घरातलं विज्ञान : दूध उतू का जातं?

दूध तापवताना अनेकदा येणारा अनुभव म्हणजे गॅससमोर उभे राहून ते तापवावे लागते.

(संग्रहित छायाचित्र)
मनीषा बायस-पुरभे

मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग

मागील अंकात आपण दुधाबद्दल माहिती करून घेतली. आजच्या अंकात दुधाबद्दल नेहमीच येणाऱ्या दोन समस्यांबद्दल बोलूयात.

दूध तापवताना अनेकदा येणारा अनुभव म्हणजे गॅससमोर उभे राहून ते तापवावे लागते. पण त्याला खूप वेळ लागतो आणि आपल्याला एवढा वेळ फुकट घालवणे पटत नाही. मग आपण कोणते तरी छोटेसे वेगळे काम मध्येच करून घेऊ  असे म्हणतो, त्यात गुंततो आणि पाहिलं तर काय? दुधाचा गॅसवर अभिषेक होतो. अशा वेळी दूध उतू का जातं, हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

चहात दूध टाकण्याआधी ते उतू जात नाही. पाण्याचं आधण ठेवल्यावर चहा पावडर, साखर टाकल्यावर पाणी उकळताना पाण्याचे गरम रेणू हलके असल्याकारणाने वर येतात व बुडबुडय़ातील वाफ बाहेर टाकली जाते आणि राहिलेला द्रव पदार्थ परत पाण्यात मिसळला जातो म्हणून चहाचं पाणी उतू जात नाही, मग दूध टाकल्यावर नेमके असे काय घडते? तर जेव्हा आपण दूध तापवतो तेव्हा त्यातील प्रथिने व स्निग्ध दुधापासून वेगळे होतात व हलके असल्याकारणाने दुधाच्या वर जमा होतात व थर तयार करतात म्हणजेच दुधावर ‘साय’ जमा होते. दूध गरम होत असताना त्यातील पाण्याची वाफ तयार होते व ही वाफ सायीच्या वरच्या थरात अडकते. दूध तापत असताना ही वाफ प्रसरण पावते व अधिक वाफ जमा होत असल्याकारणाने सायीच्या थराला वर ढकलते व दूध उतू जाते. दूध उतू जाऊ  नये म्हणून या अडकलेल्या वाफेला बाहेर पडू देण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यायला लागतो आणि हेच आपली आई बासुंदी बनवताना दूध आटवण्यासाठी ठेवताना करते. ते म्हणजे दुधाच्या पातेल्यात स्टीलचा चमचा ठेवते. चमच्याद्वारे दुधातील वाफेला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो व सायीखाली वाफ अडकत नाही व दूध उतू जात नाही किंवा उतू जाणाऱ्या दुधावर पाण्याचा शिडकावा करावा जेणे करून वाफेचे रूपांतर पुन्हा द्रवात रूपांतर होते व वरील पृष्ठभागात तापमानदेखील कमी होते.

आपल्यापर्यंत पाकिटांद्वारे दूध येतं त्यात भेसळ होण्याची शक्यता असते, दुधात पाण्याची, स्टार्च, डिर्टजट पावडर, साखर, इ.ची भेसळ केली जाते. घरच्या घरी भेसळ ओळखायची असेल तर एखाद्या स्वच्छ पृष्ठभागावरून दुधाचे थेंब घसरू द्यावेत जर पांढरट डाग राहिले तर ते दूध शुद्ध असते. थोडय़ा दुधात पाणी घेऊन जोराने हलवले असता फेस आला तर त्यात डिर्टजट पावडरची भेसळ असू शकते आणि ते स्पर्शालादेखील गुळगळीत लागते. असे भेसळयुक्त दूध हे तापवल्यावर पिवसळर होते. दुधात स्टार्चची भेसळ करून कबरेदके वाढवली जातात. ही भेसळ ओळखण्यासाठी आयोडिनचा (मेडिकलमध्ये मिळते) थेंब टाकला असता दूध निळसर होते. अशी भेसळ कोणी करू नये म्हणून दुधाच्या पिशवीतून दूध पातेल्यात सोडताना पिशवीला मोठा तिरकस काप द्यवा जेणेकरून दुधाच्या पिशवीचा भेसळीसाठी उपयोग होऊ  शकणार नाही व पिशवी धुऊन सिंकच्या टाइल्स वर उलटी चिकटवावी. (पाण्याने ती सहज चिकटते) म्हणजे पिशवी आतून स्वच्छ होते व तिचा आतून घाण वास येत नाही व कचऱ्याच्या डब्यात ती न टाकता भंगारवाल्याला दिली तर त्याची योग्य विल्हेवाट लागते व पर्यावरणाचे जतनदेखील आपण करू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Why does milk overflow abn

ताज्या बातम्या