राजेंद्र भट
कोबी ही कुंडीत सहज वाढणारी, कमी दिवसांची फळभाजी आहे. ही भाजी हिवाळ्यात चांगली वाढते. कोबीच्या अनेक प्रजाती आता वर्षभर घेता येतात. जास्त पावसाच्या प्रदेशात पावसाळ्यात आणि ३५ अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमान असणाऱ्या प्रदेशात ही भाजी घेता येत नाही. कोबीच्या सुधारित संशोधित जातीचे बी आणून रोपे करता येतात.
कोबीच्या लवकर होणाऱ्या जाती साधारण ६०-७० दिवसांत तयार होतात. तर उशिरा होणाऱ्या जाती १२० दिवसांत होतात. जेवढे लवकर तेवढा आकार आणि वजन कमी असते. ६० दिवसांचा कोबी एक ते दीड किलोपर्यंत भरतो. आपला समज असा असतो, की कोबीची पाने जशी वाढतील तशी बांधली की कोबी तयार होतो. पण तसे नसते. कोबीची पहिली पाने पसरट वाढतात. नंतर गाभ्यातून वाढ सुरू होऊन पानांचा एक गठ्ठाच तयार होतो.
कोबी लावण्यासाठी पसरट कुंडी घ्यावी. कोबीच्या बियाण्यावर थोडे मोहरीचे दाणे पेरावेत. मोहरी कोबीचे कीड लागण्यापासून रक्षण करते. मोहरीची पाने जास्त कोवळी असल्यामुळे कीड त्यांच्यावर आधी जाते.
कोबीवर दोन प्रकारची कीड येते. एक पाने कुरतडणारी आणि दुसरी रस शोषणारी. रस शोषणाऱ्या किडीच्या पर्यावरणपूरक नियंत्रणासाठी पिवळा चिकट सापळा वापरतात. तो बाजारात मिळतो किंवा आपण घरीही तयार करू शकतो. ही कीड पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते. तेलाची पिवळ्या रंगाची पिशवी उलटी करून टांगून ठेवावी. आतून तिला तेलाचा थर असतो. त्याला रस शोषून घेणारी कीड चिकटते. दुसरा प्रकार म्हणजे पिवळ्या डब्याला बाहेरून थोडे तेल लावावे. ८-१० दिवसांनी हे तेल पुसून पुन्हा थोडे तेल लावून ठेवावे. यामुळे प्रभावी कीडनियंत्रण होते. कुंडीत लसणीच्या ८-१० पाकळ्या टोचून ठेवाव्यात. त्यांच्य्या वासाने कीड कमी होते. लसणीच्या पातीचा वापर स्वयंपाकात करता येतो.
कोबी तयार झाल्यावर दाबला असता करकर असा आवाज येतो. ६०-६५ दिवसांनी कोबी काढावा. झाड मुळासकट उपटू नये. मातीलगत कापून मुळे मातीत ठेवून द्यावीत. ती कुजून चांगले खत तयार होते.