नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेच्या सर्व गाडय़ा आणि स्थानकांमध्ये वायफाय सुविधा पुरवण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली. त्याप्रमाणेच विविध स्थानिक स्वराज्य संस्था, राजकीय नेतेमंडळी, मोबाइल कंपन्या, रेस्तराँ, मॉलमध्येही मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, या मोफत सुविधेचा बेसावध वापर तुम्हाला महागात पडू शकतो.
आसिफ बागवान
इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. एका अहवालानुसार, भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ४६ कोटींच्या आसपास आहे. यापैकी सुमारे ३२ कोटी लोक मोबाइल इंटरनेटचा वापर करतात. या बहुसंख्य इंटरनेट वापरकर्त्यांसाठी मोफत वायफाय ही सुविधा खूपच उपयुक्त ठरते. विशेषत: प्रवासादरम्यान किंवा मोबाइल इंटरनेटचा वेग आणि नेटवर्क कमी असण्याच्या परिस्थितीत वायफाय सुविधा खूपच फायदेशीर आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत आपल्या देशात ‘मोफत वायफाय’ ही एक महत्त्वाची सुविधा मानली जाऊ लागली आहे. अगदी निवडणुकीच्या प्रचारापासून केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत मोफत वायफाय सुविधा पुरवून जनतेची मने जिंकण्याची प्रथाच रूढ होऊ लागली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशातील सर्व रेल्वेस्थानके आणि रेल्वेगाडय़ांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली.
सध्या मुंबईसह अनेक महानगरांमध्ये रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध झाली असून याचा लाभ प्रवासी घेताना दिसतात. याशिवाय विविध कंपन्या, मॉल, दुकाने, रेस्तराँ अशा ठिकाणीही मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. साहजिकच इंटरनेटचा भोक्ता होऊ लागलेला वर्ग यामुळे समाधान व्यक्त करीत आहे. मात्र, ‘फुकट ते पौष्टिक’ असं मानणं बऱ्याचदा घातक ठरू शकते. मोफत वायफायच्या सुविधेने आपले इंटरनेटचे पैसे वाचल्याचा आनंद साजरा करीत असाल तर, जरा सावध व्हा! कारण मोफत वायफाय सुविधेचा वापर करणाऱ्यांना काही धोक्यांनाही सामोरे जावे लागू शकते. असे धोके कोणते ते आपण पाहू.
हल्लेखोरांना मोकळे रान
तुम्ही एखाद्या ठिकाणी मोफत वायफायशी कनेक्ट होता, तेव्हा तुम्ही वायफायच्या मूळ स्रोताशी (पॉइंट ए) जोडले जाता. या ‘पॉइंट ए’मधून संकेतस्थळांना (पॉइंट बी) डेटा पाठवला जातो. या डेटा वहन (ट्रान्समिशन) प्रक्रियेदरम्यान सायबर हल्लेखोर शिरकाव करून तुमची माहिती चोरू शकतात. त्यामुळे तुमच्या गोपनीयतेला धक्का पोहोचू शकतो.
‘एन्क्रिप्ट’विरहित नेटवर्क
संगणक आणि वायरलेस रॉउटरदरम्यान पाठवण्यात येणारी माहिती ही सांकेतिक अर्थात ‘एन्क्रिप्टेड’ असते. ही सांकेतिक लिपी उलगडण्याची ‘की’ नसेल तर कोणीही ती माहिती चोरू शकत नाही. बहुतेक नवीन रॉउटरमध्ये ‘एन्क्रिप्शन’चा पर्याय बंद अवस्थेत असतो. मोफत वायफाय सुविधा सुरू करताना या गोष्टीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेले वायफाय रॉउटर ‘एन्क्रिप्टविरहित’ असू शकतात.
मालवेअरचा धोका
अनेक सॉफ्टवेअर हे अतिसंवेदनशील असतात. त्यांच्या ‘प्रोग्रॅम स्क्रीप्ट’मध्ये थोडेसे बदल करून हॅकर ते आपल्या पद्धतीने वापरतात. वायफायशी जोडलेल्या एका संगणकात मालवेअर शिरला असेल तर नंतर त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या सर्वच उपकरणांत तो शिरकाव करून त्यातील माहिती लंपास करू शकतो.
वापरकर्त्यांवर पाळत
सायबर गुन्हेगार वायफाय सिग्नलवर पाळत ठेवून त्याद्वारे तुमच्या मोबाइलवरही लक्ष ठेवू शकतात. या पद्धतीला ‘स्नूपिंग’ किंवा ‘स्निफिंग’ म्हणतात. या माध्यमातून हल्लेखोर तुमच्या मोबाइलमधील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू शकतात. तुम्ही कोणती संकेतस्थळे वापरता इथपासून तुमच्या नेटबँकिंगचा पासवर्ड यांसारख्या अनेक गोष्टी ते सहज मिळवू शकतात.
बनावट वायफाय
अनेकदा मोफत वायफाय पुरवण्याचा मूळ हेतूच वापरकर्त्यांची माहिती चोरणं आणि तिचा गैरवापर करणं असा असतो. एखाद्या परिसरात तुम्हाला मोफत वायफायचे (जिथे पासवर्ड न वापरता सहज कनेक्ट होता येते) अनेक कनेक्शन आढळू शकतात. यातील काही बनावट असतात. हे ‘वायफाय हॉटस्पॉट’ वापरकर्त्यांना नुकसान करण्यासाठीच तयार केलेले असतात.
सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय वापरताना..
- तुमच्या वायफायमधील ‘ऑटो कनेक्ट’चा पर्याय बंद ठेवा.
- तुमची गोपनीय माहिती असलेल्या कोणत्याही खात्याचा वापर करू नका.
- असे खाते सुरू करायचे असल्यास त्याचे अॅप न वापरता संकेतस्थळाच्या माध्यमातून एचटीटीपीएस (ऌळळढर) प्रोटोकॉलचा वापर करा.
- वायफाय किंवा ब्लूटूथ वापरात नसताना बंद ठेवा.
- नेटबँकिंगचा वापर करू नका.
- ‘फाइल शेअिरग’ करण्याचा पर्याय बंद ठेवा.