राजेंद्र श्रीकृष्ण भट

आपण ज्यात झाडे लावणार आहोत, ते माध्यम महत्त्वाचे असते. झाडे कशात वाढतात, झाडाची रचना कशी असते, मुळे ज्या माध्यमात वाढणार आहेत, त्यात हवा, पाणी, पोषक तत्त्वे इत्यादींचे प्रमाण कसे असावे, हे पाहू या.

माती : ४५ टक्के माती, ५ टक्के सेंद्रिय घटक (कुजलेले), २५ टक्के ओलावा आणि २५ टक्के हवा असणे आवश्यक आहे. अशा स्थितीत अ‍ॅरोबिक (प्राणवायूसहित) जिवाणू आणि बुरशा वाढतात आणि सेंद्रिय घटक कुजवण्याचे काम करून अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण करतात. ही द्रव्ये  झाडांच्या मुळांनी सोडलेल्या सेंद्रीय आम्लात विरघळतात. त्या वेळी ही अन्नद्रव्ये मुळांना उपलब्ध करून देण्याचे काम दुसऱ्या गटातील जिवाणू आणि बुरशा करतात. त्यामुळे मुळांना अन्नद्रव्ये घेता येतात. त्यासाठी २५ टक्के ओलावा आणि २५ टक्के हवा असणे आवश्यक ठरते.

कुजणारे पदार्थ हळूहळू कुजणारे हवेत. उदाहारणार्थ नारळाच्या शेंडय़ा, सोडणे, सुकलेल्या फांद्या इत्यादी. हे कुजताना उष्णता कमी प्रमाणात तयार होते आणि मुळांना धोका निर्माण होत नाही. हिरवे भाग आणि सुक्या अवशेषांचे प्रमाण अधिक असेल, तर ते कुजताना जास्त उष्णता तयार होऊन त्यामुळे मुळांना धोका निर्माण होऊ शकतो. सुक्या पानांचा चुरा कुंडीच्या किंवा वाफ्याच्या पृष्ठभागावर असेल तर कुजताना निर्माण होणारी उष्णता हवेत जाते व मुळांना इजा होत नाही.

ह्य़ुमस : आपण जर मातीऐवजी फक्त वनस्पतींचे अवशेष वापरणार असू आणि ते कुजलेले नसतील, तर ते शक्य तितके बारीक करून कुंडीत अथवा वाफ्यात भरावेत. त्यात थोडे थोडे पाणी देत जावे. त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊन उष्णता निर्माण होते. या माध्यमात बोट खुपसून पाहिल्यास उष्णता जाणवते. पदार्थ जसे कुजत जातात तशी उष्णता कमी होते. ती जाणवेनाशी झाली की बी किंवा रोप लावावे. या माध्यमाला ह्य़ुमस म्हणतात. त्यात स्थिर अन्नद्रव्यांचा मुबलक साठा असतो. त्यामुळे झाडे जोमाने वाढतात.