मंदा खांडगे. साहित्याची निर्मिती करणारे, संशोधन आणि संपादनातले एक प्रयोगशील व्यक्तिमत्त्व. त्यांची सुमारे पन्नास पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. ‘स्त्री साहित्याचा मागोवा’ घेणाऱ्या चार खंडांच्या मुख्य संपादक आणि ‘भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा’ या दोन खंडांच्या प्रकल्पप्रमुख असणाऱ्या मंदा खांडगे १८ मे रोजी सत्तरी पूर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा..

 

Kharge on narendra modi
“मोदींनी तरुणांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले”, मल्लिकार्जुन खरगेंचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप; काय म्हणाले?
pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
Dr Anand Deshpande talk about How to take the industry forward
उद्योगाला पुढे कसे न्यावे? जाणून घ्या पर्सिस्टंटचे डॉ. आनंद देशपांडे यांचा गुरुमंत्र…
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत

‘‘तात्यासाहेबांच्या नाशिकच्या घरी मी त्यांना भेटायला गेले होते. तात्यासाहेब आतल्या खोलीत होते. नुकतेच आजारपणातून उठलेले. त्यांना भेटायला काही माणसं आली होती. गर्दी कमी झाल्यावर त्यांना भेटू या, असा विचार मी केला. बराच वेळ एकटीच बसलेले. मनात तात्यासाहेबांच्या कविता घोळत होत्या. नाशिकहून वीस मैलांवर पिंपळगाव. या पिंपळगाव बसवंतपासून पाच मैलांवर असलेलं शिरवाड हे तात्यासाहेबांचं मूळ गाव. या गावाचं वर्णन त्यांनी ‘मायदेशाचा वारा’ या कवितेत केलं आहे.
‘द्राक्षांचे बहरत बाग मनोहर जेथे
त्या सुनित वेली रांग पऱ्यांची गमते
कटि कंठा वरती, वरती मौकीक हारा
हा काय माझिया मायदेशचा वारा’
या काव्यपंक्ती मनात रुंजी घालू लागल्या. आणि नव्या उत्सुक नजरेनं तात्यासाहेबांचं- कवीवर्य कुसुमाग्रजांचं घर न्याहाळू लागले. मनात त्याच क्षणी लेखनासाठीचा पुढचा विषय उभा राहिला. कवींच्या गावी जायचं, त्यांचं जन्मघर शोधायचं, त्यांचं वास्तव्य जिथे झालं तो परिसर पाहायचा, ते गाव त्या गावाशी असलेले कवीचे भावबंध याविषयी लिहायचं..’’ मंदा खांडगे सांगत होत्या. ‘‘तात्यासाहेबांची भेट झाली. ‘वैभव पेशवेकालीन वाडय़ांचे’ हे त्या वेळी नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक त्यांना भेट दिलं. त्यांनी नवीन काय लिहिते आहे याविषयी चौकशी केली. मी त्यांना मनात स्फुरलेला विषय सांगितला. यांना ही कल्पना खूप आवडली. त्यांनी मौलिक सूचना केल्या. प्रत्येक कवीच्या काव्याचा अभ्यास करायला सांगितला. नाशिकहून परतीच्या वाटेवर असताना हा विषय मनात रुजू लागलेला.’’ मंदा खांडगे यांच्या ‘कवीच्या गावा जावे’ या लेखमालेची जन्मकहाणी. त्यांची ही लेखमाला ‘महाराष्ट्र साहित्यपत्रिका’मधून प्रसिद्ध झाली. पुढे याच शीर्षकाने त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले.
केशवसुत ते बा. सी. मर्ढेकर हा टप्पा निश्चित करून त्यांनी कामाला सुरुवात केली. कोकण, गोवा, खान्देश, बेळगाव, विदर्भ, मराठवाडा, मावळ आदी ठिकाणी हिंडून हा आगळावेगळा प्रकल्प त्यांनी पूर्ण केला. ही भ्रमंती करताना तिथली भौगोलिक आणि प्रादेशिक वैशिष्टय़े सौंदर्यस्थळं, तिथलं जनजीवन त्यांनी अनुभवलं. महाराष्ट्रातल्या नामवंत साहित्यिकांनी या लेखमालेची दखल घेतली. द्वा. भ. कर्णिक, शंकर वैद्य, डॉ. हे. वि. इनामदार, यदुनाथ थत्ते, मालती बेडेकर, शांता शेळके, निर्मला देशपांडे, संजीवनी मराठे, पद्मा गोळे, डॉ. वि. म. कुलकर्णी, आदींनी पत्र पाठवून लेख आवडल्याचे कळवले.
मंदा खांडगे. साहित्याची निर्मिती करणारे, संशोधन आणि संपादनात रमून जाणारे, चेहऱ्यावर मृदू, प्रसन्न भाव असणारे एक विलोभनीय व्यक्तिमत्त्व! परिपक्व अभ्यासूवृत्ती, व्यक्तिमत्त्वातील करारीपणा, संघटन कौशल्य हे त्यांच्यातले गुण त्यांच्या सान्निध्यात गेल्यावर चटकन लक्षात येतात. जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने त्या अनेक कामे मार्गी लावतात. एक आश्वासक असे हे व्यक्तिमत्त्व. अवघ्या महाराष्ट्राला ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, ‘फुलपाखरू छान किती दिसते’ यांसारखी सुंदर बालगीते देणारे ज्येष्ठ कवी व शिक्षणतज्ज्ञ कै. प्रा. ग. ह. पाटील हे त्यांचे वडील. आर्थिक, बौद्धिक, वैचारिक समृद्धी असलेल्या निकोप वातावरणात लेखनाचे त्यांच्यावर संस्कार झाले. वडिलांकडून साहित्याचा समृद्ध वारसा लाभलेल्या मंदा खांडगे आपल्या साहित्यिक जडणघडणीत प्रा. गं. बा. सरदार आणि डॉ. हे. वि. इनामदार सरांचं मार्गदर्शन लाभलं याचा आवर्जून उल्लेख करतात.
16
ललित गद्य, वैचारिक, बालसाहित्य, काव्य, संपादन, समीक्षा अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी लेखन केले आहे. त्यांची सुमारे पन्नास पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. ‘व्यक्तिरंग’, ‘एक झोका’, ‘सोनफुलं’, ‘प्रबंध एकादशी’, ‘गस्तवाल्याची गीते’, ‘बालसाहित्य : बालशिक्षण : विविध आयाम’ आदी त्यांची काही उल्लेखनीय ग्रंथसंपदा. त्यांच्या वाङ्मयीन कार्याबद्दल पुणे महानगरपालिका महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, ना. सी. फडके प्रतिष्ठान, मुंबई, साहित्य संघ, बडोदे वाङ्मय परिषद अशा साहित्य संस्थांचे पस्तीस पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांच्या ‘एक झोका’ला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा उत्कृष्ट ललित लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रयोगशील लेखन ही खांडगे यांची वृत्ती आहे. ‘वैभव पेशवेकालीन वाडय़ांचे’ ही त्यांची वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली लेखमाला अतिशय गाजली. ‘पेशवेकालीन सरदारांचे वाडे’ हा संशोधनासाठी त्यांनी निवडलेला विषय आव्हानात्मक होता तसाच पुणेकरांच्या जिव्हाळ्याचाही होता. पुण्यातील पेशवेकालीन सरदारांच्या वास्तुवैशिष्टय़ांबरोबर अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिविषयक संदर्भाची त्यांनी नोंद घेतली आहे. हे वाडे आता काळाच्या ओघात नष्ट होत चालले असले तरी या लेखनाद्वारे पुस्तकरूपाने जिवंत आहेत. एक मौलिक काम खांडगे यांनी करून ठेवले आहे. पेशवाई वास्तुकला केव्हाच मागे पडली, पण या अभ्यासरूपाने पुढील पिढीसाठी एक दस्तऐवज निर्माण झाला. स्थापत्यशास्त्राच्या अभ्यासकांना अभ्यासासाठी यातून अनेक विषय मिळाले. एक संदर्भग्रंथ म्हणून त्यांना या पुस्तकाचा उपयोग होत आहे.
ग. ह. पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांनी ‘बालशिक्षण : बालसाहित्य : विविध आयाम’ हा एक वेगळा अभ्यासपूर्ण ग्रंथ संपादित केला. प्रा. ज. के. रानडे यांचा पासष्ट वर्षांपूर्वीचा पुणे विद्यापीठाला सादर केलेला ‘वारली लोकगीते व वारली बोली’ हा प्रबंध संपादकीय संस्करण करून संपादित केला. हा ग्रंथ वारली बोलीच्या भाषाशास्त्रीय अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. बालसाहित्यात त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे. सुमारे वीस र्वष त्यांनी मुक्त पत्रकारिता केली. बालकुमारांच्या ‘आनंद’ मासिकाचे कार्यकारी संपादकपद चार र्वष सांभाळले. पाच र्वष पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या त्या सदस्य होत्या. पीएच.डी.साठी ‘अर्वाचीन मराठी कवयित्रींच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन करत असताना त्यांना स्त्रियांच्या साहित्याचे खूप कमी संदर्भ आहेत हे जाणवले. तसेच वाङ्मयाच्या इतिहासात स्त्रियांच्या साहित्याला गौण स्थान असल्याचे जाणवले. त्यामुळे स्त्रियांच्या साहित्याचा अभ्यास एकत्रितपणे व्हायला हवा ही ऊर्मी त्यांच्या मनात सतत होती. गेली पन्नास र्वष पुण्याच्या सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात पृथगात्म कार्य करून आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या नामवंत संस्थेच्या त्या तीस वर्षांपूर्वी सदस्य झाल्या. या संस्थेत साहित्याची आवड आणि संशोधनाची जाण असलेल्या अनेक सदस्या होत्या. अभ्यासूवृत्तीच्या सदस्यांच्या सहकार्याने स्त्रीसाहित्यविषयक संशोधनाचे काम हाती घ्यावे असे ठरवून सातत्याने त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. १९९७ मध्ये त्या या संस्थेच्या अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संशोधनाचे महत्त्व जाणणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने संशोधन विभागाची मुहूर्तमेढ रोवली. एका लहानशा संस्थेत संशोधन विभाग निर्माण करणे, त्यामार्फत विद्यापीठाच्या तोडीचे अनेक प्रकल्प राबवून ते प्रकाशित करणे, संशोधन विभाग सतत कार्यरत ठेवणे ही धाडसाची गोष्ट आहे. पंधरा र्वष अध्यक्षपद सांभाळल्यानंतर त्या आता संस्थेच्या विश्वस्त असून संशोधन विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दुर्लक्षित असलेल्या स्त्री साहित्याचा अभ्यास संपादक मंडळ आणि अनेक अभ्यासकांच्या सहकार्याने तीन खंडांत पूर्ण झाला. अनेक वर्षांचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. ‘स्त्री साहित्याच्या मागोवा (१८५० ते २०००)’ या ग्रंथांना आठ पुरस्कार प्राप्त झाले. यानंतर ‘भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा’ हा प्रकल्प इंग्रजी आणि मराठीत दोन खंडांत प्रकाशित केला. स्त्री साहित्याचे अभ्यासक तसेच समाजशास्त्राचे अभ्यासक यांना उपयुक्त असे हे काम आहे. स्त्री साहित्याचा चौथा खंडही प्रकाशित झाला असून त्याला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कारही मिळाला आहे. खांडगे यांच्या पुढाकारातून आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेले हे दालन प्रकाशात आले. मराठी वाङ्मयाच्या इतिहासाला याची निश्चित नोंद घ्यावी लागेल. हे काम सांघिक आहे. सर्वाचे सहकार्य आहे. म्हणूनच हे काम शक्य होते आहे, असे त्या आवर्जून सांगतात. खांडगे यांनी ‘स्त्रीशक्ती’ अचूक हेरली आहे. त्यातूनच संशोधनाचे हे मोठे शिवधनुष्य पेलता येऊ शकेल हे त्यांनी जाणले आहे. संपादन हे त्यांच्या रक्तातच मुरले आहे. आजपर्यंत स्वतंत्रपणे ही त्यांनी अनेक संपादने केली आहेत.
आपल्या लेखनाबरोबरच सामाजिक बांधिलकी महत्त्वाची म्हणून त्या नि:स्वार्थी वृत्तीने साहित्यप्रेमींच्या संशोधन विभागाचे काम करत आहेत. एक कुशल संघटक म्हणून त्यांना प्रशंसले जाते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. आयुष्यातल्या सात दशकातील पाच दशके त्या लेखनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. लिहिता हात मनाला सतत गुंतवून ठेवतो. त्यामुळे आयुष्यातून उणं झालेलं वर्षही त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांच्या मनामध्ये उत्साहाचं एक झाड सदैव फुलत असतं. त्यातून अनेकांना ऊर्जा मिळते.
मराठी साहित्यविश्वातील एक प्रयोगशील लेखिका, स्त्री साहित्याच्या अभ्यासक व संशोधन प्रकल्पांच्या प्रवर्तक, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ या संस्थेतर्फे विविध साहित्यिक उपक्रम राबवून समाजामध्ये साहित्यविषयक जाण रुजवू पाहणाऱ्या कृतिशील लेखिका म्हणून मंदा खांडगे यांची मराठी साहित्यात नोंद घ्यावी लागते.
mulickkeerti@gmail.com