वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com

आपल्या शारीरिक, मानसिक विकारांवर अनेक उपचार आयुर्वेदात आढळतात. पंचकर्म किंवा विविध आयुर्वेदिक थेरपी यांद्वारे आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण होऊ शकते. अशाच आयुर्वेदिक उपचारांविषयी माहिती देणारे सदर..

‘मला पंचकर्म करायचंय किंवा पंचकर्म म्हणजे काय असतं हो डॉक्टर?’ हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारण्यात येतो. याबद्दल अनेक समज-गैरसमज समाजामध्ये आहेत. टीव्ही, रेडिओ, समाजमाध्यमे, जाहिराती यांमधून पंचकर्म शब्द आपल्या कानावर पडत असतो. पण पंचकर्म नक्की आहे तरी काय?

पंचकर्म ही वेगळी चिकित्सापद्धती नसून आयुर्वेद चिकित्सेमधील  एक अविभाज्य भाग आहे. पंचकर्मामध्ये दोन शब्दांचा अंतर्भाव होतो,  ‘पंच’ म्हणजे पाच आणि ‘कर्म’ म्हणजे क्रिया. वात, पित्त आणि कफ असे तीन दोष असतात हे आपल्याला माहितीच असेल. हे दोष चुकीचा आहार, विहार, वातावरण आदी कारणांमुळे प्रमाणापेक्षा जास्त वाढतात आणि ते शरीरात रोग उत्पन्न करतात. ते औषधांनी काही काळ शांत होतात आणि रोगही कमी होतो. पण अशा दोषांच्या परत वाढण्याची शक्यता असते आणि कधी कधी रोग बलवान असेल तर तोच त्रास परत परत होऊ शकतो. अशा वेळी ते बाहेर काढून टाकणे श्रेयस्कर ठरते. पंचकर्मामध्ये दोषांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियांचा अंतर्भाव होतो.

पंचकर्म प्रक्रिया-

पूर्वकर्म- पंचकर्माला सुरुवात करण्यापूर्वी औषधे व आहाराच्या मदतीने शरीरात जठराग्नी वाढवून पचनशक्ती चांगली केली जाते. या क्रियेला ‘पाचन’ असे म्हणतात. नंतर वैद्याच्या सल्लय़ानुसार स्नेहन स्वेदन केले जाते. रुग्ण प्रकृतीनुसार आवश्यक प्रमाणात तेल, तूप इत्यादी स्निग्ध पदार्थ प्यायला दिले जातात आणि बाह्यत:सुद्धा अभ्यंग केला जातो. नंतर औषधी वनस्पतींच्या काढय़ाच्या वाफेने रुग्णाचा घाम काढला जातो आणि तेलही आत जिरवले जाते.

प्रधान कर्म- पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण या प्रमुख कर्माचा अंतर्भाव होतो. यामुळे शरीराची शुद्धी होते म्हणून त्याला शोधन असेही म्हणतात. याबद्दल सविस्तर माहिती पुढील लेखांमध्ये येईलच.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चत कर्म- पंचकर्म झाल्यानंतर भूक मंदावलेली असू शकते. अशा वेळेला अग्नीचा अंदाज घेत हळूहळू करत आहार वाढवला जातो. हा ‘संसर्जन क्रम’ पंचकर्म केल्यानंतर रोगी व शोधन अवस्थेनुसार तीन ते पाच दिवस केला जातो.