वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र. या आसनामध्ये पायांची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते म्हणून त्याला वज्रासन म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे जननेंद्रिय व ओटीपोटावर लाभदायक परिणाम होतो. हे ध्यानासाठी योग्य आसन असून त्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते.
कसे करावे?
* दोन्ही पाय एकमेकांजवळ ठेवून पाय पसरून बसावे. हात नितंबाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवावेत.
* डाव्या हातावर शरीराचा भार घेऊन उजव्या हाताच्या मदतीने उजवा पाय गुडघ्यात दुमडावा.
* उजव्या पायाचा तळवा आकाशाच्या दिशेने ठेवून पाऊल मागे न्यावे. अशा प्रकारे उजव्या नितंबाखाली उजवे पाऊल व्यवस्थित ठेवावे.
* आता शरीराचा भार उजव्या हातावर व बाजूवर घेऊन वरीलप्रमाणे कृती करून डाव्या पायाचे पाऊल डाव्या नितंबाखाली स्थिर करावे. या स्थितीमध्ये दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना लागतील याची काळजी घ्यावी.
* ओटीपोटाचा भाग थोडा पुढे करावा. पाठीचा कणा ताठ ठेवावा. हातांचे तळवे गुडघ्यांवर किंवा गुडघ्यांजवळ मांडीवर ठेवावेत. पोट व हाताचे स्नायू ढिले सोडावेत.
* डोळ्यांच्या पापण्या अलगद मिटाव्यात. लक्ष श्वासावर केंद्रित करावे.