सर्कस या गोष्टीचं लहान असताना खूप कुतूहल असायचं कारण आजच्या इतके मनोरंजनाचे पर्याय तेव्हा उपलब्ध नव्हते, शिवाय त्यात माणसं आणि जंगली प्राणी यांच्या एकत्रित कसरतींतून अफलातून मनोरंजन केलं जायचं, प्रत्येक सर्कस ही मनोरंजनाचं पूर्ण वर्तुळ असायचं. त्यात विनोद असायचा आणि थरारही असायचा. जंगली प्राण्यांशी प्रत्येकाची असलेली मैत्री आणि रिंगमास्तरांची तालीम या विषयी आदर निर्माण व्हायचा, एकसारखेच, चमचमणारे आणि कमी कपडे घातलेल्या नवयौवना आणि त्यांच्या त्या आवाक् करणाऱ्या योजनाबद्ध, न चुकणाऱ्या कसरती, साहजिकच प्रत्येक कसरत उत्सुकता निर्माण करायची आणि ती संपल्यावर कल्पनेपलीकडचा आनंद देऊन द्यायची. त्यामुळे सर्कस पाहिली नाही, असं म्हणणारे आज तिशी-चाळिशी आणि पलीकडचे तरी सापडणार नाहीत. अर्थात काळ बदलला तसं सर्कसलाही उतरती कळा लागणं सुरू झालं. भारतातील १३० वर्ष जुन्या सर्कस व्यवसायात १९९०च्या काळात देशात ३०० सर्कस होत्या. आज त्या कमी होत केवळ २५च्या आसपास राहिल्या आहेत. ही उतरती कळा का लागली याला अनेक कारणं आहेत. सर्कस आजच्या काळात चालू राहावी की नाही, यावर दुमत असू शकतं, पण केरळसारखं राज्य आजही या सर्कशींना जाणीवपूर्वक टिकवून आहे. किंबहुना त्यासाठी सरकारी स्तरावर खास प्रयत्न केले जात आहेत. कोणती आहेत त्यामागची कारणं आणि काय इतिहास आहे या सर्कशींचा, हे सांगणारा हा लेख..भूतकाळाचीही सफर घडवणारा!

माझ्या लहानपणी गावात सर्कस आली हे कळण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे एक मोठा सतत नाचणारा आकाशात मारला जाणारा लाइट! गावचे लोक समजून जायचे की सर्कस आली. खेडेगावात फक्त प्रकाश पाहून सर्कसचा तोंडी प्रचार सुरू व्हायचा. रस्त्यांवर सायकल रिक्षामध्ये दवंडी पिटली जायची. मैदानाभोवती जमलेले लोक मोठय़ा उत्सुकतेने दोन गोष्टी पाहायला जमायचे, एक विदेशातून सर्कसमध्ये काम करण्यासाठी आलेल्या गोऱ्या गोऱ्या मुली आणि दुसरे कसरती करणारे जंगली प्राणी! सर्कसमध्ये काम करणाऱ्या या मुलींचे वैशिष्टय़ म्हणजे कपाळापासून पायापर्यंत अगदी सारखा रंग, सर्वाचा एकसारखा सुडौल बांधा, चेहऱ्यावर हसू. ग्रामीण व छोटय़ा शहरातल्या लोकांनी अशा स्त्रिया पहिल्याच नसायच्या. बोलून दाखवत नसले तरी या विशिष्ट कमी कपडे घातलेल्या सुंदर मुली पाहायची सुप्त इच्छा फक्त सर्कसमध्येच पूर्ण व्हायची. फक्त पुरुषच नव्हे तर स्त्रियादेखील प्राणी व पुरुष कलाकारांपेक्षा स्त्री-कलाकारांकडे फार कौतुकाने विस्फारून पाहायच्या. बैलबंडय़ांमध्ये म्हाताऱ्या आजीबाई ते नातवापर्यंत अख्खं कुटुंबच्या कुटुंब शहरांकडे धाव घ्यायचं. कधी कधी एकाएका गावातून २०-२५ बंडय़ा एकाच वेळी निघायच्या. या निमित्ताने शहरात राहणाऱ्या नातेवाईकांची भेटही व्हायची. त्यांच्याकडे बैलगाडय़ा लावायचे, चहापान करून सर्कस बघायला जायचे. एखाद्या जत्रेसारखा माहोल तयार व्हायचा.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार

पूर्ण मैदान व्यापलेला फार उंच असा तंबू, आतमध्ये बसण्यासाठी लाकडी फळीला फळी जोडून गोल रचना केलेले बाक, अगदी उंच दोरखंडाच्या शिडय़ा, आसपास मनोरंजनासाठी फिरणारे ठुसक्या मोठय़ा बांध्याचे विदूषक, असं एकंदरीत रोमांचक दृश्य असायचं. सर्कस सुरू होताच गोऱ्या मुली गोल रिंग फिरवत जेव्हा रिंगणामध्ये यायच्या तेव्हा टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्या वेळी हत्ती, वाघ, सिंह, अस्वल आदी जंगली प्राणी फक्त सर्कसमध्ये बघायला मिळायचे. एका पिंजऱ्यात ४-५ सिंह-वाघ असायचे. इतके सारे प्राणी एकत्र पाहून बघणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकायचे. चाबूक घेऊन सिंह-वाघांना एका रांगेत उभं करून आगीच्या रिंगणातून उडी मारायला लावणारा रिंगमास्तर हिरो असायचा. हे तीन तास कसे संपायचे हे कळायचेच नाही.

भारतात एकेकाळी सर्कस सर्वच जण आवडीने पाहत. बहुतांश सर्कस कंपन्यांचे मालक व कलाकार, खासकरून मुली केरळी असायच्या. आता त्याऐवजी उत्तर-पूर्व व झारखंडमधली मुलांची संख्या वाढली आहे. विदेशी कलाकार हे सोवियत रशियाचा कधीकाळी भाग असलेल्या उजबेकिस्तान, तजाकिस्तान आणि केनिया (कारण तिथे सर्कस हा प्रकारच नाही) सारख्या आफ्रिकन देशांतून येतात. सर्कस परिवारासारखी चालते. ज्यात लोक सोबत राहतात आणि काम करतात. घरच्यांशी, बाहेरच्या जगाशी संबंध तुटल्याने त्यात काम करणारे आपसात लग्नदेखील करतात, असं यात काम करणारी मंडळी सांगतात.

युरोपमध्ये जन्माला आलेल्या सर्कसला अमेरिकेच्या जाड कॅनव्हास कपडय़ाच्या टेंटने चालतं फिरतं बनवलं. कलाकारांची कर्तबगारी आणि जंगलातील विविध प्राण्यांचे खेळ पाहण्यासाठी गर्दी वाढू लागल्याबरोबर याचं व्यावसायिकीकरण होऊ  लागले. ट्रेनचं जाळं वाढल्याने कानाकोपऱ्यांच्या गाव-शहरी लोकांनाही सर्कस पाहायला मिळू लागली. २०व्या शतकात स्त्रिया सर्कशीचा अविभाज्य अंग बनल्या व हजारो मेहनती तरुणींना या करमणूक व्यवसायात रोजगार उपलब्ध झाला. लहान मुलं सर्कस कलाकार बनण्यासाठी घर व शाळा सोडून पळ काढायची. सर्कस ही सर्व वयाच्या लोकांसाठी एकसारखा निखळ आनंद देणारी ठरली. राज कपूर यांनादेखील सर्कसच्या लोकप्रियतेमुळे ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट बनवण्याचा मोह आवरला नाही.

मात्र मागच्या १५ वर्षांत मनोरंजनाची साधनं इतकी अधिक बदलली जितकी त्या आधीच्या ६०-७० वर्षांतही बदलली नाहीत. भारतात त्या वेळी ३०० सर्कस होत्या. आज त्या केवळ २५च्या आसपास राहिल्या आहेत. २०व्या शतकाच्या मध्यंतरी १९६०च्या सुमारास मनोरंजनाचं साधन टीव्ही, चित्रपट आणि व्हिडीयो गेम्स बनले आणि कॉमिक्स व सर्कस या दोघांना उतरती कळा लागायला सुरुवात झाली.

याशिवाय दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काही वर्षांनी एनजीओ वाढल्या आणि प्राणी संस्था-संघटनांनी सर्कसमध्ये प्राण्यांच्या वापरावर बंदी घालावी म्हणून जगभर चळवळ व न्यायालयीन खटल्याची मालिका सुरू केली. त्यातच आता संगणक, इंटरनेटच्या आभासी जगातल्या पॉकेमोन गो, यू-टय़ूब व्हिडीओज, ऑनलाइन गेम्समध्ये रमणाऱ्यांना सर्कस अनाकर्षक वाटू लागली. सर्कसमालकांना त्यांच्या १२५ ते १५० कर्मचाऱ्यांचा ताफा व प्राणी यांच्यावर दररोज सुमारे लाखाच्या वर खर्च येतो. १२ ते २० हजार रुपये मैदानाचं भाडं, वेगवेगळ्या प्रकारचे सात परवाने आणि स्थानिक प्रसारमाध्यमांत लाखो रुपयांची खर्चीक जाहिरात करूनही एक ते दोन हजार आसनक्षमतेच्या तंबूत काही शे लोक आपल्या मुलांना सर्कस दाखवण्यासाठी आणतात तेव्हा तो तोटय़ातला व्यवसाय ठरतो; परंतु त्यातही वाईट म्हणजे आलेली काही मुलं तिथेही मोबाइलवर व्हिडीओ गेम्स खेळत बसतात. मग कुणासाठीही ही सर्कस असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

आता सर्कस कंपन्यांना वाढता प्रवासखर्च, मैदानाचं भरमसाट भाडं, प्राणिमित्र संघटनांविरुद्ध चाललेले न्यायालयीन खटले आणि मर्यादित प्राणी यामुळे सर्कस चालवण्यात भविष्य दिसत नाहीये. ९९७ मध्ये वन्यप्राण्यांच्या वापरावर घातलेली बंदी आणि २०११ ला सर्वोच्च न्यायालयाने लहान मुलांच्या सर्कसमध्ये काम करण्यावर घातलेली बंदी यामुळे तर आता पूर्वीची सर्कस होणं शक्यच नाही. सर्कसमालकांच्या मते, ही मुलं सर्कसमध्ये काम करणाऱ्या कालाकारांचीच असतात. १२ वर्षांच्या वयात जेव्हा शरीरात लवचीकता असते तेव्हाच त्यांना प्रशिक्षण देता येतं, ते नंतर शक्य नाही. आता तर पर्यावरण आणि वन खातं सर्कसमध्ये हत्ती, पक्षी, घोडे, कुत्रे यांचाही वापर करण्यास बंदी घालण्याच्या बाजूने आहे. जर ही बंदी आली तर उरलीसुरली सर्कसही निम्मी बंद पडू शकते. चालू वर्षी फक्त पुण्याच्या रेम्बो, एशियाड, गोल्डन, अपोलो, अजंता अशा फक्त १० सर्कस कंपन्या दौरे काढताहेत. महाराष्ट्राची १०५ वर्ष जुनी जेमिनी सर्कस, मेट्रो, रॉयल, राजकमल, ओरिएंटल आदी सर्कस संपल्यात जमा आहेत.

सर्कस ही भारतात सव्वाशे वर्षांपासून पारंपरिक कलेचा भाग बनली असली, तरी सरकारच्या सांस्कृतिक आणि कला विभागाची याला मान्यता नाही. सर्कस कलाकार क्रीडा आणि युवा घडामोडींच्या विभागांतर्गत येतात. असंघटित कामगार म्हणून कोणत्याच सवलती सुविधा सर्कस कलाकारांना नाहीत. त्यांचं कल्याण मंडळदेखील नाही. सर्कसमध्ये या कलाकारांचं उत्पन्न ८ ते २० हजारांदरम्यान कामाप्रमाणे ठरतं. सर्कस बंद करायला सर्वात जास्त विरोध सर्कसमध्ये काम करणाऱ्यांचाच असतो. कारण बाहेर मिळेल ते काम मिळेल त्या पैशांत करावं लागतं. सर्कसशी एकरूप झाल्याने बाहेरच्या जगाशी नातं जुळणं त्यांच्यासाठी कठीण होतं. नवीन रोजगार तंत्रकौशल्य शिकण्याचं वय आणि आवड गमावलेली असते. त्यामुळे त्यांना भविष्य अंधकारमय वाटतं. बुटक्या-कुबडय़ा विदूषकांना सर्कसमध्ये जेवढा मान आहे तेवढंच बाहेरचं जग त्यांच्यासाठी निष्ठुर आणि त्यांच्यावर हसणारं आहे, असं त्यांना वाटतं. सततच्या प्रवासामुळे घर व समाजाशी नाळ तुटलेली ही ‘भटकी माणसं’ बाहेर कमी पगार आणि वाईट जीवनमानापेक्षा स्वत:ला फोल्डिंग कॉट आणि २-३ पेटय़ांत अधिक सुरक्षित समजतात, असं त्यांच्याशी बोलल्यावर समजतं. ‘दूरदर्शन’वर १९८९-९० मध्ये संवेदनशील दिग्दर्शक अजीज मिर्झा व कुंदन शाह यांची शाहरुख खान, आशुतोष गोवारीकर, रेणुका शहाणे आणि मकरंद देशपांडे अभिनित १९ भागांची ‘सर्कस’ ही प्रसिद्ध होणारी मालिका त्या वेळी सर्कसविश्वाच्या अंतरंग व अस्थिरतेच्या वास्तवावर आधारित होती, त्यातून त्यांच्या जगण्यावर चांगला प्रकाश पाडला होता.

जगभरात सर्कसची हीच दुरवस्था आहे. हत्ती किंवा इतर प्राणी वापरल्याने अमेरिकेच्या अनेक शहरांत सर्कसच्या खेळाला परवानग्या नाकारण्यात आल्या. २००९ मध्ये ‘ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’च्या केनेथ फेल्ड यांना त्यांच्या सर्कसचा दशकांपासून प्रतीकचिन्ह असलेला जम्बो हत्ती काढावा लागला आणि अनेक वर्षांच्या लढय़ानंतर २०१६ मध्ये त्यांच्या ४० हत्तींची रवानगी संरक्षित ठिकाणी फ्लोरिडा इथे करावी लागली. हत्ती नसल्याने अल्प उपस्थितीने तिकिटांचे दर आणि विक्री एकदम कोसळली. हे अभूतपूर्व खालावलेलं उत्पन्न, संपलेल्या संधी पाहता १४६ वर्ष जुना अमेरिकेचा ‘ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ म्हणून ओळखली जाणारी ‘रीन्ग्लिंग ब्रदर्स व बर्नाम अ‍ॅण्ड बेली सर्कस’ अलीकडे २०१७च्या मे महिन्यात बंद पडली. आता सर्कस कंपन्या फोन, अ‍ॅप, नवीन स्टंट्स, नाटय़प्रयोग वगैरे जोडू लागल्या आहेत, ज्यामुळे नवा प्रेक्षक त्याकडे जोडला जाईल. आता फक्त आकाराने छोटय़ा आणि वैशिष्टय़पूर्ण सर्कस तग धरू शकत आहेत! आता सर्व सर्कस कंपन्यांना हेच आपलंही भविष्य हे कळून चुकलं असावं.

येथे सोवियत रशियाचं उदाहरण देणं खूप गरजेचं आहे. १९१७ मध्ये रशियात कम्युनिस्ट विचारधारेच्या बोल्शेविक क्रांतीपूर्वी सर्व सर्कस कंपन्या खासगी स्वरूपाच्या होत्या. क्रांतीनंतर सरकारी नियंत्रणाखाली आणून ‘सर्कस शो’चं उपन्न शासनाकडे गेलं. त्या बदल्यात सर्कस कंपन्यांना घशघशीत सोयीसुविधा आणि सरकारी पाठबळ मिळू लागलं. केवळ मनोरंजनाचं साधन म्हणून नव्हे तर रोजगार देणारा कला प्रकार म्हणून सर्कसला विकसित करण्यासाठी समाजवादी सरकारकडून विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात आली. १९२९मध्ये राजधानी मॉस्को येथे ‘स्टेट कॉलेज ऑफ सर्कस अ‍ॅण्ड व्हरायटी आर्ट्स’ची उभारणी केली गेली. सोवियत रशियाचा भाग असलेल्या गणराज्यांमध्ये अशा ७० मोठय़ा प्रशिक्षण इमारती बांधल्या गेल्या. नव्या दमाचं प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने व पैशांची काळजी मिटल्याने सोवियत सर्कस कंपन्या जगभर दौरे करू लागल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही रशियन सर्कस जगभरात प्रयोग करण्यात सर्वात आघाडीवर राहिली. या सर्व सर्कस कंपन्यांनाच संपूर्ण जगात ‘मॉस्को सर्कस’ म्हणून ओळखलं जायचं. सर्कस कला व अभिमानाचं केंद्र बनलं आणि कलाकारांना सन्मानतेची वागणूक मिळाली. निकेता ख्रुश्चेव नंतर राष्ट्रप्रमुख बनलेल्या लियोनिद ब्रेझ्नेव यांचा कार्यकाळ सोवियत रशियन सर्कसचं सुवर्णयुग मानलं जातं. १९७१ मध्ये मॉस्को विद्यापीठाच्या जवळ लेनिन हिल या ठिकाणी अभियांत्रिकीच्या अत्याधुनिक तांत्रिक सुविधायुक्त विशाल हॉल आणि ३,३०० आसन क्षमतेच्या ‘मॉस्को सर्कस ऑन लेनिन हिल्स’ (न्यू सर्कस)ची उभारणी झाली. हे आजही जगातलं एकमेवाद्वितीय सर्वात मोठं इनडोअर सर्कस केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रातून शिकलेल्यांची कलाबाजी, स्टंट आणि अभियांत्रिकीकौशल्य सर्वाच्या पुढे होतं व आजही त्यांना कुठेच तोड नाही.

सरकार सर्कसकडे लोकमनोरंजनाचा प्रकार म्हणून पाहायचं. ऑपेरा किंवा बॅले वगैरे नृत्य असं महागडं मनोरंजन पाहण्यापेक्षा सर्कस बघणं हे खूप स्वस्त असल्याने या सरकारने त्याला सर्वासाठीची कला व लोकमनोरंजनाचं केंद्र म्हणून मान्यता दिली. कम्युनिस्ट राजवट असेपर्यंत या हजारो कलाकारांना काम आणि पगाराची सुनिश्चितता होती. १९९०-९५ पर्यंत ही प्रशिक्षण केंद्रं जगभराला भन्नाट प्रयोग करून दाखवणारे नवे उमदे कलाकार देत राहिली. समाजवादी सोवियत युनियनला उतरती कळा लागल्याबरोबर ही सर्कस प्रशिक्षण प्रदर्शन केंद्रं पोसणं पांढरा हत्ती वाटू लागली. खर्च कमी करण्याची धोरणं आखण्यात आली. ‘मॉस्को स्टेट सर्कस’ची इमारतदेखील २००७ मध्ये खासगी लोकांना विकायला काढण्यात आली. मात्र रशियन जनतेच्या प्रचंड विरोधामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्या इमारतीला खासगीकरण करण्यासाठी तयार केलेल्या सरकारी संपत्तीच्या यादीतून वगळावं लागलं. ‘सोवियत’मधून वेगळ्या पडलेल्या देशांमध्ये ही व्यवस्था कोलमडली. पण तरीही आजही जगातल्या सर्वात प्रसिद्ध १३०० सर्कस कंपन्यांपैकी २५ टक्के कंपन्या या पूर्वी सोवियत रशियाचा भाग असलेल्या देशांच्या आहेत यावरूनच त्याचा आवाका लक्षात येतो. रशियाने सर्कससाठी जे काही केलं तसं दुसरं उदाहरण जगात कुठेच नाही आणि म्हणून संपूर्ण जग हे त्या नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी, होतकरू कलाकार आणि विदूषकांसाठी सोवियत रशियाच्या सरकारचं ऋणी राहील.

आपल्या देशात अनेक दशकांपासून फक्त केरळ सरकार सर्कस कंपन्यांना अत्यंत कमी कर व स्वस्त जमीन उपलब्ध करून देत आलं आहे. भारतात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात काम करणाऱ्या डाव्या विचारांच्या केरळ सरकारने सत्तेत आल्यानंतर ९ सप्टेंबर २०१५ रोजी केरळ संगीत नाटक अकादमीतर्फे एक लाखांपर्यंतचे वैद्यकीय विमा आणि रुग्णालयात दाखल झाल्यास सर्कस कलाकाराला दररोज एक हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं. सर्कसला कलेचा दर्जा देत थिएटर, संगीत, नृत्य, कथाप्रसंगम (कथाकथन) कलाकारांना लागू सर्व विमा व वैद्यकीय सुविधा सर्कस कलाकारांसाठीही लागू करण्यात आल्या. त्यांना सरकारी पारितोषिकांसाठी पात्र धरण्याचंदेखील केरळ सरकारने जाहीर केलं. १७ एप्रिल २०१७ रोजी केरळ सरकारनेच केरळ राज्यातील २५० सर्कस कलाकारांसाठीच्या सेवानिवृत्तीसाठी एक कोटी १३ लाख रुपयांची तरतूद केली आहे. असा हा एकमेव अपवाद करता बाकी सर्व राज्य व केंद्र सरकारे या बाबतीत पूर्णपणे उदासीन आहेत. सरकारी मदत आणि पाठिंब्याशिवाय सर्कस आणि त्यातले कलाकार फार काळ तग धरतील असं सध्या तरी शक्य वाटत नाही. त्यांचं भवितव्य काय असणार आहे हे आता काळावरच सोडावं लागेल.

कल्पना पांडे

Kalpanasfi@gmail.com