वैद्य राजीव कानिटकर
दररोजच्या जीवनात आपण काय खातो याबरोबरच काय पितो यालाही महत्त्व आहे. जन्माला आलेले मूळ उपजतच आईचे दूध प्यायला शिकते, त्यानंतर आयुष्यात आपण अनेक पेय प्राशन करतो. काय खावे, कसे खावे, केव्हा-किती खावे, हे सर्व नियम पेयपानाच्या बाबतीतही लागू होतात आणि आजकालच्या जीवनशैलीत शरीरस्वास्थ्य टिकविण्यासाठी पेयपानाबद्दलचे नियम पाळणेही अत्यंत आवश्यक झाले आहे.
रोजच्या जीवनात वापरली जाणारी पेये
* पाणी, दूध, ताक, लस्सी
* पित्तनाशक (थंड) पेय : कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, वाळा सरबत, उसाचा रस. विविध फळांचे रस.
* विविध प्रकारचे मिल्क शेक, शीतपेये (कोल्ड ड्रिंक्स)
* औषधी पेये : तुळशीच्या पानांचा रस, कारल्याचा रस, जांभळाचा रस, कोरफडीचा रस, कडुनिंबाचा रस, बेलपानांचा रस, आल्याचा रस.
* गरम पेये : चहा, दूध, कॉफी, कोको, उकाळा
* विविध विकारांमध्ये दिली जाणारी पेये : मुगाचे पाणी, धने-जिऱ्याचे पाणी, कुळथाचे पाणी, तांदळाच्या कण्यांची कण्हेरी, रव्याची पेज, उकडय़ा तांदळाची पेज, साखर-मीठ पाणी.
* रोजच्या आहारांतील पेये : विविध भाज्यांची सूप. चिकन सूप, मटन सूप.
यानंतर दिनचर्येनुसार किंवा ऋ तुकालानुसार केल्या जाणाऱ्या काही महत्त्वाच्या पेयपानांविषयी थोडक्यात माहिती बघू
* पाणी- बहुतेकांना सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायची सवय असते. मुळात आपल्याला सकाळी उठून लगेच पाणी पिण्याची गरज आहे का? हे आधी प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. विशिष्ट प्रमाणात आणि थोडे कोमट करून पाणी प्यायल्यास ते उपयोगी ठरते. परंतु ते पाणी हे घोटाघोटाने प्यावे. सकाळी सूर्य जसा वर येत जातो, तसा आपल्या शरीरातील अग्नी हळूहळू वाढत जातो. मग त्या वाढत जाणाऱ्या अग्नीवर सकाळीच भरपूर पाणी ओतून ठेवलेत तर त्या पाण्याने अपचन होणे, पोट फुगणे, सकाळच्या नाश्त्यानंतर पोट जड होणे असे विकारच उद्भवतील. पित्त प्रकृतीवाल्यांनी साधे पाणी प्यायला हरकत नाही; परंतु वात आणि कफाच्या प्रकृतीवाल्यांनी पाणी कोमटच प्यायले पाहिजे.
मेदस्वी व्यक्तींनी जेवणाच्या आधी आणि जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा शक्यतो गरम पाणीच प्यावे. जनरल सर्वानीच जेवताना दर ४/४ घासांनी मधे मधे थोडे थोडे पाणी प्यावे. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. किमान अर्ध्या तासाने पाणी प्यावे. मध आणि गरम पाणी आयुर्वेदामध्ये निषिद्ध सांगितले आहे. गरम पाण्यात लिंबू पिळून घ्यायला हरकत नाही. उन्हाळय़ात माठातले पाणी चालेल. पावसाळय़ात आणि थंडीत शक्यतो कोमटच पाणी प्यावे. पावसाळय़ात फार प्रमाणात पाणी पिऊ नये.
* दूध- जन्मापासून अडीच ते तीन वर्षांपर्यंत मुलं मातृस्तन्य म्हणजे आईच्या दुधावरच प्रामुख्याने वाढतात. या काळात आईचे दूध हेच मुलांचे पूर्णान्न समजले जातात. अनेक मुले शाळा कॉलेजातील शिक्षण पूर्ण होईपर्यंत सकाळी दूध पिऊन जातात. अनेकांना रात्री अर्धा कप दूध प्यायल्याशिवाय झोप लागत नाही. सकाळी पिण्यासाठी गाईचे दूध घ्यावे किंवा संध्याकाळी पिण्यासाठी म्हशीचे दूध वापरावे. पित्तप्रकृती सोडून रात्री झोपताना दूध पिऊ नये. वात आणि कफ प्रकृतीच्या माणसांनी कधीही थंड दूध पिऊ नये. एकंदरीतच सर्वानी दूध पिताना सकाळी सात ते रात्री सात या काळातच आणि कोमटच दूध प्यावे. कोमट दुधात नेहमी चिमूटभर हळद आणि सुंठ पावडर घालून घ्यावी. हळद सुंठ घातलेले कोमट दूध कोणत्याही ऋ तूमध्ये घ्यायला हरकत नाही. रात्री जेवणानंतर दूध घ्यायचे असेल तर कमीत कमी तीन तासानंतर घ्यावे. दूध आणि फळे एकत्र करून (मिल्क शेक, फ्रुट सॅलेड, शिकरण) कधीही घेऊ नये. दूध कधीही न तापवता (कच्चे) पिऊ नये.
* ताक- ताक नेहमी ताजे घ्यावे. आंबट ताक पिऊ नये. जेवणानंतर सर्वानीच गोड आणि अदमुरे असे ताक प्यायला हरकत नाही. ताक हे भूक वाढवणारे आणि अन्न पचविणारे आहे. वात प्रकृतिवाल्यांनी सुंठ, धने, जिरे, सैंधव किंवा आपल्याकडे चाट मसाला मिळतो तो थोडा टाकून ताक प्यावे. पित्त प्रकृतीवाल्यांनी धने-जिरे घालून प्यावे. सर्दी-कफाचा त्रास असलेल्यांनी ताक घुसळताना जे पाणी घालतो, ते गरम पाणी घालून घुसळून प्यावे. कफ प्रकृतीवाल्यांनी रात्रीच्या जेवणात ताक पिऊ नये. उन्हाळय़ात कोल्ड ड्रिंकऐवजी ताक पिणे पसंत करावे.
औषधी पेये
खरे म्हणजे याचा वापर व्याधिनुरूप व्हायला हवा. परंतु हल्ली सकाळी चालायला जाणाऱ्या बहुतेकांच्या जीवनशैलीचा तो अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी चालून झाल्यावर ज्येष्ठ नागरिक बहुधा औषधी पेये घेतात. रक्तदाबाचा त्रास असणारे बेलफळ – तुळशीचा, मधुमेही कारले- कडुनिंब- जांभळाचा, अन्य सर्व जण ‘फीट’ राहाण्यासाठी कोरफडीचा असे रस सेवन करतात. हा रस पिताना ताजा आहे याची खात्री करून घेतली पाहिजे. चालण्याच्या व्यायामानंतर थोडी विश्रांती घेऊन मगच तो रस घेतला पाहिजे. तो रस प्यायल्यावर घरी जाऊन अर्ध्या तासाच्या आत आंघोळ करून नाश्ता केला तर त्याचा कितपत उपयोग होईल हाही एक प्रश्न! असे रसपान शक्यतो आपल्या वैद्याला विचारून केलेलेच बरे.
पित्तशामक थंड पेये
सध्या शहरांबरोबर खेडय़ांमध्येही कोल्ड ड्रिंक्सचा वापर वाढलेला आहे. हवेतल्या उष्णतेमुळे घसा सुकणे, वारंवार शोष पडणे, अतिशय घाम येणे या लक्षणांमध्ये थंड पेयाने घशाला बरे वाटते म्हणून थंड पेयांचा वापर सर्रास केला जातो. अतिथंड आणि जास्त प्रमाणात हे पेयपान केल्याने पुन्हा अग्निमंद होतो, त्यामुळे भूक मंदावते, पचनाचे विकार होतात. बाहेर असताना नारळ पाणी, बर्फ न घालता आले-लिंबूमिश्रित उसाचा रस, साध्या पाण्यातील लिंबू सरबत किंवा आवळा-कोकम सरबत अशी पेये घ्यावीत. फळांचे रस घेतानाही ती फळे पूर्णपणे गोड आहेत ना याची खात्री करून घ्यावी. दूध आणि फळे एकत्र करून मिल्कशेक पिणे विरुद्धाहार आहे.
गरम पेये
सकाळी झोपेतून उठल्यावर तरतरी येण्यासाठी आपण बहुतेक सर्वच जण चहा किंवा कॉफी पितो. सकाळी उठल्यावर चहा प्यायला हरकत नाही. कॉफी प्यायची असल्यास ती फिल्टर म्हणजे उकळवून- गाळूनच प्यावी. पित्ताचा त्रास असलेल्यांनी कोरा चहा पिऊ नये. लहान मुलांना वारंवार सर्दी-कफाचा त्रास होतो, त्यांना सकाळी दुधाऐवजी अर्धे दूध + अर्धा चहा द्यावा किंवा दुधाचाच चहा करून द्यावा. पावसाळ्यात आणि थंडीत गवती चहा व आले घालून चहा घ्यावा. दिवसभरात सामान्यत: दोन ते तीन कप चहा किंवा एक ते दीड कप कॉफी प्यायला हरकत नाही. कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनचे दुष्परिणाम हे चहामध्ये असलेल्या टॅनिनपेक्षा निश्चितच जास्त घातक आहेत. त्यामुळे दोघांचेही अतिसेवन हृदय, मेंदू, मांसपेशी, शुक्रधातू, कॅल्शियम, पचनासाठी वाईटच असते.