट किल्ला, हर्णे बंदर आणि पाणकोट किल्ला, तिथे बांधल्या जाणाऱ्या मासेमारीच्या बोटी, पोफळीच्या बागांत दडलेलं केशवराज मंदिर, केळशीतील वाळूची टेकडी, लाडघरचा किनारा अशी ठिकाणं पाहता येतात. बोटीतून डॉल्फिन सफारी करता येते. किनाऱ्यालगतची केतकीची दाट बनं आणि पाणथळीत बागडणाऱ्या पक्ष्यांचे भलेमोठे थवे पाहता येतात.

आणखी थोडा वेळ हाती असेल, तर दापोली परिसरातील मंदिरं आणि कृषी विद्यापीठालाही भेट देता येईल. श्रीवर्धन-हरिहरेश्वर पाहण्याचा पर्यायही आहे. शांत किनाऱ्यावर समुद्राची गाज ऐकत बसण्याची आणि ताजे मासे, सोलकढीवर ताव मारण्याची संधी इथे मिळते.

प्रवास आणि निवास

स्वत:चे वाहन नेल्यास उत्तम. अन्यथा दापोलीहून एसटीने दोन्ही गावांत पोहोचता येतं. स्थानिक पर्यटनस्थळं पाहण्यासाठी रिक्षा किंवा कार उपलब्ध असतात. या परिसरात अलिशान हॉटेल नाहीत. होमस्टेमध्ये मात्र उत्तम सोय होते. एअरकंडिशनर, टीव्ही, वॉटरस्पोर्ट्स, गर्दी टाळून दोन दिवस केवळ निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं असेल तर हा चांगला पर्याय आहे.