abhyas* ज्या पाठाचा अभ्यास करत आहात, त्याचे प्रथम वाचन करताना आधी टॉपिकवर नजर फिरवा.
* स्वत:चं पुस्तक असेल तर महत्त्वाच्या वाटणाऱ्या मुद्दय़ांवर पेन्सिलने खूण करा. जर पुस्तक इतरकुणाचं असेल वा वाचनालयातून घेतलेलं असेल तर पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, पान क्रमांक याची नोंद करा.
* नोट्स काढण्यासाठी सुटय़ा फुलस्केप कागदांचा वापर करा. कागदांवर पेन्सिलने उजव्या कोपऱ्यात पान क्रमांक टाका, एकाच बाजूचा वापर करा. पाठपोट लिहिणे टाळा तसेच समास नेहमीच्या दुप्पट ठेवा.
* पाठाचे नाव ठळक अक्षरांत लिहा. नवीन मुद्दा, सब-टॉपिक मोठय़ा अक्षरांत लिहा. प्रत्येक परिच्छेदानंतर एक-दोन ओळी सोडा.
* समासात ? # ! किंवा अन्य खुणा करून ठेवा. अशा स्वत:च्या खुणांचा तुम्ही कोड बनवू शकाल. टिपणं काढणं याचा अर्थच मुळी पुस्तकातील माहिती, थोडक्यात उतरवून ठेवताना मेंदूत साठवणं. यामुळे विषयाचं आकलन व्हायला मदत होते.
* टिपणं काढण्यासाठी एक पाठ पूर्ण झाल्यानंतर लिहिलेल्या मुद्दय़ांवर पुन्हा नजर फिरवा. काही मुद्दे, महत्त्वाच्या टिप्स इत्यादींच्या नोंदी बाकी राहिल्या नाहीत ना हे पाहा. त्या पाठासंबंधित आवश्यक ती सारी टिपणे पूर्ण झाली याची खात्री पटल्यावर महत्त्वाचे शब्द, मुद्दे, व्याख्यांवर रंगीत खुणा करा. असे केल्याने ते पान तुमच्या व्हिजुअल मेमरीत राहील. स्पेलिंग पक्की होतील. उजळणी करताना भराभर नजर फिरवता येईल. वेळ वाचेल.
* छोटी कार्डे (पत्त्यांच्या आकाराची) बनवा. जाता-येता, प्रवासात ती डोळ्यांखालून घालता येतील. क्रमश: वा कुठल्याही क्रमाने वाचता येतील, आठवता येतील.
* टिपणांसाठी मुद्दे उतरवताना कुठला मुद्दा आपण विसरतो, काय चुकतं याचा अंदाज येतो. त्या चुका निकालात निघतात आणि अभ्यासाविषयीचा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यामुळे परीक्षेची भीती नाहीशी होते.
* ज्या भागाची टिपणं काढली त्यावर वेगवेगळे प्रश्न काढून त्याची उत्तरं देण्याचा सराव करा.
* वर्गात शिक्षक अथवा प्राध्यापक शिकवत असतानाही तुम्हांला टिपणं काढता येतील. मात्र, त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द उतरवणं म्हणजे नोट्स काढणं नव्हे. त्यांनी पाठासंबंधी दिलेली पूरक माहिती, उदाहरणं, उद्धृत केलेली वाक्यं तसेच समजावून सांगितलेला विषयाचा गाभा लिहून घ्या.
* रोज नवीन काहीतरी घडत असतं. आपल्या विषयासंबंधात, पाठासंबंधात काही अद्ययावत चालू घडामोडी घडत असतील तर त्यावर लक्ष ठेवा. त्यांची नोंद ठेवा. या अद्ययावत नोंदींमुळे तुमची टिपणं इतरांहून वेगळी ठरतील आणि परीक्षक नक्कीच त्याची नोंद घेतील.
* तुमच्या विषयाशी संबंधित छापून आलेली माहिती, फोटो तुम्ही काढलेल्या टिपणांसोबत चिकटवा. उजळणी करताना त्यातील मजकूर वाचता येईल.
* पाठाविषयी काही शंका असल्यास त्याची मित्रांसोबत चर्चा करा. तुमचे प्रश्न शिक्षकांना विचारा, मात्र त्या पाठाविषयीच्या संकल्पना स्पष्ट झाल्याखेरीज पुढच्या पाठाकडे वळू नका. संकल्पना समजून न घेता काढलेल्या टिपणांचा फारसा उपयोग होत नाही.
* टिपणं काढण्याची सवय तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही उपयोगी ठरते. बैठकीत चर्चिल्या गेलेल्या महत्त्वाच्या मुद्दय़ांची नोंद करणे, ऐनवेळेस भाषण करताना मुद्दे संक्षेपात नोंदवणे याकरता अभ्यास करतानाची टिपणं काढण्याची सवय उपयुक्त ठरते. नोबेल पुरस्कार विजेत्यांची चरित्रे असोत अथवा लढवय्या नेपोलियनच्या चरित्रातूनही हीच गोष्ट अधोरेखित केली गेली आहे. त्यांच्या टिपणांच्या वह्य़ा या त्यांच्यासाठीच नव्हे तर जगासाठी अनमोल ठेवा बनला आहे.