शनिवार

कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेचे हे दोन नितांतसुंदर तालुके. गडहिंग्लजला जावे. अफगाणिस्तानातून आलेली हिंगुळजा देवी एका टेकडीवर आहे, ते मंदिर पाहावे. हिंगुळजा देवीचा गड म्हणून गडहिंग्लज हे नाव गावाला मिळाले. गडहिंग्लजमधील काळभैरवाचे मंदिर पाहावे. तिथून १२ किलोमीटरवर असलेल्या सामानगड किल्ल्यावर जावे. गाडी किल्ल्यावर जाते. सातकमान असलेली हनुमान विहीर, वेताळ बुरूज, अंधार कोठडी पाहून घ्यावी. तिथून खाली यावे आणि पुढे २० कि.मी. वर असलेल्या नेसरीला जावे. सरनौबत प्रतापराव गुजर यांचा अंत इथे झाला. त्यांच्या स्मारकापुढे नतमस्तक व्हावे. तिथून पुढे इब्राहिमपूरला जाऊन झाडीत वसलेली जुळी जैन मंदिरे पहावीत आणि पुढे मुक्कामाला चंदगडला जावे.

रविवार

चंदगड परिसर ८ दिवस हिंडावा असा आहे. लाल माती, काजूची झाडे, कौलारू मंदिरे पाहून चंदगडला आल्यावर अगदी कोकणात आल्याचा भास होतो. रवळनाथाचे मंदिर बघून कलानंदीगडला जावे. तो पाहून आंबेवाडीपर्यंत मागे येऊन पारगडला जावे. तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबा याच्याकडे पारगडची किल्लेदारी होती. भवानी मातेचे मंदिर आणि देवीची देखणी मूर्ती पहावी. चौकुळ-मार्गे आंबोलीला जावे. परिसर दाट झाडीचा आहे. प्रवास फारच रमणीय होतो. आंबोलीतला धबधबा पाहावा. तसेच हिरण्यकेशी नदीचा उगम आणि देवीचे मंदिर पाहावे. आंबोलीवरून सावंतवाडीला जाता येईल. अन्यथा आजऱ्याकडे निघावे. येताना वाटेत पुन्हा हिरण्यकेशी नदी लागते. रामतीर्थ मंदिर अवश्य पाहावे. तिथून आजऱ्याला यावे.

ashutosh.treks@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.