स्वयंचलित स्वच्छता

रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर कुटुंबाच्या सदस्याप्रमाणेच घराच्या स्वच्छतेची काळजी घेतो.

बाजारात काय? : सुहास धुरी

घरातील स्वच्छता आपल्या दिनक्रमातील आरोग्याच्या दृष्टीने, तसेच संस्कार आणि शिस्तीचा भाग आहे. घरातील कचरा, धूळ काढण्यासाठी साधारणपणे केरसुणीचा वापर केला जातो. कानाकोपऱ्यांतील कचरा काढताना त्यासाठी काही वेळा मोठी कसरत करावी लागते. प्रामुख्याने कुटुंबातील महिला सदस्य या स्वखुशीने ही जबाबदारी घेत असतात. घर छोटे असले तर ठीक आहे; परंतु घर जर ७०० ते १००० स्वे.फूट किंवा त्यापेक्षा जास्त आकारमानाचे असेल किंवा एखादा बंगला, रिसॉर्ट असेल तर दमछाक झालीच म्हणून समजा.

या सर्व गोष्टींचा विचार करून काही कंपन्यांनी विविध प्रकारची व्हॅक्युम क्लीनरसारखी यंत्रे बाजारात आणली. काहींच्या घरी ती पोहोचलीदेखील. मात्र, त्यासाठीही मनुष्यबळाची गरज भासत असल्याने तसेच यंत्राचे वजन सावरणे, त्याचा वापर करणे या गोष्टीही अनुषंगाने आल्याने येथेही तितकासा काही आराम मिळाला नाही. याचा अभ्यास करून पुढे या यंत्रांमध्ये आणखी काही विकसनशील बदल करण्यात आले. आता रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर यंत्र बाजारात आले आहे. जे स्वयंचलित आहे. म्हणजेच तुम्ही त्या यंत्राला स्वच्छतेचा आदेश दिला की त्याचे पालन होणारच हेच त्याचे वैशिष्टय़.

हा रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर कुटुंबाच्या सदस्याप्रमाणेच घराच्या स्वच्छतेची काळजी घेतो. वर्तुळाकार, चौकोनी, ९ ते १५ सेंमी. उंची आणि ३२ ते ४५ सेंमी व्यास अशा विविध आकारांत उपलब्ध असलेले हे उपकरण स्वयंचलित आहे. त्याला लावण्यात आलेल्या चाकांमुळे ते प्रवाहित राहते. आवश्यकतेनुसार ते विविध प्रकारे वापरता येते. तशी सुविधा त्यामध्ये देण्यात आली आहे. त्यासाठी सेन्सर देण्यात आले आहेत. या सुविधा समायोजित केल्यास घरातील पाळीव प्राण्यांचे केस, धूळ, कचरा ते उचलू शकतात. तसेच यामध्ये विविध प्रकारचे ब्रश दिले आहेत. जे सफाईचे काम उत्तम करतात. इतकेच नव्हे तर घरातील कानाकोपरादेखील स्वच्छ करतात. मार्बल, फरशी, गालिचा, सतरंजी किंवा सुतासारखी वस्तू वा एखाद्या मजल्यावरील कचरा असो त्याची स्वच्छताही हे उपकरण सफाईदारपणे करते. काही उपकरणांमध्ये जिन्यावरच्या प्रत्येक पायऱ्यांवरील कचरा, धूळ साफ करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीप्रमाणे एक-एक पायऱ्या चढून हे उपकरण स्वच्छतेचे काम करते. उचललेला कचरा या यंत्राला जोडलेल्या एका डब्यात जमा होतो. ६० सेकंदांत स्वच्छतेबाबत निर्णय घेण्याची क्षमता या उपकरणामध्ये आहे. म्हणजे जिथे कचरा, घाण, धूळ आहे जी आपल्याला माहितीही नसेल त्या जागेचा हे उपकरण शोध घेऊन ती जागा स्वच्छ करणार हे यामध्ये आणखी एक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. साधारण दोन ते तीन तास हे उपकरण स्वच्छतेचे काम करते. जर वेळेचे नियोजन करून गेल्यास त्या वेळेतही ही स्वच्छता होते. एकदा का सुरू केले की हे उपकरण त्याच्या स्वच्छतेचे आणि तुम्ही तुमच्या घरातील वा बाहेरची वैयक्तिक कामे बिनधास्तपणे करू शकता. उपकरण चार्जेबल आहे. मात्र त्याची काम करण्याची क्षमता म्हणजे पॉवर कमी झाल्यास ते जेथे चार्जसाठी जागा करण्यात आली आहे तेथे जाऊन ते पोहोचते व चार्जरशी कनेक्ट होते आणि चार्ज होऊ लागते. वायफाय आणि रिमोटवरही हे उपकरण चालवता येते. हे विजेवर चालणारे उपकरण असल्याने पाण्यापासून त्याचा बचाव करणे गरजेचे आहे. घर, कार्यालय, दुकाने, हॉटेल, रुग्णालये, सभागृहे अशा ठिकाणी या उपकरणाचा सहज वापर करता येतो.

आय लाइफ, आय रोबोट रुम्बा, युफी, शर्कनिंजा, इकोव्ॉक्स आदी विविध कंपन्यांची उपकरणे बाजारात आहेत. साधारण ८०० रुपयांपासून याच्या किमती असून त्याच्या गुणवत्तेनुसार त्या वाढलेल्या दिसतात.

वैशिष्टय़े

स्वयंचलित उपकरण

कचरा, धउळीचा शोध घेण्याची क्षमता

दोन ते तीन तास कार्यक्षमता

वेळेचे नियोजन

चार्जेबल आणि अ‍ॅटोमेटिक रिचार्ज

घरातील कोपरा, कडा स्वच्छता करणे शक्य

जिन्यातील पायऱ्यांचीही स्वच्छता

ध्वनिप्रदूषण नाही

गालिचा, सतरंजी, तंतुजन्य वस्तूंचीही स्वच्छता

वायफाय आणि रिमोटवरही चलनवलन

९ ते १८ सेंमी उंची, ३२ ते ४५ सेंमी व्यास

वजन ४ ते ६ किलो

suhas.dhuri@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Automatic cleaning akp

ताज्या बातम्या