19 October 2018

News Flash

महिला आरक्षण सत्तेच्या सोंगटय़ा

महिला आरक्षणाची पंचविशी नुकतीच साजरी झाली.

महिला आरक्षणाची पंचविशी नुकतीच साजरी झाली. आपल्या देशाला स्त्रियांचा राजकारणातला प्रवेश नवीन नव्हताच, परंतु गावपातळीवर जेव्हा तिच्या प्रवेशाची गरज निर्माण झाली तेव्हा आरक्षणाचीही गरज निर्माण झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आधी तेहतीस टक्के व मग पन्नास टक्के प्रतिनिधित्व मिळायला लागले आणि स्त्रियांचा हा राजकारणातला प्रवेश वेगवेगळ्या स्तरावर महत्त्वाचा ठरू लागला. राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर स्त्री म्हणून तिला आत्मभान येऊ लागले. सुरुवातीला फक्त माहीत असलेले, मग मिळालेले आणि नंतर तिने आत्मसात केलेले अनेक अधिकार तिने गेल्या पंधरा-वीस वर्षांत राबवायलाही सुरुवात केली आणि ग्रामीण पातळीवर स्त्रीनेतृत्व निर्माण होऊ लागले.

ही या महिला आरक्षणाची  चांगली आणि महत्त्वाची बाजू आहेच, पण याला दुसरीही बाजू आहे, ती आहे, त्याच्या मानवीपणाची. सत्ता आणि संपत्ती या राजकारणातल्या अपरिहार्य गोष्टी. त्याचा मोह अनेकांना न आवरणारा आणि त्यापायी अनेक गोष्टी घडवणारा. महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आपणही राजकारणात उतरावं असं स्त्रीला वाटणं किंवा आपल्या नातलग स्त्रीला राजकारणात उतरवावं अशी पुरुषाची इच्छा असणं अशक्य नव्हतंच.

पण ही इच्छा काय काय घडवते ते सांगणाऱ्या या सत्य घटना, ऑक्टोबर २०१७ मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकांनंतर अनुभवास आलेल्या. या घटना आहेत या नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्य़ातल्या. शैली कथात्मक असली तरी या घटना मात्र खऱ्या आणि प्रामाणिक आहेत.

पहिली घटना जयश्रीची आहे. जिच्या नकळत तिच्याच पराभवाचा सौदा झाला होता..

सकाळपासून चहाच्या आधणाची ही तिसरी वेळ होती.. जवळपास २० कप चहा झाला होता आणि घरातील साखरेच्या डब्याने तळ गाठला होता. जयश्री मनातल्या मनात गावातील तीन वॉर्डमध्ये असणाऱ्या मतदारांची बेरीज करीत होती. जयश्री या निवडणुकीत सरपंचपदासाठी उभी राहिली होती. त्यामुळे एकीकडे निवडणूक व दुसरीकडे मदत करणाऱ्यांसाठी चहापाणी करता-करता खर्चाचा व मतदारांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत होती. तेवढय़ात तिच्या मोठय़ा मुलाने तिच्याकडून एक हजार रुपये मागितले. कारण विचारल्यावर त्याने सांगितले की काल प्रचारासाठी फिरलेल्या गाडय़ांचे पेमेन्ट करायचे आहे. पैसे द्यावेत की नाही, या विचारात जयश्री होती, कारण तिला माहिती होते की निवडणुकीसाठी होणाऱ्या सर्व खर्चावर तिचा नवरा लक्ष ठेवून आहे. मुलाला सरळ नाही म्हणावं तर तो नाराज होईल, तेव्हा ‘सध्या पैसे नाहीत, बँकेतून काढल्यावर देईन.’ असे मोघम उत्तर देऊन ती स्वयंपाकाला लागली. अकरा वाजता तिला तालुक्याला जायचे होते. निवडणुकीचे चिन्ह मिळणार होते आणि ती एकटीच नव्हे तर तिच्या बरोबर जवळपास २५-३० बायामाणसं जाणार होती. स्वयंपाक करताना जयश्रीच्या मनात ऐवढय़ा माणसांचा प्रवासाचा, खाण्या-पिण्याचा खर्च किती होईल याची बेरीज सुरू झाली.. गेले  पंधरा दिवस जयश्री, तिचा नवरा कोणालाही शेताकडे जायला सवड झाली नव्हती. शेतीतील सर्व जबाबदारी लहान दिरावर सोपवून जयश्री व तिचा नवरा दिवसरात्र निवडणुकीच्या कामात बुडाले होते. संध्याकाळी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन चिन्ह मिळाल्यावर गाजावाजासह गावात परत यायला चांगलीच रात्र झाली होती. गडबडीत सगळी तशीच झोपली. सकाळी उठून पहाते तर तिला नवरा दिसेना. संध्याकाळ होत आली तरी त्याचा पत्ता लागेना तेव्हा मात्र जयश्री घाबरली. घरी त्यांच्या सामानाची शोधाशोध केली तर त्यांची पिशवी, मोबाइल, घडय़ाळ काहीच नव्हते. मोबाइलही बंद होता. जयश्रीचा धीर सुटत चालला होता. जशी-जशी बातमी पसरली तशी घरी येणाऱ्यांची गर्दी वाढली. सर्वच लोक जयश्रीच्या निवडणुकीत उभे राहण्याचा संबंध तिच्या नवऱ्याच्या गायब होण्याशी लावत होते. आतापर्यंत ही बातमी पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचली होती त्यांनी तिला न घाबरण्याचा सल्ला दिला व थोडय़ाच वेळात तुझ्या नवऱ्याला शोधून आणतो, असा धीरही दिला. दुसऱ्या दिवसाची दुपार उलटली तरी नवरा किंवा त्याच्या बद्दलची माहिती काहीच आले नाही. मग मात्र तिने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशीची सकाळची दुपार झाली तरी कोणतीच बरी-वाईट बातमी कानावर आली नाही. इतका वेळ वाट बघणारे पक्षातील लोक आता जयश्रीला प्रचार सुरू करण्यासाठी आग्रह करू लागले, शेवटी त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. जयश्रीने मात्र बाहेर पडण्यास ठाम नकार दिला, शेवटी कार्यकत्रेच तिच्या वतीने प्रचार करू लागने. जयश्रीने बँकेतून काढलेल्या पशातून उरलेले सर्व पैसे मुलाकडे सोपवले व कार्यकर्त्यांच्या प्रवासाचे, गाडय़ांचे व खाण्या-पिण्याचे पैसे देण्यास सांगितले. संध्याकाळी मुलगा पुन्हा तिच्याकडे पैसे मागायला आला तेव्हा तिने जवळचे सर्व पैसे संपल्याचे सांगितले. जयश्रीने सर्व हिशेब करून बघितला तर आतापर्यंत जवळपास ६५ हजारांवर खर्च झाला होता व एकाही मतदारापर्यंत मत मागण्यासाठी पोचता आले नव्हते. नवऱ्याच्या शोधाशोधीसाठी पुन्हा काही पदरमोड झाली होती ती वेगळी. जयश्री सगळीकडून संकटात सापडली होती व निवडणुकीत उभे राहण्याचा पश्चात्ताप करीत होती. चार दिवस सतत चिंता करून शिणलेल्या जयश्रीला सपाटून ताप भरला व तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. दवाखान्यात औषधांच्या ग्लानीत जयश्रीला समजले की तिचा नवरा सुखरूप घरी परत आला आहे, पण तो कुठे गायब झाला होता याबद्दल काहीच सांगत नाही. दवाखान्यातून घरी गेल्यावर निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ चोवीस तास उरले होते. शेवटच्या २४ तासांत जयश्रीने जमेल तेवढय़ा मतदारांच्या भेटी घेतल्या मात्र मतदानापूर्वीच तिला पराभव झाल्यासारखे वाटत होते. न राहावून शेवटी तिने नवऱ्याला मुलाची शपथ देऊन विचारले की, ‘तो कुठे गायब झाला होता?’ तेव्हा नवऱ्याने सांगितले की, निवडणुकीसाठी सारखा पसा लागत होता. बँकेतील सर्व शिल्लक जवळपास संपली होती. उलट याच्या-त्याच्याकडून मागितलेली उधारी वाढली. म्हणून त्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी जयश्रीच्या पराभवाचा सौदा करून काही पैसे पदरात पाडून घेतले व काही दिवस मुद्दामहून घरापासून लांब राहिला. जयश्रीचा पराभव तर नक्कीच होता मात्र आपल्या उमेदवारीमुळे झालेला खर्च, नवऱ्याने केलेला सौदा तिच्यासाठी पराभवापेक्षा क्लेशकारक ठरला!

दिवसेंदिवस वाढणारा निवडणुकीचा खर्च, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी रचलेल्या क्लृप्त्या व हे सर्व करूनही असणारी विजयाची अनिश्चितता यामुळे सुरुवातीला निवडणूक लढविणारे जसा-जसा खर्च वाढतो तसे-तसे बेचन होतात. नंतर माघारही घेता येत नाही व पुढे ही जाता येत नाही अशा स्थितीत जयश्रीच्या बाबतीत घडली तशी सौदेबाजी होते व निवडणुकीत जिंकण्यासाठी ‘मनीपॉवर’ कशी उपयोगात येते हे अधोरेखित झाले. पण दुसरीकडे तर ‘सत्ता-पॉवर’ मिळवण्यासाठी भावनेलाच हात घातला जातो, असंही दिसतं. तसं घडलं शालिनीच्या बाबतीत. नवरा जर राजकारणात लोकप्रिय पुढारी असेल तर त्याच्या पश्चात त्याच्या विधवेला उमेदवारी देणे हा प्रघात अगदी मोठय़ा पदांपासून ते छोटय़ाशा मतदारसंघातही दिसून येतो. मात्र अशी सहानुभूती मिळवून विजयी होणारी स्त्री कर्तृत्व गाजवतेच असे नाही. शालिनीचा नवरा जाऊन काही महिने झाले होते. त्या धक्क्यातून ती बाहेर पडली नव्हती. शालिनीचा नवरा गेली दहा वर्षे ग्रामपंचायतीचा सरपंच आणि नंतर उपसरपंच होता. उपसरपंचपदाचा कालावधी पूर्ण व्हायला काहीच महिने शिल्लक असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले. गावातील राजकीयदृष्टय़ा सक्रिय मंडळींच्या चर्चा होऊ लागल्या. पुढे आलेल्या सर्व स्त्रियांच्या जिंकण्याची शक्यता पडताळून बघितली असता शालिनीच्या जिंकण्याची शक्यता जास्त वाटली. नवऱ्याच्या पश्चात तिला सहानुभूतीची मते मिळू शकतील असा विश्वास पुढाऱ्यांना वाटत होता. मग काही लोकांनी शालिनीला  सरळ सांगून टाकले की, तिचे नाव पॅनलतर्फे सरपंचपदासाठी पुढे आले आहे, तेव्हा तिला निवडणूक लढवायचीच आहे. तिच्यावर न मागता अचानक एक नवीन जबाबदारी येऊन पडली. तिला काय प्रतिसाद द्यावा हे कळेना. तिच्या संमतीची वाट न बघता परस्पर तिची कागदपत्रे मागवून उमेदवारीचा अर्जदेखील भरून झाला. शालिनीला प्रचारासाठी नेण्यात येत होते. काहीही बोलले तरी तिला दु:खामुळे सारखे रडू कोसळायचे. बघणाऱ्याला तिच्याबद्दल कमालीची सहानुभूती वाटायची. नवऱ्यानंतर सरपंच बनून तूच नवऱ्याची गादी पुढे चालव, असेही काही मंडळी तिला म्हणायची. प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आला. शालिनीला ना जिंकण्याची उत्सुकता होती ना पराजयाची भीती. अपेक्षेप्रमाणे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार झालेली शालिनी सरपंच म्हणून निवडून आली. विजयी मिरवणुकीत तिच्याऐवजी तिला पुढे आणणारेच मिरवले. पुढील सर्व नियोजनदेखील त्यांनीच केले. हे सर्व करताना शालिनीचा सहभाग सही पुरता, मान डोलवण्यापुरता मर्यादित होता. याचे तिच्या लेखी काहीच महत्त्व नव्हते. तिच्या पुढे एकटीने संसार कसा रेटायचा, पशांची बाजू कशी सांभाळायची इत्यादी बरेच वैयक्तिक प्रश्न होते त्याचीच चिंता तिला होती. इकडे तिचे नाव पुढे करणारे सदस्य उपसरपंचपदावर बसले. त्यांच्याकडेच पंचायतीची सर्व सूत्रे आली. शालिनीने ज्या स्त्रियांना निवडणुकीत हरवलं होतं, त्यांच्यापैकी प्रतिमा फारच नाराज होती. प्रतिमा बरीच वर्ष बचतगटात होती. तिला मनापासून निवडणूक लढवायची, सरपंच बनायची इच्छा होती. मात्र शालिनीच्या उमेदवारीमुळे तिची इच्छा पूर्ण झाली नाही. प्रतिमा जरी निवडून आली नव्हती तरी तिला शालिनीचा राग येत नव्हता. उलट तिला वाटायचे की शालिनीने पंचायतीच्या बठकीला जावे, इतरांच्या भरवशावर कारभार चालवू नये. तसे ती शालिनीला समजवायची मात्र शालिनीपर्यंत प्रतिमाचे समजावणे पोहचतच नव्हते. शालिनीचे नाव पुढे आणून तिला सरपंचपदापर्यंत पोहाचविणाऱ्यांनी एका दगडात दोन साध्य प्राप्त केले होते. पहिले साध्य म्हणजे मतदारांची सहानुभूती आणि शालिनीच्या नवऱ्याच्या कामगिरीच्या जोरावर फारसे प्रयत्न न करता पॅनलतर्फे शालिनीचा सरपंचपदावर विजय आणि दुसरे साध्य म्हणजे येणारी पाच वर्षे शालिनीला नावापुरते, सहीपुरते पुढे करून सत्ता आपल्या हातात ठेवणे. शालिनी जिंकूनही काही करू शकत नव्हती तर तिकडे प्रतिमा पराजित झाल्यामुळे काही करू शकत नव्हती. त्यांना जिंकवून देणारे मात्र न लढता सत्ता उपभोगत होते.

सुनंदाच्याही बाबतीत खरं तर तेच घडलं पण स्वत:च्याच कुटुंबीयांकडून. गावातील एखाद्या कुटुंबातील पुरुषाकडे बरीच वर्षे सत्ता असल्यानंतर जेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव होते तेव्हा कुटुंबातील स्त्रियांची इच्छा असो किंवा नसो त्यांना निवडणूक लढवावीच लागते. सुनंदाला गेल्या काही महिन्यांपासून जिंकून यायचेच असे घरातील सर्व मंडळी उठता-बसता, खाता-पिता बजावत होती. सुनंदाला घरातल्या निवडणूक लढविणाऱ्यांना सर्व मदत पुरविण्याची गेली वीस वर्षे सवय झाली होती. मात्र या वेळी पहिल्यांदाच निवडणूक लढविणे, जिंकणे हे दोन्ही शक्य असल्यामुळे सुनंदा आनंदात होती पण थोडी ताणातही. लग्न करून सासरी आल्यावर तिच्या लक्षात आले की तिचे सासरे गावातील महत्त्वाची व्यक्ती आहे. त्यांना गावात मान आहे, वचक आहे. कधी-कधी तिचे सासरे जिल्ह्य़ाच्या ठिकाणी तर कधी मुंबईलादेखील जायचे. सासऱ्यांच्या पश्चात वारसा तिच्या मोठय़ा दिराकडे आला. तिचे मोठे दीर व्यवसाय करायचे व त्यामुळे व्यवहार ज्ञान व हिशेबाच्या बाबतीत ते सासऱ्यांच्या दोन पावलं पुढेच होते. दिरांच्या स्वभावाला कंटाळून तिच्या थोरल्या जाऊबाई आपल्या मुलांसकट माहेरीच जास्त राहायच्या. अशात जेव्हा सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले तेव्हा दिराने प्रथम पत्नीचा विचार केला. मात्र ती सोबत राहत नसल्यामुळे तिचे नाव त्यांनी बाद केले आणि सुनंदाच्या नावाचा विचार केला.  दिराने तिचे फोटो, कागदपत्रे बनविण्यासाठी तालुक्याच्या कचेरीत चलण्याचे थेट फर्मानच सोडले. तिच्या नवऱ्यानेही तिला स्पष्टपणे सांगितले की सरपंचाची सीट आपल्याच कुटुंबातून निघाली पाहिजे. ही निवडणूक म्हणजे तिच्यासाठी मतदारांची मतं जिंकण्यापेक्षा कुटुंबातील लोकांची मनं आणि मान राखण्याची होती. घरच्यांसाठीही सुनंदा नव्हे तर तिचे सरपंचपद महत्त्वाचे होते म्हणून त्यांनी तिला जिंकविण्यासाठी कंबर कसली होती. आपण निवडून आलो नाही तर जाऊबाईसारखे आपल्याला माहेरी जावे लागेल का? आणि समजा जिंकलोच तर दिरांचे काय काय ऐकावे लागेल? याची तिला चिंता लागली. सुनंदासाठी जिंकणे किंवा हरणे दोन्हीही जोखमीचे होते. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यावर तिची मिरवणूक निघाली, फटाके, ताशे, गुलाल याच्या जल्लोषात तीही काही वेळासाठी आनंदून गेली.

सुनंदा जिंकून आली आणि  दिरांचा बोलण्याचा बाज बदलला. त्यांचे सुनंदाशी बोलणे वाढले मात्र हे संभाषण एकतर्फी व्हायचे. म्हणजे दीर सांगायचे, सुनंदाने मान डोलवायची किंवा फारतर हो म्हणायचे. सुनंदाला हे सर्व विचित्र वाटत होते. सुनंदाला आठवले की तिच्या लांबच्या नात्यातली सासू-सीताकाकू पंधरा वर्षांपूर्वी गावाची पहिली महिला सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. सुनंदाने सीताकाकूंना भेटून विचारायचे ठरवले. सीताकाकूंचे वय  पन्नाशीच्या पुढे होते व त्यांनाही सुनंदाचे सरपंचपदावर निवडून येणे माहिती झाले होते. सीताकाकूंनी तिला स्पष्टच सांगितले की, त्या जेव्हा सरपंचपदावर होत्या तेव्हा सुनंदाचे सासरे उपसरपंच होते. सर्व सूत्र उपसरपंच आणि ग्रामपंचायतीचे सचिवच सांभाळत होते. सीताकाकू तर महिनोन्महिने ग्रामपंचायतीकडे फिरकत नव्हत्या. कुठे सही करायची असली तर घरीच कागदपत्रे यायची किंवा कुणी भेटायला आले तरी घरीच यायचे. अगदीच एखादा कार्यक्रम असला तर किंवा सरकारी अधिकारी येणार असतील तेव्हाच सीताकाकूंना पंचायतीमध्ये जावे लागायचे. सुनंदाला आपल्या समस्येवरचा तोडगा सापडला.  तिने ठरवून टाकले की जर दिरानेच उभे केले आहे तर  सरपंचाची सर्व कामे व जबाबदाऱ्या तेच सांभाळतील. नाहीतरी पाच वर्षांच्या मानासाठी आयुष्यभर कुटुंबाशी वैर घेऊन आपले आयुष्य कोणाला धोक्यात घालायचे आहे? या विचाराने सुनंदा झाली.

वच्छलाचा अनुभव तर आणखीनच वेगळा. आदिवासी समाजाला कायदेशीर तरतुदीमुळे मिळालेले प्रतिनिधित्व गावातील जाती वर्चस्वावर काय परिणाम करतात याबाबतचा आहे. वच्छला धुर्वे, छत्तीसगड राज्यातून २० वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्य़ातील एका गावात आपला नवरा, सासू-सासऱ्यांसह आली होती. तिच्याच कुटुंबाप्रमाणे अन्य काही आदिवासी कुटुंबेदेखील कामासाठी गावात आली व तिथेच राहू लागली. सर्वच कुटुंबांचा १८-२० वर्षांत विस्तार झाला. एकही आदिवासी कुटुंब नसणाऱ्या गावात २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकांत सरपंचपद आदिवासी समाजातल्या स्त्रीसाठी राखीव झाले. निवडणुकीत राखीवपद त्या गावासाठी जातीनिहाय लोकसंख्येनुसार होते. पहिल्यांदाच गावात आदिवासी स्त्री सरपंच बनणार होती. घटना दुरुस्तीमुळे झालेला हा देखील एक महत्त्वाचा बदल, ज्यामुळे सर्व जाती-जमातीच्या लोकांना विशेषकरून स्त्रियांना पंचायतीमध्ये निवडून येण्याची संधी मिळाली. वच्छलाला प्रपंच व शेतीची कामे यामुळे गावही पुरते ओळखीचे झाले नव्हते. ती कोणत्याही बचत गटात नव्हती. जास्त शिक्षण न झाल्यामुळे केवळ सहीपुरताच कागद-पेनाशी संबंध होता. वच्छला सारख्याच इतर ही काही आदिवासी स्त्रिया गावात होत्या. त्यांचीही परिस्थिती थोडय़ाफार फरकाने तिच्यासारखीच होती. वच्छलासारखीच आणखी एकीला प्रत्यक्ष सरपंचपदावर निवडून येण्यासाठी उमेदवारी मिळाली. मात्र ती निवडणुकीत पडली. वच्छला सरपंच झाली. मात्र वच्छलाच्या जिंकण्याने गावात अजिबात उत्साह, आनंद नव्हता. गावात ओबीसी अर्थात अन्य मागास वर्गीय समाजाचे लोक जास्त होते. आतापर्यंत त्यांच्याच समाजातील सरपंच झाले होते. पहिल्यांदाच आदिवासी समाजातील बाई सरपंच झाली होती. जरी तिला उभे करणारे आणि मतदान करणारे गावातीलच होते तरी तिचे सरपंच बनणे गावातील लोकांना पसंत नव्हते. गावात धूसफूस सुरू झाली. काही लोक सरळ तहसील कचेरीवर गेले आणि पुन्हा मतदान घेण्याचे निवेदन तहसीलदाराला देऊन आले. अर्थात फेरमतदान झाले नाही. वच्छलाबाई सरपंच पदावर आहेत, मात्र या निवडणुकीमुळे ओबीसी विरुद्ध आदिवासी समाज यातील मतभेद व्यक्त झाले. गावातील अल्पसंख्येतला आदिवासी समाज या प्रकारामुळे चांगलाच दुखावला. एवढी वर्ष गावात राहून गावातील लोकांनी आपल्याला स्वीकारले नाही, असे त्यांना वाटू लागले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जातीनिहाय आरक्षण कायद्यात आलं असलं तरी समाजाच्या पचनी मात्र अद्याप पडलेलं नाही. सत्तेचा हा लोभ जाती, वर्ण, यांतील भेद दूर करू शकत नाही, हेच सत्य आहे.

निवडणूक जरी गाव पातळीवर होत असली तरी त्याचे पडसाद कुटुंब पातळीवर कसे उमटतात त्याचे परिणाम सांगणारी आणखी एक घटना. नागपूर जिल्ह्य़ात एका छोटय़ा ग्राम पंचायतीच्या सदस्य व सरपंच म्हणून बराच अनुभव गाठीशी असणाऱ्या सुधाकररावांना जेव्हा कळले की पुढील निवडणुकीच्या वेळी सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले आहे, तेव्हा सहाजिकच त्यांच्या मनात आपल्या पत्नीचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून आले. त्यांनी तसे आपल्या पत्नीला बोलूनही दाखविले. पती सर्व सांभाळून घेतील व कुटुंबाचा मान ही राहील असा साधा विचार योगेश्वरीने केला. योगेश्वरीच्या घरी एकत्र कुटुंबाची सामायिक शेती होती. शेतीचे हिस्से झाले नव्हते पण गेली बरीच वर्ष फक्त राजकारण करीत राहिल्यामुळे शेतीच्या कामांबाबत व कागदपत्रांबाबत सुधाकरला फारशी माहिती नव्हती. एके दिवशी लहान भावाने सुधाकरजवळ विषय काढला की आता सर्व बहिणींची लग्नं झाली आहे व आपली मुलंही मोठी होताहेत, तेव्हा आता शेतीच्या हिस्से-वाटणीचा विचार करायला काहीच हरकत नाही. भावाचे अचानक शेतीच्या वाटणीसंबंधीचे विचार सुधाकरला वेगळेच वाटले. त्याने शेतीच्या वाटणीचा संबंध निवडणुकीशी जोडला. त्याला भीती वाटू लागली की समजा उद्या वाटणी झालीच तर आपल्याला शेती जमेल का, मग सरपंचपदही नाही आणि शेती जमत नाही अशी नामुष्की आपल्यावर ओढवेल, या भीतीने त्याचे स्वास्थ्य हरवले. भावाच्या शेतीच्या वाटणीबाबतच्या विचाराला कसे पुढे ढकलता येईल याचा विचार करून सुधाकरने सरपंचपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून योगेश्वरीचे नाव मागे घेऊन भावाच्या पत्नीचे नाव जाहीरच करून टाकले. निवडणूक झाली व योगेश्वरीची जाऊ सरपंच म्हणून पदावर आली. खरंतर योगेश्वरीच्या मनात सरपंच बनण्याचे स्वप्न नव्हतेच, मात्र नवऱ्याने असुरक्षिततेपोटी घेतलेला निर्णय हा पूर्णत: चुकीचा आहे, हे तिला कळत होते. आयुष्यभरासाठी तो सल आता तिच्या मनात ठसठसत राहाणार आहे..

तर दुसरा नंदाचा अनुभव घराची शांती भंग करणारा. पारडी गावातील नंदा पाच वर्षे सदस्य म्हणून ग्राम पंचायतीचा अनुभव घेऊन आली होती. त्यानंतरची पाच वर्षे ती पंचायतीच्या बाहेर होती. मात्र गावातील सर्व सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींचा ती अचूक अंदाज घेत होती. नंदाची  सरपंच बनायची तीव्र इच्छा होती. त्यासाठी ती जाणीवपूर्वक प्रयत्न करत होती. मात्र रोस्टरमध्ये सरपंचपद स्त्रियांसाठी राखीव झाले नाही. सरपंचपदासाठी जरी नंदा इच्छुक होती तसेच इतर पुरुषही इच्छुक होते. सरपंच पुरुषच होणार असे त्यांनी ठरवून टाकले होते त्यामुळे निवडणूक लढवणे सोपे नव्हते. हाताशी प्रचार-प्रसार करायला माणसांची गरज होती. माणसं म्हटली की त्यांच्यावर होणारा खर्चही ओघानेच आला. नंदा व तिच्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे नंदाचा नवरा तिने यावेळी निवडणूक लढवू नये अशा मताचा होता, मात्र नंदा जिद्दीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभी राहिली. स्वत:कडचे सगळे, इतरांकडून उसने मागून तसेच स्वत:चे सोन्याचे कानातले गहाण ठेवून नंदाने जवळपास तीस हजार रुपये निवडणुकीसाठी खर्च केले. तिचा नवरा तिला त्याबाबत सारखा रोखत होता. पण नंदावर निवडणुकीचा पुरता रंग चढला होता. तिने खर्चाची तमा न बाळगता जिंकून येण्यासाठी कंबर कसली होती. या मुद्दय़ावरून नंदाचे तिच्या नवऱ्याशी वारंवार भांडणे होत होती. त्याचा परिणाम नकळत त्यांच्या वाढत्या वयाच्या मुलांवर होत होता. निवडणूक झाली. नंदा बोटांवर मोजण्या इतपत मतांच्या फरकाने विजयी झाली. या विजयानंतर नंदाची सरपंच बनण्याची आशा अधिकच दृढ झाली. एकवेळ सदस्य म्हणून निवडून येणे सोपे, पण सरपंचपदावर निवडून येण्यासाठी सदस्यांना मॅनेज करणे महाकठीण असते, हा अनुभव सर्व गावांत थोडाफार सारखाच असतो. नेमकी इथेच गडबड झाली. प्रत्यक्षात वेगळेच घडले. तिच्या बाजूने तिचे सोडून कोणाचेच मत पडले नाही. नंदा पुरती कोलमडून गेली. सरपंचपदासाठीच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवसापासून नवरा व तिची भांडणे सुरू झाली. नवऱ्याचे म्हणणे होते, नंदाने निवडणूक लढवायला नको होती कारण त्याकरिता लागणारा पसा त्यांच्याकडे नव्हता. जो होता तो इतर कौटुंबिक गरजांसाठी होता. मुलीच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसेही वापरावे लागले होते. त्यामुळे मुलगीही नाराज झाली. पण नंदाचे म्हणणे होते की, निवडणूक लढवून तिने कोणतीच चूक केली नाही. तिला तिच्या विश्वासातल्या माणसांनी दगा दिला, नाहीतर सरपंचपदावर तिचा विजय निश्चित होता. पण या एका घटनेने त्यांच्या घरातील सौख्य, शांती मावळत नेलं ते कायमचं.

घटना दुरुस्तीमुळे जरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांची संख्या व प्रतिनिधित्व यात वाढ झाली असली तरी त्यांच्या उमेदवारीला खूप पदर आहेत. पुरुषांसारखीच राजकीय आकांक्षा बाळगणारी स्त्री निवडणुकीत अपयशी झाली तर कुटुंब तिला आधार देत नाही उलट दोष देते, असे दिसते. कुटुंबातील सत्ता टिकवणे असो की कुटुंबातील सदस्यांची मर्जी सांभाळायची असो, स्त्रियांची मदत या बाबतीत अगदी सोयीस्करपणे घेतली जाते, मात्र त्यांना काय वाटते किंवा त्यांचे विचार काय आहेत हे लक्षात घेतले जात नाही. तसेच जर स्त्रियांच्या राजकारणातील सहभागामुळे कुटुंबातील सदस्यांनी नकारात्मक भूमिका घेतली तर स्त्रियांसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण होते. असे झाल्यास स्त्रियांचा सहभाग राजकारणात अपेक्षेप्रमाणे वाढणार नाही. स्त्रियांच्या राजकारणांतील सहभागाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना कुटुंब, समाज व्यवस्था, अर्थ व्यवस्था सर्वाचीच मदत लागेल. तेव्हा या सर्व पातळीवर स्त्रियांच्या राजकीय सहभागाबाबत सकारात्मक विचार रुजवावा लागेल व त्यांचा पाठिंबाही मिळवावा लागेल.

स्त्रियांना मिळालेल्या आरक्षणाचा उपयोग वर लिहिलेल्या व्यवस्थांनी स्वत:चे हित साध्य करण्यासाठी न करता ज्या उद्देशाला समोर ठेवून हे आरक्षण लागू केले त्याची पूर्तता करण्यासाठी करायला हवा तर अधिकाधिक स्त्रिया सशक्तपणे राजकारणात उतरतील.

सुवर्णा दामले

suvarnadamle@gmail.com

chaturang@expressindia.com

(या लेखातील घटना सत्य असल्या तरी नावे, कुटुंबाचे तपशील बदलले आहेत.)

First Published on January 6, 2018 5:17 am

Web Title: articles in marathi on womens reservation