सोनिया परचुरे, नृत्यांगना
वयाची चाळिशी उलटली, तरी मला वाटतं की अजूनही नवं काहीतरी शिकलं पाहिजे. कथ्थक नृत्यातल्या जागा अजूनही वेगळ्या पद्धतीने समजून घेता आल्या पाहिजेत, त्या मांडता आल्या पाहिजेत. माझ्या मनातील ती उर्मी मला सतत रियाज करायला प्रवृत्त करते. त्यामुळे मी सातत्याने नव्या उत्साहाने नृत्य करीत असते. तीच माझी माझ्या तणावाच्या मुक्तीची तान आहे. मला ताणतणाव जाणवायला वेळच नसतो. तितका रिकामा वेळ माझ्याकडे नाही. सतत नृत्याचा रिजाय करणे, नवे शिकलेले विद्यार्थ्यांना शिकविणे, त्यांच्याकडून करवून घेणे याच मी दिवसभर व्यस्त करते. नृत्यशाळेचे एक छोटे बीज मी लावले. त्याने आता छान रोप झाले आहे. ते दिवसेंदिवस वाढत आहे. मुले शिकत आहेत. नृत्यात यश संपादन करीत आहेत, यातच मला समाधान आहे.
पूर्वी कलावंत म्हटले की समाजात त्याविषयी आदर होता. त्याला लोक खूप मान द्यायचे. मग तो कुणीही असो. अभिनेता, नर्तक, गायक, दिग्दर्शक. आता तशी परिस्थिती राहिली नाही. कलावंतांविषयी समाजामध्ये उदासीनता आढळते. ही गोष्ट मला खटकते. सर्वसामान्य व्यक्ती आणि कलावंत यांच्यात निश्चितच फरक आहे. समाजाने त्याचे भान बाळगायला हवे, असे मला वाटते. या गोष्टीची मला कधी कधी खंत जाणवते. जी व्यक्ती काहीतरी ध्येय ठेवून साधना करते, तिच्याविषयी समाजाने कृतज्ञ असायला हवे, असे माझे मत आहे. असो.
एक मात्र नक्की की नव्या पिढीतही कलेविषयी तितकेच प्रेम आढळून येते. मेहनत घेण्याची, नवे शिकण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळे पारंपरिक कलांचे भवितव्य नव्या पिढीच्या हाती सुरक्षित आहे. नृत्यशाळेत मला नेहमीच हे जाणवते. मध्यंतरी अश्विनी भिडेताई म्हणाल्या की फेसबुकवर काही शेअर करायला हरकत नाही, पण त्यात काहीतरी सांगीतिक प्रमाण असायला हवे. मला हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो की माझी तयारी झाली आहे का? समेवर येणं, तिहाई, लयीच्या अंगाने जाणे म्हणजे काय हे मला खरंच कळलंय का? जेव्हा मी कुणाला काहीतरी दाखवते, तेव्हा मी त्याचे शंभर टक्के रसग्रहण केलं आहे का? मला ते पूर्ण कळलेलं आहे का? या सर्वासाठी वेळ हा द्यायलाच हवा. असं होत नसल्यास मात्र मला तणाव जाणवतो. अशा वेळी मी प्रामाणिकपणे स्पष्ट बोलते. तरीही आयुष्याच्या कोणत्याही वळणावर, टप्प्यावर निरागस तसेच उत्साहाने जगता यायला हवे, असे मला वाटते.