News Flash

दबंग

आवाजातली जरबेने  परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या या नव्या पिढीतल्या रणरागिणी..

|| शुभा प्रभू साटम

काही वर्षांपूर्वी लग्नात सिक्युरिटी ठेवणे ही अतिशयोक्ती वाटत होती तिथपासून आजच्या या ‘लेडी बाऊन्सर’च्या अपरिहार्य वावरापर्यंत आपण येऊन पोहोचलोय. पूर्वी फक्त पब, बार मध्ये या लेडी बाऊन्सर असायच्या. आता लग्न, सौंदर्य स्पर्धा, फॅशन शो, स्पोर्ट्स इव्हेंट, एवढंच काय पण चित्रपटाचे प्रीमियर शो, सेलेब्रिटी असणारे मोठमोठे इव्हेंट अगदी आयपीएलसाठीही या ‘लेडी बाऊन्सर’ अत्यावश्यक मानल्या जातात. गोंधळ झाल्यावर तो काबूत आणण्यापासून गोंधळ होऊच नये म्हणून सजग नजरेने वावरणाऱ्या, आत्मविश्वासी, कणखर, आवाजातली जरबेने  परिस्थिती नियंत्रणात आणणाऱ्या या नव्या पिढीतल्या रणरागिणी..

एक वीकएण्ड आणि तो साजरा करणारी गर्दी.. बेभान करणाऱ्या संगीताच्या लयीवर थिरकत उन्मुक्त होणारे अनेक आणि असे नाचणाऱ्यांना पाहणारे पण अनेक, डी. जे.च्या गाण्यावर मात करून अचानक एका कोपऱ्यात गोंधळ होतो. दोन मुली एकमेकींच्या झिंज्या उपटत डान्सफ्लोअरवर पडतात. त्यांना वेगळं करण्याचा विफल प्रयत्न करणारे त्यांचे मित्र-मत्रिणी आणि त्यातच त्यांचे चित्रीकरण करणारे हौशी, या साऱ्या गर्दीला भेदत एक जण येते.. आणि त्या दोघींना बकोटीला धरून उचलते. आजूबाजूच्यांना काय होतंय हे कळण्याच्या आत ती त्या दोघींना ढकलत बाहेर जाते आणि परत संगीताच्या धुंद लयीवर ‘पब्लिक’ थिरकू लागतं..

‘‘काय आहे ना, मॅडम हे आम्हाला नेहमीच झालय.’’ साधना तिवारी तोंडावर पाणी मारता मारता सांगत होती. ‘‘‘लेडी बाऊन्सर’ म्हटलं की असं काम आलंच.’’ आपल्याला आता ‘लेडी सिक्युरिटी’ नवीन राहिलेल्या नाहीत. पण हल्ली गेल्या दहा-एक वर्षांत ‘लेडी बाऊन्सर’ हा प्रकार मुंबई, दिल्ली, बंगळूरु, चंदीगढ, एवढंच काय पण अगदी नागपूर आणि कोल्हापूर येथेही रूढ झाला आहे. बाऊन्सर म्हणजे बार, पब येथे गोंधळ घालणाऱ्या पब्लिकला आवरणारे.. काही वर्षांपर्यंत फक्त पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या या क्षेत्रात स्त्रीवर्ग दिसू लागला आहे.

‘ग्लोब सिक्युरिटी’चे लोमेश रॉय हे सिक्युरिटी क्षेत्रातील जुने नाव. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘लेडी बाऊन्सर’ ही आजच्या बदलत्या लाइफ स्टाइलची गरज आहे. आपल्याला लेडी पोलीस किंवा सिक्युरिटी यांचं नवल वाटणं बंद झालंय. तसंच या ‘लेडी बाऊन्सर’च्या बाबतीत आहे. हल्ली समारंभ, लग्नसोहळे मोठय़ा प्रमाणात साजरे केले जातात. जेथे पुरुषांच्या अर्थात मेल सिक्युरिटीच्या काही मर्यादा असतात. ते बायकांना स्पर्श करून नियंत्रित करू शकत नाहीत, पण शिस्त ठेवणं गरजेचं असते. त्यामुळे ‘लेडी बाऊन्सर’ हल्ली सर्रास सर्वत्र आढळतात.

मेल बाऊन्सर आणि बार हे समीकरण अनेकांना माहीत असते. ‘तराट पब्लिक’ला ताळ्यावर आणणारे म्हणून! पण आता त्यांच्या जोडीला तरुणी आणि त्यातही मराठी मुली या क्षेत्रात दिसू लागलेल्या आहेत. संगीता घीवरला या व्यवसायात आठ वष्रे झाली. तिच्या म्हणण्याप्रमाणे, जेवढा मोठा सोहळा तेवढा गोंधळ होण्याची शक्यता अधिक असते. लोक आणि घरच्या समारंभात, फोटोत मग्न असतात. पाहुण्यांचे आगतस्वागत होत असते, समारंभ व्यवस्थित पार पडावा याचा ताण घराच्यांवर असतो. आणि अशा वेळी कुठल्याही क्षुल्लक कारणाने ठिणगी पडू शकते. संगीता एका मोठय़ा लग्नाला ‘बाऊन्सर’ म्हणून गेली होती. मातब्बर आणि श्रीमंत घरातल्या मुलाचे शाही लग्न! तेही प्रशस्त अशा लॉनवर. अनेक सेलेब्रेटी उपस्थित होते, त्यातल्याच एका नामवंत अभिनेत्रीसोबत काही पाहुण्यांना सेल्फी काढायचा होता. तिच्या पर्सनल पुरुष अंगरक्षकांनी त्या बायांना दूर करण्याचा प्रयत्न केला. ज्याला त्या उपस्थित बायकांनी जोरदार आक्षेप घेतला. शब्दाने शब्द वाढला. संगीताला अंदाज आला की आता परिस्थिती चिघळणार, त्यामुळे त्वरित निर्णय घेऊन तिने आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांसोबत त्या स्त्री पाहुण्यांना चुचकारून, समजावून वेगळे केले आणि त्या अभिनेत्रीला सुरक्षित बाहेर काढले. अशा वेळी स्वत:चं डोकं प्रचंड थंड ठेवावं लागतं. सगळेच ‘बडे’ लोक असतात. त्यामुळे ठाम, कणखर पण नम्र शब्दात समजूत घालावी लागते. एका अशाच लग्नात नवऱ्या मुलाच्या ‘माजी मत्रिणी’ घुसल्या आणि त्यांनी बोहल्यावर थमान घातलं. संगीता आणि तिच्या सहकाऱ्यांनी त्या सगळ्या जणींना अक्षरश: उचलून बाहेर काढलं. ती आठवण सांगताना संगीताला आजही हसू आवरत नाही.

‘टॉप सिक्युरिटी’ ही नामवंत आणि जवळपास पस्तीस र्वष जुनी एजन्सी. त्याच्या उपाध्यक्ष बीनू चेरियन यांच्या म्हणण्याप्रमाणे फक्त लग्नच नव्हे तर सौंर्दय स्पर्धा, फॅशन शो, स्पोर्ट्स इव्हेंट, एवढंच काय पण चित्रपटाचे प्रीमियर शो येथेदेखील हल्ली ‘लेडी बाऊन्सर’ची मागणी असते. अनेकदा एस्कॉर्ट म्हणून सेलिब्रेटीसोबत ‘लेडी बाऊन्सर’ जातात. एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन जर छोटय़ा शहरात किंवा ग्रामीण भागात असले तर नामवंत अभिनेत्री ‘लेडी बाऊन्सर्स’ना प्राधान्य देतात. कारण त्यांची कम्फर्ट लेव्हल त्यांच्याबरोबर अधिक चांगली असते. बाऊन्सरना काम सुरू करण्यासाठीचे ‘धडे’ दिले जातातच, पण त्यापुढे जाऊनही क्लायंटच्या मागणीप्रमाणे खास प्रशिक्षण अंतर्भूत होते. पबमध्ये बाऊन्सरचे जे काम असते त्यापेक्षा थोडे वेगळे काम इव्हेंट्स, लग्न अथवा फिल्ड वर्क येथे असतं. बाहेर असल्यामुळे बाऊन्सरना वेगळ्या तऱ्हेने सजग, तत्पर राहावं लागतं. नजर दक्ष ठेवून, प्रत्येक घडामोडींची माहिती त्यांच्या वरिष्ठांना द्यावी लागते. तसे शिस्तशीर प्रशिक्षण या बाऊन्सरना दिलं जातं. अनेकदा त्यामध्ये ज्यात सेल्फ डिफेन्सचाही अंतर्भाव असतो. अत्यंत सफाईदार आणि सहज वावर, दादागिरी न करता खमकेपणे गर्दी सांभाळणं, शिस्त राखणं हे अपेक्षित असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सर्व बाऊन्सरना गोपनीयतचं कलम असलेलं कंत्राट साइन करावं लागतं. अशी पंचतारांकित सुरक्षा अत्यंत जोखमीची असते, अनेक गोष्टी या ‘लेडी बाऊन्सर’च्या डोळ्यांसमोर घडतात ज्यामुळे क्लायंटच्या जनमानसातील प्रतिमेला धोका पोहचू शकतो पण आजपर्यंत कोणतीही गुप्त माहिती कोणत्याही ‘लेडी बाऊन्सर’कडून बाहेर गेलेली नाही हे बीनू चेरियन अत्यंत अभिमानाने सांगतात.

या मताला ‘क्रॉउन’च्या नादिरभाई आणि ‘ग्लोब’च्या लोमेश रॉय यांनी दुजोरा दिला. या सर्व ‘लेडी बाऊन्सर’ आमच्या विश्वासाला पूर्ण उतरल्या आहेत हे सर्वानी आवर्जून सांगितलं. संगीता म्हणाली, ‘‘असंख्य प्रकार, घटना आम्ही पाहतो, पण त्याचा गरफायदा घेण्याचं पाप आम्ही कधीही करणार नाही.’’ बाहेरून कठोर आणि मख्ख भासणाऱ्या या सर्व जणींचा हा मानवी चेहरा नक्कीच कौतुकास्पद आहे.

अनेक ‘लेडी बाऊन्सर’कडे असे असंख्य आठवणी, किस्से आहेत. काही मजेशीर, काही गंभीर, काही विचार करायला लावणारे. समीना जुनीजाणती बाऊन्सर रूढार्थाने तशी धिप्पाड नाही, पण तिच्या आवाजातली जरब समोरच्या माणसाला जाणवण्याइतपत असते. तिच्या म्हणण्याप्रमाणे हल्ली कुठल्याही लहानसहान गोष्टीवरून भांडणं होतात आणि समारंभाचा विचका होतो. मुख्य म्हणजे लग्न आणि कॉकटेल पार्टी असली की आम्हाला डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. जेव्हा लॉनवर किंवा मोकळ्या जागेत लग्नं होतात तेव्हा अनेक ठिकाणांहून एंट्री आणि एक्झिट असल्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण म्हणा किंवा समारंभात आयत्या वेळेला घुसणाऱ्यांची गर्दी वाढण्याचा धोका असतो. लग्न म्हटलं की दागदागिने, भेटवस्तू आल्याच. अनेक टोळ्या हल्ली लहान मुलं, एवढंच काय पण वृद्ध स्त्रियांचा वापर चोरीसाठी करतात. मुलं किंवा वृद्ध यांच्याकडे पुरुष सुरक्षा कर्मचारी यांनी सांभाळणं आणि स्त्री बाऊन्सरने त्यांना सांभाळणं यात खूप फरक असतो. समीना म्हणाली की, ‘‘आम्ही पाळीपाळीने पाहुण्यांवर लक्ष ठेवून असतो. बायका असल्यामुळे आम्ही ‘लेडीज चेंजिंग रूम किंवा टॉयलेट्समध्येही जाऊ शकतो, जे पुरुषांना शक्य नसतं.’’

या क्षेत्रात गेली १० र्वष काम करणाऱ्या एका मध्यमवर्गीय मराठी मुलीच्या मते (तिचे नाव येथे तिच्या विनंतीनुसार गुप्त ठेवलंय) अपराधाला लिंग, जात, धर्म नसतो. तो कसाही, कुठेही, कधीही घडू शकतो आणि त्या वेळी प्रसंगावधान दाखवणं गरजेचं असतं. ही मुलगी दक्षिण मुंबईमधल्या एका अति उच्चभ्रू अशा इव्हेंटमध्ये होती जो फक्त निमंत्रितांसाठीच होता. तेथे त्या क्लबच्या सदस्य असणाऱ्या काही ‘पॉश’ बायका जाऊ पाहत होत्या. त्यांच्या मते त्या क्लबच्या अधिकृत सदस्य असल्यामुळे त्यांना जाण्याचे स्वातंत्र्य आहे. गेटवर हा गोंधळ चालू असताना, व्यासपीठावर नामवंत लेखक आणि राजकारणी यांची गंभीर चर्चा चालू होती. त्यात मुळीच व्यत्यय न आणू देता, या मुलीने अस्खलित इंग्रजीत त्या बायांना समजावलं आणि वॉकीटॉकीवरून आयोजकांशी संपर्क साधून परिस्थिती सांभाळून नेली, पण तो सारा काळ तिचा कसोटी पाहाणारा ठरला.

अर्थात यावरून ‘लेडी बाऊन्सर’ या फक्त बडय़ा शाही लग्नातच किंवा समारंभात असतात असे नव्हे. नादिर शेख यांच्या मते, हल्ली ‘लेडी बाऊन्सर’ची मागणी राजकीय मेळावे, सभा, रॅली यांच्यासाठीसुद्धा होऊ लागलेली आहे. या प्रत्येक ठिकाणी कसं वागावं याचं चोख प्रशिक्षण ‘लेडी बाऊन्सर’ना दिलं जातं. ज्यातला प्रमुख भाग हा की, आपण पोलीस नाही, यामुळे कायदा कधीही हातात घ्यायचा नाही. मारहाण न करता, पोलीस येईपर्यंत परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवणे ही त्यांची मुख्य जबाबदारी. थंड डोक्याने परिस्थिती हाताळणे, हा गुण कुठल्याही बाऊ न्सरसाठी अत्यंत गरजेचा असतो. ‘क्राऊन सिक्युरिटी एजन्सी’ अगदी आय.पी.एल.साठीही ‘लेडी बाऊन्सर’ पुरवते. चीअर गर्ल्सना कोणत्याही अश्लील, अर्वाच्य प्रसंगाला सामोरे जाणे भाग पडू नये हे पाहणे त्यांचे मुख्य काम.

बाऊन्सर म्हणजे फक्त दारुडय़ांना उचलून त्यांची गठडी वळणारे असा जो समज लोकांचा असतो तो पूर्ण चूक आहे. साधना तिवारीला तो प्रसंग आठवला तरी थरकाप उडतो. एका मोठय़ा बिल्डरच्या समारंभाला ती बाऊन्सर म्हणून गेली होती. निमित्त होते पूजेचे, म्हणजे तिला तसे सांगितले होते. प्रत्यक्षात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत झोपडपट्टीवासीयांना घरांची चावी देण्याचा कार्यक्रम होता. ज्या झोपडपट्टीवासीयांना योजनेअंतर्गत घरे मिळाली नव्हती, त्यांचा जवळपास दोनेकशे लोकांचा गट तेथे मोर्चा घेऊनच आला. अत्यंत संतापलेल्या त्या जमावाच्या हातात काठय़ा, विळे, बाटल्या सगळं होतं. पुरुष सिक्युरिटी गेट अडवून होते तरीही अनेक लोक आत घुसू पाहत होते. त्या गडबडीत साधनाच्या दोन सहकारी बाहेर राहिल्या आणि जमावातल्या एका वृद्ध आजीचा पाय गेटमध्ये अडकला. साधनासमोर दोन कामं होती. मार खाणाऱ्या सहकाऱ्यांना आत घेणे आणि त्या आजीचा पाय मोकळा करणे. तिने आजीला कसेबसे मोकळे केले, गेट उघडून तिला बाहेर ढकलले आणि आपल्या सहकाऱ्यांना आत घेतले. आणखी पाच मिनिटे उशीर होता तर त्या सहकाऱ्यांची खैर नव्हती.

सोनाली खोले या क्षेत्रात आता चांगलीच रुळली आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे पबमध्ये एक वेळ पुरुषांना आवरणे सोपे असते; पण बायांना फार संयमाने हाताळावे लागते. प्रसंगावधान फार गरजेचे असते. एखादीचा फार तोल जातोय असे वाटले की, व्यवस्थापनाशी संपर्क साधून तिला बाजूला करावं लागतं.

गळ्यात गळे घालून सेल्फी काढणाऱ्या मत्रिणी चारेक तासांनंतर कधी कडाकडा भांडायला लागतील याचा नेम नसतो आणि या वेळी ठामपणे उभे राहून, प्रसंग काबूत आणणे गरजेचे ठरते. कायदा हातात न घेता कायद्याची अंमलबजावणी करणे हे महत्त्वाचे.

या सर्व जणी प्रामुख्याने निम्न आणि मध्यमवर्गीय घरातून आलेल्या असल्यामुळे अशा पंचतारांकित, झगमगत्या, उच्चभ्रू वर्तुळात सहज कसे वावरावे? नजर कशी फिरती ठेवावी? वॉकीटॉकीवरून संपर्क साधून कसा रिपोर्ट करावा? ठाम पण अदबशीर भाषेत कसे बोलावे या सर्वाचे प्रशिक्षण कामाला सुरुवात करण्यापूर्वी दिले जाते. अंजली माने (नाव बदललेले आहे) ही त्यामानाने नवखी ‘लेडी बाऊन्सर’. पोलीस खात्यात जाण्याची प्रचंड इच्छा, पण ती पूर्ण न झाल्याने अशा नोकरीमधून तिने थोडे मानसिक समाधान मिळवले. एक अनुभव तिला फार विषण्ण करून गेला. बायकोने नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडले आणि मोठय़ा हुद्दय़ावर काम करणारी ती स्त्री अंजलीच्या खांद्यावर पडून ढसाढसा रडली. ‘‘पब किंवा डिस्कोमध्ये अनेकदा जोडप्यांची भांडणे होतात आणि तेव्हा धाय मोकलून रडणाऱ्या बाईला आम्हालाच सावरावे लागते. अशा वेळी फक्त ‘लेडी बाऊन्सर’ नाही, तर बाई म्हणूनही वागणे गरजेचे असते.’’ असं ती सांगते. तिने अनेक प्रसंग पाहिलेत. वेगळे राहणारे आणि घटस्फोटाची वाट पाहणारे एक अफाट श्रीमंत जोडपे होते. त्या नवऱ्याने त्याच्या बायको आणि तिच्या बहिणी, मत्रिणीपासून वाचवण्यासाठी अंजलीला नेमले. कारण त्या सर्व जणी त्याला कुठेही गाठायच्या आणि बडवायच्या, त्याचे सिक्युरिटी गार्ड त्या बायांना हात लावू शकत नव्हते. त्यामुळे त्याने अंजली आणि तिच्या सहकाऱ्यांना जवळपास महिनाभर त्याच्यासोबत तनात केले होते. आजही त्याची आठवण काढून ती मनसोक्त हसते.

लोमेश रॉय म्हणतात की, सिक्युरिटीचे काम करताना आपण पोलीस नाही याची जाणीव सदैव बाळगणे नितांत गरजेचे असते. मुंबई- महाराष्ट्रात तुलनेने कमी, पण दिल्ली, हरयाणा, मध्य प्रदेश येथे अनेकदा लग्न समारंभामध्ये हिंसाचार घडणे अथवा गोळीबार होणे, लुटालूट याची बरीच शक्यता असते. कधी कधी तर नवऱ्यामुलीला हानी पोहोचवली जाते, किंवा लहान मुलांना लक्ष्य करतात, पळवून नेतात. अनेकदा चक्क बायका दिमाखदार पोशाख करून, बेमालूमपणे असे गुन्हे करतात. उपस्थित पाहुण्या स्त्रियांना अशा प्रसंगी कसे वागावे याची कल्पना नसते किंवा काय गुन्हा घडू शकतो हे माहीत नसते. त्यामुळे ‘लेडी बाऊन्सर’ आता गरजेचे ठरत आहेत. समीनाच्या मते समारंभ/लग्न ठिकाणी इतक्या भेटवस्तू असतात, कपडे, मोबाइल्स, मेकअप सामान, दागिने, अक्षरश: खजिना असतो. कपडे बदलताना दागिने बदलले जातात जे घाईगडबडीत तिथेच टाकले जातात, ज्यांची चोरी होण्याची शक्यता असते, किंबहुना अनेकदा तसे झालेले आहे. त्यामुळे आम्हाला फार सावधगिरीने लक्ष ठेवावे लागते. समीना आणि तिच्या सहकारी जोडी-जोडीने काम करतात. एक जण प्रत्यक्ष ठिकाणी थांबून दुसरी तपास करू शकते, त्यामुळे बाऊन्सरची जोडी असणे गरजेचे ठरते. या सर्व जणींच्या डय़ुटी किंवा कामाचे तास आठ ते बारा असतात; पण कधी कधी मोठा इव्हेंट असला, सेलेब्रिटी, क्रिकेटर, राजकारणी येणार असले की रंगीत तालीम करावी लागते, तीसुद्धा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत. हल्लीच पार पडलेल्या विराट-अनुष्का किंवा सोनम कपूर-आनंद आहुजा यांच्या लग्नात तर ‘लेडी बाऊन्सर’ची फौज तनात होती. विराट-अनुष्काच्या दिल्लीमधील स्वागत समारंभावेळी स्टेजवर कारणापेक्षा जास्त रेंगाळून सेल्फी काढू पाहणाऱ्या अनेकींना शांतपणे बाजूला करण्याचे काम ‘लेडी बाऊन्सर’च करत होत्या.

खरं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या रोजगारात किंवा मोबदल्यात फरक नेहमी आढळतो; पण ‘लेडी बाऊन्सर’ना तुलनेने जास्त पसे मिळतात, ही विशेष नमूद करण्याची गोष्ट आहे. मेल बाऊन्सर्स जसे धिप्पाड असावे लागतात, तशी गरज या स्त्रियांना नसते, पण जरबी आवाज, प्रसंगावधान, थोडेफार संगणक प्रशिक्षण, इंग्रजीमधून जुजबी संभाषण करता येणे या गोष्टी अत्यावश्यक ठरतात. त्यात हल्ली प्रथमोपचार, स्वसंरक्षण अशाही महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात. समारंभ व्यवस्थित पार पडला की अनेकदा क्लायंट खूश होऊन टिप्स देतात. सध्या हा व्यवसाय म्हणजे ‘लेडी बाऊन्सर’ असंघटित क्षेत्रात येतो; पण त्यांची युनियन करण्याचे ठरत आहे. कामावर असताना अपघात किंवा शारीरिक इजा झाली तर खर्च अनेकदा एजन्सी उचलते. सुरुवातीला बिचकत काम केलेल्या अनेक जणी आता इथे व्यवस्थित रुळल्या आहेत. जयश्री हिरेच्या मते पोलिसांची जशी वट असते तशीच आमचीही आमच्या वस्तीत वट राहते. कुटुंबाचा व्यवस्थित आणि सक्रिय पाठिंबा या सर्व जणींना असतो हे आवर्जून सांगितले गेले. कामाला सुरुवात करण्याआधीची आणि नंतरची स्त्री यात आमूलाग्र फरक पडलेला असतो. वागण्या-बोलण्यात सफाई येते, मुख्य म्हणजे आत्मविश्वास वाढतो.

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे गरजाही बदलत असतात. अपराध हा कुठेही, कसाही घडू शकतो. काही वर्षांपूर्वी लग्नात सिक्युरिटी ठेवणे ही अतिशयोक्ती वाटत होती तिथपासून आजच्या या ‘लेडी बाऊन्सर’च्या अपरिहार्य वावरापर्यंत आपण येऊन पोहोचलोय. हे का झाले? कशामुळे झाले? याची चर्चा इथे असंयुक्तिक ठरेल. त्यामुळे एक नवी संधी म्हणून या व्यवसायाकडे पाहाणे योग्य ठरते. संगीता, समीना, सोनालीसारख्या अनेक जणी आज स्वाभिमानाने रोजगार मिळवू लागलेल्या आहेत. इतकंच काय, तर ठरवून अनेक जणी या व्यवसायात पदार्पण करत आहेत. नोकऱ्या, रोजगार नाहीत अशी हाकाटी पिटताना चाकोरीबाहेरच्या अशा संधी अनेकदा समाजाकडून बघितल्या जात नाहीत. परंपरागत संकुचित मनोवृत्ती आणि बदलत्या जगाचे लक्षात न येणारे स्वरूप ही कारणे असू शकतात; पण त्याच वेळी त्याच समाजातल्या अनेक जणी या संधीचे सोने करताना दिसतात.

घरात गाऊन अथवा पंजाबी ड्रेसमध्ये वावरणाऱ्या साध्या घरगुती बाईने गणवेश घातला, की जबाबदार बाऊन्सरमध्ये सहज रूपांतर होते. बाईच्या उपजत मातृत्वाच्या वृत्तीनुसार किंवा काळजी घेण्याच्या स्वभावानुसार मग ती सगळीकडे घारीच्या नजरेनं लक्ष ठेवते आणि अनवस्था प्रसंग उद्भवण्याआधी परिस्थिती काबूत आणते. कोणत्याही पुरुष बाऊन्सरच्या तोडीस तोड अशी सक्षम.. किंबहुना जास्तच!

shubhaprabhusatam@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 12:32 am

Web Title: female security guards
Next Stories
1 आम्ही आजी आजोबा..
2 पालकांचा वाढता कल मराठी माध्यमाकडे?
3 शाळा निवडताना..
Just Now!
X