स्त्रिया आणि मधुमेह-आरोग्यदायी भविष्य हा आमचा हक्क! ही घोषणा आहे यंदाच्या जागतिक मधुमेह दिवसाची, अर्थात नुकत्याच, १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या दिवसाची. इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशनने (आयडीएफ) हा विषय घेण्यामागे जी कारणे सांगितली आहेत ती स्त्री आरोग्याशी संबंधित असून त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत.

loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर
World Bank Report Shows No Equal Work Opportunity for Women in Any Country
समान कामासाठी असमान मोबदला? महिलांचे उत्पन्न पुरुषांपेक्षा कमी का? भारतात काय आहे परिस्थिती, जाणून घ्या

स्त्रियांमधील डायबेटीसचे म्हणजेच मधुमेहाचे प्रमाण जगात सर्वत्र खूपच वाढलेले असून ते दर दहा स्त्रियांमध्ये एक असे आहे. (तसेच दर सात अर्भकांमध्ये एका अर्भकावर गरोदरपणातील मधुमेहाचा परिणाम होतो.) याचे कारण बऱ्याच देशांमधील स्त्रिया योग्य शिक्षण, वेळीच करावयाच्या चाचण्या आणि उपचार यापासून वंचित आहेत. म्हणूनच स्त्रियांचा मधुमेह हा केवळ विषय न राहता ती चळवळ व्हावी, असे आयडीएफने घोषित केले आहे आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन करताना मधुमेहाने (विशेषत: टाइप टू) ग्रासलेल्या आणि इतर स्त्रियांनाही या विकारासंबंधी माहिती देणे गरजेचे आहे असे सांगितले आहे.

भारतातही (स्त्री/पुरुषांमध्ये आणि शहरातल्या मुलांमध्येही ‘टाइप टू’) मधुमेहाचे प्रमाण खूपच वाढत आहे. ‘शुगर’, डायबेटीस हे शब्द आले की ‘इन्शुलिन घेता की नाही? किती? किती वेळा? कसे?’ वगैरे चौकशी सुरू होते. या इन्शुलिनमुळे अनेकजणांना त्यांचा मधुमेह आटोक्यात ठेवण्यात यश येत आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवनमानही सुधारले आहे. अशा या इन्शुलिनचा शोध कसा लागला याचा इतिहास खूपच रंजक आहे. सध्या वापरले जाणारे इन्शुलिन तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांना १८६९ पासून १९८२ पर्यंत म्हणजे जवळजवळ ११३ वर्षे लागली. अनेक शास्त्रज्ञांचे या शोधात योगदान आहे. तसेच अनेक नोबेल पुरस्कारही या शोधाशी संबंधित आहेत. म्हणूनच इन्शुलिनचा शोध जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

१८६९ मध्ये पॉल लँगरहान्स नावाचा एक विद्यार्थी बर्लिनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता. पॅन्क्रियाज म्हणजेच स्वादुपिंडाचे मायक्रोस्कोपिक निरीक्षण करत असताना त्याला स्वादुपिंडामध्ये इतर पेशींबरोबर विशिष्ट पेशींचे पुंजके (आयलेटस्) पसरलेले दिसले. त्यांचा त्याने शोध घेतला म्हणून त्या पुंजक्यांना ‘आयलेट्स ऑफ लँगरहान्स’ नाव दिले गेले. त्यानंतर एदुआर्द लँग्युइस या शास्त्रज्ञाने सुचविले की या ‘आयलेट्स ऑफ लँगरहान्स’ मधून काहीतरी द्रवपदार्थ स्रवला जात असावा आणि अन्न पचनासाठी त्याचा उपयोग होत असावा. त्याच दरम्यान ऑस्कर मिन्कोवस्की आणि जोसेफ फॉन मेरिंग हे डॉक्टर्सही स्वादुपिंडावर काम करत होते. त्यांनी एका निरोगी कुत्र्याचा स्वादुपिंड काढून टाकला व त्याच्या पचनक्रियेचा अभ्यास केला. या कुत्र्यावर देखरेख करण्यासाठी त्यांनी एका रखवालदाराची नेमणूक केली. काही दिवसानंतर रखवालदाराला या कुत्र्याच्या लघवीवर माशांचा थवा बसल्याचे आढळून आले. मिन्कोवस्की व मेरिंग यांनी त्या कुत्र्याची लघवी तपासली आणि त्यात त्यांना साखर आढळून आली. अशा रीतीने स्वादुपिंड आणि मधुमेह यांचा संबंध कळून आला.

१९०१ मध्ये यूजीन लिंडसे ओपी या शास्त्रज्ञाने अजून एक महत्त्वाची भर घातली. त्याने मधुमेह आणि ‘आयलेटस् ऑफ लँगरहान्स’ यामधला संबंध प्रस्थापित केला. तो म्हणतो, ‘डायबेटीस मेलिटस हा विकार ‘आयलेटस् ऑफ लँगरहान्स’ पूर्णत: किंवा अंशत: नष्ट झाल्याने होतो.’ ओपीच्या अगोदर स्वादुपिंड आणि मधुमेहमधला संबंध स्पष्ट झाला होता. पण ओपीने स्वादुपिंडामधल्या ‘आयलेटस् ऑफ लँगरहान्स’ आणि मधुमेह यांचा संबंध दाखवल्याने संशोधनाला एक दिशा मिळाली.

ऑक्टोबर १९२० पासून इन्शुलिनच्या शोधाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे म्हणता येईल. डॉक्टर फ्रेडरिक ग्रँट बँटिंग टोरांटो याला स्वादुपिंडाबद्दल कुतूहल होते. त्याने मिन्कोवस्की, लँगरहान्स आणि ओपी यांनी केलेल्या प्रयोगाबद्दलची माहिती मिळविली आणि त्या प्रयोगांना यश न मिळण्याची कारणे शोधली. स्वादुपिंडामध्ये डायजेस्टिव्ह एनझाइम्स आणि हवा असलेला पदार्थ तयार होत असल्याने हवा तो पदार्थ (अजून याचे इन्शुलिन हे नामकरण झाले नव्हते) वेगळा करता येणे शक्य नसावे असे त्याला वाटले. त्याने पुढे असा विचार केला की या एन्झाइम्सचा स्रोत जर थांबवला तर हवा तो पदार्थ वेगळा काढणे शक्य होईल.

यामध्ये एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती अशी की त्यावेळी (१९२० च्या सुमारास) मधुमेह ओळखण्याचे एकमेव लक्षण म्हणजे लघवीतील साखर (glycosurea), कारण सध्या वापरात असलेली रक्तातील साखर तपासणी त्यावेळी शक्य नव्हती. रक्त तपासणीचे यंत्र होते पण त्यासाठी दरवेळी १० ते २० मि.लि. रक्त लागायचे. सतत एवढे रक्त काढणे हे प्राण्यांसाठी आणि माणसांसाठीही धोक्याचे होते. शिवाय यात वेळही खूपच जायचा. त्या मानाने लघवीतील साखर तपासणे हे सोपे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य होते.

बँटिंगला या रक्त तपासणीच्या पद्धतीची काहीच माहिती नव्हती. पण त्याचा उत्साह, त्याची इच्छाशक्ती अपार होती. म्हणूनच त्याने त्याचा हा विचार जॉन मॅक्लौड या डॉक्टरला सांगितला. डॉक्टर मॅक्लौड हा टोरांटो युनिव्हर्सिटीत फिजिओलॉजीचा प्रोफेसर होता, त्या विभागाचा प्रमुखही होता. आणि काबरेहायड्रेट मेटॅबोलिझम या विषयातला तज्ज्ञ मानला जायचा. ‘डायबेटील – इट्स पॅथॅलॉजिकल फिजिऑलॉजी’ नावाचा एक पेपरही प्रसिद्ध केलेला होता. त्या पेपरमध्ये त्याने स्वादुपिंडामध्ये स्रवणाऱ्या पदार्थाचा उल्लेख केला होता. परंतु हा पदार्थ निव्वळ स्वरूपात वेगळा करणे अशक्य आहे असेही म्हटले होते. मॅक्लौडच्या वेळी सर्वसाधारण असा समज होता की सर्व चयापचय क्रियांचे केंद्र मेंदूत असून यकृतामार्गे त्या नियंत्रित केल्या जातात. या समजामुळे असेल कदाचित, पण मधुमेहाचा अभ्यास करताना मॅक्लौडचे सर्व लक्ष मेंदूकडे होते व तेथील कोणता भाग काबरेहायड्रेट मेटॅबॉलिझम नियंत्रित करतो हे त्याला पाहायचे होते. याचाच अर्थ स्वादुपिंडामध्ये तयार होणाऱ्या पदार्थाकडे (इन्शुलिनकडे) त्याचे तितकेसे लक्ष नव्हते. या पाश्र्वभूमीवर बँटिंगने पुढचे प्रयोग करण्यासाठी मॅक्लौडची भेट घेण्याचे ठरवले. तो ७ नोव्हेंबर १९२० या दिवशी मॅक्लौडला भेटला. मॅक्लौडने पूर्वी अपयशी झालेल्या प्रयोगांविषयी बँटिंगला सांगितले आणि प्रयोगासाठी नापसंती दर्शविली. शिवाय मॅक्लौडच्या दृष्टीने बँटिंग त्याच्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्यासाठी पात्र ठरत नव्हता. कारण बँटिंग फक्त ग्रॅज्युएट डॉक्टर होता. त्याचा एकही रीसर्च पेपर नव्हता आणि शस्त्रक्रियेचा तितकासा अनुभव नव्हता. त्याने बँटिंगला त्याची प्रयोगशाळा वापरण्याची परवानगी नाकारली. पण बँटिंग मनाने खचला नाही. त्याने आणखी दोन वेळा मॅक्लौडची भेट घेतली व पुन्हा पुन्हा प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या उत्साहामुळे म्हणा किंवा कदाचित काहीतरी ‘निदान’ निघू शकेल या आशेने म्हणा पण मॅक्लौडने बँटिंगला त्याच्या प्रयोगशाळेचा एक छोटासा भाग वापरण्याची परवानगी दिली. फक्त चार महिन्यांसाठीच बँटिंगला प्रयोगशाळेचा छोटासा भाग वापरता येणार होता. मॅक्लौडने बँटिंगला प्रयोगासाठी पैशाची मदत नाकारली पण टेस्टिंगसाठी दहा कुत्रे दिले. तसेच त्याचे दोन विद्यार्थी बँटिंगला साहाय्यक म्हणून दिले. त्याने चार्लस् बेस्टला निवडलं.

१७ मे १९२१ – बेस्ट आणि बँटिंगने आता कुत्र्यांवर प्रयोग करायला सुरुवात केली. कुत्र्यांचे दोन विभाग केले. एका विभागातील कुत्र्यांचे स्वादुपिंड काढून टाकले. निरीक्षण केल्यावर त्यांना खालील गोष्टी आढळल्या – त्या कुत्र्यांच्या रक्तातील व लघवीतील साखर वाढली होती, त्यांना सतत तहान लागत होती,  सतत भूक लागत होती. त्यांना खूपच थकवा वाटत होता. अशक्तपणा वाटत होता. थोडक्यात, त्या कुत्र्यांना मधुमेह झाला होता. बँटिंगने व बेस्टने दुसऱ्या विभागातील कुत्र्यांवरही प्रयोग करून स्वादुपिंड बाहेर काढले व त्या टिश्यूचा जलरूप अर्क तयार केला. हा अर्क त्यांनी पहिल्या विभागातल्या मधुमेही कुत्र्यांना दिला. हा बँटिंग व बेस्ट यांचा पहिलाच प्रयोग होता. त्यांना प्रयोगासंबंधीचा काहीच पूर्वानुभव नसल्याने त्यांचा हा प्रयोग फसला. मग बँटिंगने शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान परत एकदा शिकून घेतले. त्यांनी त्यांना हवा तसा स्वादुपिंडाचा अर्क तयार केला. बऱ्याच प्रक्रिया करून तो गोठवून ठेवला. नंतर बाहेर काढून तो कुटला आणि गाळून घेतला. शरीराच्या तापमानाला आल्यावर त्यातले ५ मि.लि.चे इंजेक्शन एका मधुमेही कुत्र्याला दिले. त्याचे रक्त अर्ध्या तासाच्या अंतराने तपासले आणि काय आश्चर्य! त्या कुत्र्याची रक्तातली साखर एका तासात २०० टक्क्यांवरून १२० टक्क्यांवर आली. बँटिंगचा आणि बेस्टचा आनंद गगनात मावेना. पण हा क्षणिकच ठरला. कारण नंतर या इंजेक्शनचा काहीच परिणाम होईना. उलट साखर वाढतच राहिली. आणि दुसऱ्या दिवशी तो कुत्रा दगावला. हे जरी झाले तरी यामधून बँटिंग व बेस्टला एक यश मिळाले. ते असे की हा पदार्थ (इन्शुलिन) वेगळा करण्यात ते यशस्वी झाले होते. या पदार्थाला त्यांनी अँटी-डायबेटिक अर्क म्हटले. त्यानंतर या शास्त्रज्ञद्वयीने त्यांच्या प्रयोगात खूपच सुधारणा केली व या अर्काला ‘आयलेटीन’ असे नाव दिले.

सप्टेंबर १९२१ ला डॉ. मॅक्लौड उन्हाळ्याची सुट्टी संपवून टोरांटोला परत आल्यावर इतक्या कमी वेळात या दोघा तरुण शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगावर त्याचा विश्वासच बसेना. मॅक्लौडने त्यांना सर्व प्रयोग त्याच्या समोर करायला सांगितले. परंतु आता संशोधनावर बँटिंगचा वरचष्मा होता. त्याचा फायदा घेऊन त्याने मॅक्लौडकडे सुसज्ज आणि स्वत:ची प्रयोगशाळा, प्रयोगासाठी लागणाऱ्या कुत्र्यांची आणि देखभालीसाठी रखवालदार शिवाय त्याला आणि बेस्टला पगार मिळावा अशी मागणी केली. प्रथम मॅक्लौडने या सर्व मागण्या फेटाळल्या पण मग या जोडगोळीने मॅक्लौडला सोडून जाऊन मेयो क्लिनिक किंवा रॉकफेलर इन्स्टिटय़ूटमध्ये पुढचे संशोधन करण्याची धमकी दिली. याचा योग्य तो परिणाम झाला. मॅक्लौडने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

आता बँटिंग आणि बेस्ट या जोडगोळीने जोरात अभ्यास सुरू केला. स्वादुपिंडाचा हवा तसा अर्क तर काढता येऊ  लागला, पण त्याची शुद्धता करणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी एका बायोकेमिस्टची निवड केली. या बायोकेमिस्टचे नाव जे. बी. कॉलिप. आता बँटिंग, बेस्ट आणि कॉलिप हे त्रिकूट एकत्र काम करू लागले. परंतु यासाठी त्यांना अनेक स्वादुपिंडांची गरज होती. त्यासाठी त्यांनी एका कत्तलखान्याला भेट देऊन तिथून मेलेल्या जनावरांची स्वादुपिंडे आणली  व त्याद्वारे हवा असलेला अर्क मिळवायला व तो शुद्ध करायला सुरुवात केली. त्यांचे प्रयोग यशस्वी होऊ लागल्यावर मॅक्लौडचा या संशोधनातला रस वाढला. त्याने तो स्वत: करत असलेले संशोधन तात्पुरते थांबवले व सर्व प्रयोगशाळा या एकाच संशोधनासाठी वापरायचा निर्णय घेतला.

कुत्र्यांवर केलेले प्रयोग आता यशस्वी होऊ लागले. त्यामुळे त्याची पुढची पायरी म्हणजे आता माणसांवर प्रयोग करण्याची वेळ आली. त्यासाठी त्यांना मधुमेह झालेली योग्य व्यक्ती मिळेना. मग बँटिंग व बेस्ट यांनी शुद्ध केलेला स्वादुपिंडाचा अर्क स्वत:च घेतला. ( लक्षात घ्या, ते दोघेही मधुमेही नव्हते!) परिणाम? त्यांना चक्कर आल्यासारखे वाटू लागले व अत्यंत थकवा वाटू लागला (यालाच ‘हायपोग्लायसेमिया’ म्हणतात.) यावरचा उपाय म्हणून त्यांनी साखरेचे पाणी प्यायले आणि त्यांना बरे वाटू लागले.

या अनुभवानंतर ते मधुमेही व्यक्तीचा कसोशीने शोध करू लागले आणि सुदैवाने अशी संधी त्यांच्यासमोर चालून आली. लेनर्ड थॉम्पसन नावाचा चौदा वर्षांचा मुलगा मधुमेहाने बेजार झाला होता. त्याचे वजन अवघे ६५ पौंड (३० किलो) झाले होते व तो मरणोन्मुख अवस्थेत होता. लेनर्डवर पहिली चाचणी घ्यायचे ठरले. ११ जानेवारी १९२२ या दिवशी लेनर्डला शुद्ध केलेल्या अर्काची दोन इंजेक्शन्स दोन्ही पाश्र्वभागावर देण्यात आली. बँटिंग आणि बेस्ट उत्सुकतेने निकालाची वाट पाहात बसले. दुसरे दिवशी निकाल कळले. काय होते ते? लेनर्डची रक्तातली साखर ४४० टक्क्यांवरून ३२० टक्क्यांवर घसरली. तसेच चोवीस तासात लघवीतील साखर ९१.५ ग्रॅम वरून ८४ ग्रॅमवर घसरली. म्हणजे म्हणावा तितका फरक तर पडला नाहीच पण लेनर्डला जबरदस्त संसर्ग झाला. त्याला अ‍ॅलर्जीक रिअ‍ॅक्शन आली. (कारण अजूनही काही प्रमाणात अर्कामध्ये अशुद्धता होतीच.) यामुळे प्रयोग काही काळ थांबवावे लागले. तेवढय़ा वेळात कॉलिपने अर्क अजून शुद्ध केला व बारा दिवसांनी म्हणजेच २३ जानेवारी १९२२ या दिवसी लेनर्डला नव्या सुधारित अर्काचे एक इंजेक्शन दिले. या इंजेक्शनचा लेनर्डवर चांगला परिणाम झाला. त्याची रक्तातली साखर ५२० टक्क्यांवरून १२० टक्क्यांवर आली आणि युरीन ग्लुकोजचे प्रमाण ७१.१ ग्रॅम वरून ८.७ ग्रॅमवर आले!! शिवाय लघवीमधून अ‍ॅसिटोन बॉडीज नाहीशा झाल्या. लेनर्ड खूपच तरतरीत दिसू लागला व त्याची तब्येत सुधारली. लेनर्ड पुढे तेरा वर्षे जगला अशी नोंद आहे.

त्यानंतर एक अजब गोष्ट घडली ती अशी : बँटिंग, बेस्ट आणि कॉलिप हे तिघेजण ट्रायल घेण्यासाठी आणखीन मधुमेही रुग्णांच्या शोधात होते. एका हॉस्पिटलच्या वॉर्डात पन्नासएक लहान मुले मधुमेहाने पीडित असल्याचे त्यांना कळले. कीटोअ‍ॅसिडोसिस या प्रक्रियेमुळे त्यातील बहुतेकजण कोमामध्ये गेलेली होती. त्यांचे आई-वडील हताश झालेले होते व अटळ दिसणाऱ्या मृत्यूची जणू वाट पाहात होते. बँटिंग, बेस्ट आणि कॉलिप ही शास्त्रज्ञत्रयी तिकडे लगेच पोहोचली व त्यांना शुद्ध केलेल्या अर्काची इंजेक्शन्स द्यायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! पन्नासाव्या मुलाचे इंजेक्शन पूर्ण होईपर्यंत पहिली काही मुले कोमातून बाहेर आलेली होती!

१९२२ च्या फेब्रुवारी महिन्यात वयाने अजून मोठय़ा असलेल्या सहा रुग्णांवर चाचणी झाली व सर्वानाच बरे वाटू लागले. म्हणून मग १९२२ च्या एप्रिल महिन्यात या टीमने एक पेपर तयार केला त्या पेपरचे लेखक होते बँटिंग, बेस्ट, कॉलिप, कॅम्पबेल, फ्लेचर, मॅक्लौड आणि नोबल. या पेपरमध्ये प्रथमच त्यांनी या अर्काला जाहीररीत्या नाव दिले- इन्शुलिन.

सगळे व्यवस्थित चालले असताना बँटिंग व बेस्ट यांच्याशी कॉलिपचे मतभेद झाले आणि तो बाहेर पडला. नोव्हेंबर १९२२ पासून शुद्ध इन्शुलिनची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती सुरू झाली व हे इन्शुलिन बाजारात विक्रीसाठी खुले केले. पण अजून एक अडचण होती आणि ती म्हणजे इन्शुलिनच्या निर्मितीसाठी अजूनही प्राण्यांचा वापर होत होता. हे टाळणे गरजेचे होते. त्यासाठी इन्शुलिनच्या अणूचे पृथ्थकरण करणे हे मुख्य कार्य होते. इन्शुलिन हे एक प्रकारचे प्रोटिन असून त्यामध्ये असणारी अ‍ॅमिनो अ‍ॅसिडस्ची माहिती होणे महत्त्वाचे होते. हे अवघड काम बरीच वर्षे चालले. १९५०च्या दशकात फ्रेडरिक सँगर नावाच्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने इन्शुलिनचे स्ट्रक्चर शोधून काढले (त्यासाठी सँगरला १९५८ चे नोबेल प्राइझ मिळाले.) या मोठय़ा कार्यामुळे प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या इन्शुलिन बनवता येण्याची शक्यता निर्माण झाली आणि १९६०च्या दशकात अनेक प्रयोगांनंतर, कृत्रिम (सिंथेटिक) इन्शुलिन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. हे जरी खरे असले तरी मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणे गरजेचे होते (कारण दिवसेंदिवस मागणी वाढतच होती.) परंतु हे होण्यासाठी १९७८ हे वर्ष उजाडावे लागले. १९७८ मध्ये आर्थर रिग्ज, बॉयर आणि केईची इटाकुरा या शास्त्रज्ञांनी कृत्रिमरीत्या मोठय़ा प्रमाणावर इन्शुलिन तयार करण्याची पद्धती शोधून काढली. यासाठी त्यांनी (घातक नसलेल्या) ई कोलाय या जीवाणूंचा वापर केला. या ई कोलाय जीवाणूंच्या डीएनएमध्ये मानवी इन्शुलिनचे जनुक घातले व त्या जीवाणूवर अनेक प्रक्रिया केल्या. त्यामुळे झाले काय की प्रत्येक ई कोलाय जीवाणूंची पेशी ही इन्शुलिन बनवणारी जणू फॅक्टरीच झाली! आहे की नाही शास्त्रज्ञांची कमाल?

या वेळेपर्यंत फक्त Eli Lilly ही कंपनी प्राण्यांपासून तयार होणारे इन्शुलिन बनवत होती पण आता बॉयरने जेनेन्टेक ही नवी कंपनी स्थापन केली. नंतर ती आणि जेनेन्टेक या कंपन्या एकत्र आल्या व त्यांनी १९८२ पासून कृत्रिमरीत्या मोठय़ा प्रमाणावर इन्शुलिन बनवायला सुरुवात केली. या पहिल्या कृत्रिमरीत्या बनवलेल्या इन्शुलिनचे नाव होते ‘ह्य़ुम्युलीन.’ हे पहिले बायोसिंथेटिक ह्य़ुमन इन्शुलिन. सध्या जगभरात मिळणारे इन्शुलिनचे प्रकार हे याच ह्य़ुम्युलीनचे प्रकार आहेत. त्यांना बायोसिंथेटिक रिकाँम्बिनंट अ‍ॅनॅलॉग म्हणतात.

तर अशी ही इन्शुलिनच्या शोधाची थोडक्यात कथा. एखाद्या संशोधनाच्या मागे अनेक शास्त्रज्ञांचे, अनेक वर्षांचे अथक परिश्रम असतात. संशोधनाशी ते इतके एकरूप झालेले असतात की त्यांना वेळेचे, शरीराचे, समाजाचे, पैशाचे असे कशाचेही भान नसते. आणि म्हणूनच त्यांच्याकडून जगाला संशोधनाच्या फलाची देणगी मिळत असते.

इन्शुलिनच्या शोधाशी संलग्न अनेक नोबेल पुरस्कार दिले गेले आहेत. त्यापैकी हे काही – 

  • टोरोंटो युनिव्हर्सिटीतील इन्शुलिन तयार करणाऱ्या टीमला १९२३ चे फिजीओलॉजी-मेडिसिनमधला नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार बँटिंग व मॅक्लौड यांच्या नावावर जाहीर झाला. हे ऐकल्यावर आनंद होण्याऐवजी बँटिंगला रागच आला. कारण या बक्षिसात त्याचा साथीदार बेस्टचे नाव नव्हते. दुसरे असे की मॅक्लौडने प्रयोगशाळा देण्याव्यतिरिक्त आणखी थोडी मदत केली, पण या संशोधन प्रक्रियेत त्याचा तसा महत्त्वाचा सहभाग नव्हता. म्हणून बँटिंगने त्याचा साथीदार बेस्ट याच्याबरोबर नोबेल पुरस्कार विभागून घेण्याचा निर्णय घेतला. हे पाहिल्यावर मॅक्लौडनेही त्याचा अर्धा पुरस्कार कॉलिपबरोबर विभागून घेतला. त्यामुळे इन्शुलिन शोधाचा नोबेल पुरस्कार बँटिंग, बेस्ट, मॅक्लौड व कॉलिप या चौघांना मिळाला.
  • फ्रेडरिक सँगर या ब्रिटिश शास्त्रज्ञाला इन्शुलिनचे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड स्ट्रक्चर शोधाचा १९५८ चा रसायन शास्त्रामधील नोबेल पुरस्कार मिळाला.

अंजली श्रोत्रिय

health.myright@gmail.com