मुलाखतीसाठी बोलावणे आल्यानंतर कुठली पूर्वतयारी करणे आवश्यक असते, हे आपण गेल्या आठवडय़ात जाणून घेतले. आज प्रत्यक्ष मुलाखत देताना कुठल्या गोष्टींचे भान राखायला हवे, ते बघूया. मुलाखतीला जाताना पेहराव कसा असावा इथपासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना कुठली काळजी घ्यावी, याचे कानमंत्र-

मुलाखतीसाठी सज्ज व्हा..
* अर्ज केल्यापासून मुलाखतीपर्यंतच्या कालावधीत आपला अनुभव, पात्रता यात काही बदल घडले असतील तर तसा सुधार ‘रेझ्युमे’त करून, सुधारित रेझ्युमेची एक प्रत मुलाखतीपूर्वी किमान एक किंवा दोन दिवस, मुलाखत घेणाऱ्या कंपनी/व्यक्तीकडे पोहोचणे आवश्यक आहे.
* नोकरीची शोधमोहीम सुरू करण्याआधी किमान सहा महिन्यांपासून मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्र नियमितपणे वाचत राहणे गरजेचे आहे. यामुळे चालू घडामोडी, विविध कार्यक्षेत्रांत लागू झालेले नवे सरकारी कायदे, नियम, देशांतर्गत आणि जगभरातील घडामोडी, सामान्य ज्ञान, तसेच दोन्ही भाषांमधील शब्दसंपदा समृद्ध होते. यामुळे मुलाखतीत आपली कामगिरी उत्तम होण्यासाठी गरजेचा असलेला आत्मविश्वास वाढीस लागतो.
* ज्या संस्थेत/कंपनीत मुलाखतीला बोलावले आहे त्या संस्थेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. या कंपनीची उत्पादने कोणती आहेत, शाखा कोणत्या व कुठे आहेत, कंपनीची आíथक स्थिती वगरे गोष्टी जाणून घ्या. अलीकडे इंटरनेटच्या माध्यमातून हे सहजशक्य आहे. अशा पद्धतीने माहिती उपलब्ध नसल्यास प्रत्यक्ष कंपनीत जाऊन अथवा दूरध्वनीवरून माहिती जमा करता येईल. या गोष्टींचा उपयोग मुलाखत प्रभावी व्हावी, म्हणून होऊ शकतो.
* ज्या जाहिरातीवरून अर्ज केला असेल तिच्यावर नजर टाकायला हवी. त्यात नमूद केलेल्या कामकाजासंबंधीच्या अपेक्षा पडताळून पाहणे व त्याप्रमाणे उत्तरांची बांधणी करणे गरजेचे ठरते.
* आपल्या रेझ्युमेचे बारकाईने पुनर्वाचन करणे आवश्यक आहे. त्यातील प्रत्येक मुद्दय़ावर कोणते प्रश्न विचारले जातील याचा कानोसा घ्या. रेझ्युमेतील नकारात्मक मुद्दय़ांवर समर्थनीय स्पष्टीकरण योजणे, मुलाखती दरम्यान विचारल्या जाणाऱ्या अपेक्षित प्रश्नांच्या उत्तरांची उजळणी करणे फार महत्त्वाचे ठरते.

मुलाखतीला जाताना..
* मुलाखतीचे ठिकाण नेमके कोठे आहे, तिथे पोहोचण्यासाठी वाहतुकीचा कोणता मार्ग कमी त्रासाचा, कमी वेळाचा असेल, याचा आधीच विचार करून ठेवावा.
* मुलाखतीच्या वेळी परिधान करायचा पेहराव भपकेदार नसावा, तसेच अति साधाही नसावा. आपण कोणत्या हुद्दय़ासाठी मुलाखत देत आहोत याचे भान राखून पेहरावाची निवड करावी.

प्रत्यक्ष मुलाखत
* मुलाखतीच्या ठिकाणी दिलेल्या वेळेआधी १५ ते २० मिनिटे पोहोचण्याचा प्रयत्न करा.. जेणेकरून तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे
सोपे होईल.
* मुलाखतीच्या ठिकाणी हसऱ्या चेहऱ्याने प्रवेश करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या मनावरील दडपण कमी होते आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींनाही प्रसन्न वाटते. मुलाखतीच्या पॅनेलमधील प्रत्येकाकडे पाहून अदबीने हँडशेक करावा किंवा ‘नमस्कार’ अथवा ‘हॅलो’ म्हणावे.
* बसण्याची सूचना मिळाल्यानंतरच स्थानापन्न व्हावे. ताठ बसून, प्रश्नकर्त्यां व्यक्तीकडे पाहून उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
* प्रश्नांची उत्तरे खरीखुरी व आत्मविश्वासाने देणे आवश्यक आहे. प्रश्न नीट कळला नसेल किंवा उत्तर माहीत नसेल तर चुकीची उत्तरे न देता प्रामाणिकपणे उत्तर माहीत नसल्याची कबुली द्यावी.
* एखाद्या उत्तराशी संबंधित अधिक माहिती सांगणे केव्हाही उत्तम. परंतु वेळेचे भान राखणेही गरजेचे आहे. उदाहरण देत किंवा प्रत्यक्ष अनुभव कथन करत आपले उत्तर देणे अधिक प्रभावी ठरेल.
* तुमची ओळख, तुम्ही कंपनीच्या प्रगतीसाठी कसे उपयुक्त ठराल, हे तुमच्या प्रत्येक उत्तरातून खुबीने सांगण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने मुलाखत घेणाऱ्यांच्या मनावर तुमची छाप पडेल.
* आपले बोलणे रटाळ होणार नाही, याची काळजी घ्यावी. ‘फर्स्ट इम्प्रेशन काउंटस अ लॉट’ हे लक्षात ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाखतीचा समारोप
* प्रश्नकर्त्यांच्या बोलण्याचा रोख, हालचाली यावरून ते मुलाखत आवरती घेत आहेत, हे ओळखता यायला हवे.
* मुलाखत घेणाऱ्यांचे आभार मानत व प्रश्न विचारण्याची नम्रतेने परवानगी मागून तुम्हालाही काही शंका विचारता येतील. यामुळे या कंपनीत काम करण्याची तुमची प्रामाणिक इच्छा व जिज्ञासू वृत्ती दिसून येईल. हे प्रश्न पुढील प्रकारचे असू शकतात- कंपनीचे कार्यक्षेत्र, महत्त्वाचे प्रकल्प, उत्पादने, उत्पादन प्रक्रिया, नजीकच्या भविष्यातील काही प्रकल्प याविषयी तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. नेमणूक झाल्यास तुमचे कामाचे ठिकाण कोठे असेल तसेच कामाचे स्वरूप काय असेल, ही माहिती विचारता येईल. तारतम्य बाळगून, सौम्य शब्दांत वेतनाच्या अपेक्षा व्यक्त करता येतील.
* मुलाखतीच्या शेवटी प्रश्नकर्त्यांकडून नेमणुकी संदर्भात कोणतीच सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही तर निराश न होता आपल्या मुलाखतीबद्दलचे मत प्रश्नकर्त्यांना विचारता येईल. यातून तुमची प्रामाणिक आणि प्रगतिशील मनोवृत्ती दिसून येईल.