15 December 2017

News Flash

सरस्वतीची सुकन्या

प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या या विदुषीच्या आजच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त खास लेख..

मधुवंती सप्रे | Updated: June 18, 2016 4:19 AM

जीवरसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्या डॉ. कमलाबाई सोहोनी या भारतातल्या पहिल्या स्त्री शास्त्रज्ञ. सर्वोत्कृष्ट संशोधनाचे पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० रोजी मिळालं आणि विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठीचा शेवटचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना १९९७ मध्ये मिळाला. दरम्यान, त्यांनी परदेशात आणि देशातही संशोधनाचं महत्त्वाचं काम केलं. त्यांच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी आपलं सारं आयुष्य अन्नभेसळी विरोधातच काम करण्यात व्यतीत केलं. प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या या विदुषीच्या आजच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त खास लेख..

स्थळ बंगळुरू – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स. – २ जुलै १९३३ नऊवारी साडीतली, केसाची घट्ट वेणी, गोरी गोमटी, नाजूक अशी २० वर्षांची मुलगी, बरोबर वडील, दोघेही रेल्वेने बंगळुरूला आले. तिथल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी. तिला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. त्या मुलीच्या वडिलांनी १९११ मध्येच पहिल्या तुकडीत इथे प्रवेश घेऊन ‘ऑरगॅनिक केमिस्ट्रीत’ पदव्युत्तर संशोधन केलं होतं. त्यानंतर त्यांच्या भावानेही म्हणजे तिच्या काकांनीही इथे संशोधन करून मुंबई विद्यापीठाकडे एम.एस्सी.साठी प्रबंध देऊन ‘मूस गोल्ड मेडल’ मिळवलं होतं. या पाश्र्वभूमीवर वडील व काका यांचा वारसा घेऊन ती मुलगी इथे आली होती. कारण तिने केमिस्ट्री-फिजिक्स घेऊन बी.एस्सी. केलं होतं आणि ती मुंबई विद्यापीठात पहिली आली होती.
त्या इन्स्टिटय़ूटचे संचालक होते जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते सर चंद्रशेखर व्यंकट रामण उर्फ सी. रामन. मुलगी व वडील त्यांना भेटायला गेले. कारण संस्थेने प्रवेशासाठी पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवले होते. पण संस्थेकडून तिला पत्र आलं होतं, ‘अर्ज नामंजूर’. कारण होतं, ‘स्त्रियांना प्रवेश देण्याची आमच्याकडे प्रथा नाही.’ हे उत्तर वाचून वडील व मुलगी मुंबईहून रामन यांना भेटायला आले. वडिलांना वाटलं, एक नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ दुसऱ्या लायक व्यक्तीला शास्त्र शिकण्याची संधी नाकारेल हे शक्य वाटत नाही. रामन यांच्या कार्यालयात मुलगी व वडील गेले. त्यांची प्रश्नोत्तरं अर्थातच इंग्रजीतून झाली.
सर सी.व्ही. रामन – ‘‘भागवत, मी तुमच्यासाठी काय करू?’’
भागवत – ‘‘काही तरी गरसमज झालेला दिसतोय. ही माझी मुलगी मुंबई विद्यापीठात पहिली आलीय पण तिला प्रवेश नाही, असं कळवलं गेलं.’’
रामन – ‘‘ती मुलगी म्हणून आम्ही प्रवेश नाकारलाय.’’
भागवत – ‘‘केवळ स्त्री म्हणून बुद्धिमंत व्यक्तीला उच्च शिक्षणाची संधी नाकारताय, तेही २०व्या शतकात आणि आपण जगद्विख्यात शास्त्रज्ञ.’’
रामन – ‘‘कोणतीही चर्चा-वाद नकोत. भागवत, शास्त्रीय संशोधन हा स्त्रियांचा प्रांत नव्हे.’’
हे ऐकून अन्याय आणि अपमानाच्या भावनेने ती मुलगी थरथर कापत होती. सत्तेपुढे शहाणपण नसते या विचाराने ती इतका वेळ गप्प बसली होती. पुढे रामन म्हणाले, ‘‘आधीच मला मुली आवडत नाहीत. मुली म्हणजे कटकट, नसता जंजाळ! सुदैवाने ईश्वराने माझ्यामागे हा जंजाळ लावला नाही. दोन्ही मुलगेच दिले. मग मी इथे इन्स्टिटय़ूटमध्ये काय म्हणून हा त्रास मागे लावून घेऊ. माझ्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्ष का उगीच अभ्यासातून विचलित होऊ देऊ.’’
आता मात्र ती मुलगी गप्प बसायला तयार नव्हती. तिला घरात मुलगा-मुलगी भेदभाव माहीत नव्हता. विश्व विद्यालयात तिने खेळातही प्रावीण्य मिळवलं होतं. त्यामुळे तिला आत्मविश्वास होताच. तिने रामनना विचारलं, ‘‘माझ्यात काय कमी आहे म्हणून प्रवेश नाकारता? मुंबई विद्यापीठाने मुलींना उत्तेजन देण्याकरिता, इन्टर सायन्सच्या परीक्षेत प्रथम येणारीला शिष्यवृत्ती ठेवली आहे. ती ‘सत्यवती लल्लुभाई शामळदास’ शिष्यवृत्ती मी मिळवली आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून माझ्यानंतर येणाऱ्या मुलींवर अन्याय करता आहात. पण आम्ही गांधीजींच्या तत्त्वावर निष्ठा बाळगणारी माणसं आहोत. सत्याग्रहावर विश्वास ठेवणारी आहोत. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार आणि तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’’
आता मात्र हे उत्कृष्ट इंग्रजीतलं बोलणं ऐकून सर रामन चमकले. ते थोडय़ा मवाळ स्वरात म्हणाले, ‘‘ठीक आहे, तुझा एवढा हट्टच असेल तर देईन मी तुला इथे प्रवेश, पण एका अटीवर. एक वर्ष तुला इथे प्रोबेशनवर काम करावं लागेल. तुझ्या कामाची पद्धत पसंत पडली तर तुला रीतसर प्रवेश मिळेल.’’
‘‘कबूल.’’ मनातल्या मनात संतापानं जळफळत वरकरणी शांतपणे ती म्हणाली आणि तिने प्रतिज्ञा केली, ‘उत्तम काम करून सी. रामन यांना त्यांचे शब्द मागे घ्यायला लावीन. तरच खरी, कमला नारायण भागवत!’ सुप्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांची पाठची बहीण आणि पहिली भारतीय स्त्री शास्त्रज्ञ. त्यांचं संशोधन म्हणजे त्यांचे जगभर प्रसिद्ध झालेले १५५ संशोधनपर लेख. त्यांच्या हातून देशाला उपयुक्त संशोधन घडलं. तो कालखंड होता १९३४ ते १९६८.
सर रामनबरोबरच्या शाब्दिक चकमकीनंतर ती जीवरसायनशास्त्र शाखेत, त्या शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सुब्रह्मण्यम यांना भेटली. त्या शाखेचे व्याख्याते बॅनर्जी, श्रीनिवासय्या या तिघांनाही सी. रामन यांची विचित्र अट ऐकून आश्चर्य वाटलं. कमलाची लहानखुरी मूर्ती, तिचं अभ्यासातलं प्रावीण्य हे पाहून श्रीनिवासय्या म्हणाले, ‘‘ठीक आहे, माझ्या हाताखाली काम कर. पण मला आळस, अळंटळं केलेलं मुळीच खपणार नाही.’’ मग ते कमलाच्या वडिलांना म्हणाले, ‘‘तुमच्या मुलीनं सर रामन यांची चमत्कारिक अट स्वीकारली, पण ‘घी देखा लेकिन बडगा नही देखा’ असं व्हायला नको.’’
कमलाने विचारलं, ‘‘पण सर एक वर्ष प्रोबेशन म्हणजे काय?’’
ते म्हणाले, ‘‘इथे दोन र्वष संशोधन केल्यावर डिग्री मिळते. पण तुम्ही एक र्वष प्रोबेशन म्हणजे तुमचं वर्षांचं काम एम.एस्सी.साठी विचारात घेतलं जाणार नाही. आणि ऐका. रोज पहाटे पाच वाजता प्रयोगशाळेत हजर व्हायचं ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करायचं. मी देईन ते प्रोगॉम्स, प्रॉब्लेम्स केले पाहिजेत. रात्री लायब्ररीत वाचन केलं पाहिजे.’’
वडील म्हणाले, ‘‘आणि तिचं जेवणखाण.’’
‘‘त्याची काळजी नको. माझा दुपारचा डबा येतो. त्यात ती जेवेल. रात्री या संस्थेच्या मेसमध्ये जेवेल.’’
कमला म्हणाली, ‘‘ठीक आहे, या अटी मला मान्य आहेत. पण माझीही एक अट आपण मान्य करा, अशी मी विनंती करते. मला रोज सायंकाळी ४ ते ६ दोन तास कामातून सुट्टी द्यावी. मी या दोन तासांत टेनिस खेळणार आहे.’’
‘‘टेनिस?’’ श्रीनिवासय्यांना आश्चर्य वाटलं.
‘‘हो, टेनिस. कारण मला टेनिस मनापासून आवडतं. तुम्ही दिलेला कठीण कार्यक्रम पार पाडण्यासाठी खेळून माझं शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.’’
कमलाला राहायला कँपसमध्ये छोटंसं घर, सोबतीला बाई दिली गेली आणि तिचं काम पहाटे पाचपासून सुरू झालं. उपकरणं वापरणं, काम समजून घेणं, दिलेलं काम करणं, यात तीन-चार महिने केव्हा गेले कळलंच नाही. पण श्रीनिवासय्या मात्र खूश झाले. तिची काम करण्याची चिकाटी, नवीन ज्ञान मिळवण्याची धडपड. एक दिवस ते म्हणाले, ‘‘मिस भागवत, तुम्ही आता संशोधन सुरू करा.’’ कमलाचा आपल्या कानांवर विश्वास बसेना. ‘‘चालेल का पण?’’ तिनं अधीरतेने विचारलं.
‘‘अवश्य चालेल. संशोधनात मन केंद्रित करण्यासाठी लागणारी स्थिरबुद्धी तुमच्याकडे आहे. प्रथम प्रोटीन्स, नॉन प्रोटीन्स वेगळी काढा.’’ संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात कमलाने प्रथिनांचे तीन स्तरांवर पृथक्करण केलं. त्यात नव्या कार्यपद्धती शिकली. त्या पुरुषांच्या राज्यात अभ्यासाव्यतिरिक्त विरंगुळा एकच -टेनिस. तेही ती एकटीच खेळत असे.
तिचे गुरू श्रीनिवासय्या तिला तिच्या कामाचं श्रेय देत, अगदी कौतुकाने. सायंटिफिक पेपर्स कसे लिहावे हे त्यांनी तिला शिकवलं. ते तिला शास्त्रीय पुस्तकं वाचायला देत आणि तिच्याकडून त्यावर परीक्षण लिहून घेत. दूध आणि कडधान्यांवरचं तिचं संशोधन गाजलं, ते सर्व इथे देणं अशक्य आहे. त्यावरती तिचे लेखही प्रसिद्ध झाले. तिला अधिक संशोधनाची ओढ लागली. आत्मविश्वास व ज्ञान संपादनाची महत्त्वाकांक्षा तर होतीच. पण पुढे शिकण्याचा आíथक भार वडिलांवर टाकायचा नव्हता त्यासाठी शिष्यवृत्ती मिळवायची असं तिनं ठरवलं आणि सरकारने (ब्रिटिश) स्थापन केलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीकडे अर्ज केला आणि तिला ती शिष्यवृत्ती मिळाली, अशी शिष्यवृत्ती मिळवणारी ती पहिलीच मुलगी होती.
एक वर्ष संपल्यावर कमला सी.व्ही. रामन यांना भेटली. म्हणाली, ‘‘सर, वर्ष पूर्ण झालं. माझ्या प्रवेशाचं काय?’’ रामन म्हणाले, ‘‘अर्थात तू इथे राहून संशोधन पुरं कर. तुझी ज्ञानलालसा, तळमळ, जिद्द पाहून मला इतका आनंद झालाय की मी आणखी दोन मुलींना या वर्षी प्रवेश देऊन माझी चूक सुधारणार आहे.’’ पुढे म्हणाले, ‘‘तू टेनिस चांगलं खेळतेस म्हणे. मी पाहिलं आणि ऐकलंही. मीही तुझ्याबरोबर एक दोन सेट्स खेळेन. चालेल ना?’’ कमलाला आनंद झाला. हेच का ते वर्षांपूर्वीचे रामन! मुली म्हणजे कटकट, जंजाळ म्हणणारे!
१९३६ मध्ये कमलाचा प्रबंध पूर्ण झाला. तिला मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्सी.ची पदवी मिळाली. आता पीएच.डी.! तिने जानेवारी १९३७ मध्ये मुंबईच्या हॉफकिन इन्स्टिटय़ूटमधे प्रवेश घेतला. औषधासाठी प्राण्यांचं विच्छेदन करण्याचं काम तिच्याकडे आलं. ते काम करता करता इकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणं चालू होतं. आणि मुंबई विद्यापीठाने तिला दोन शिष्यवृत्त्या दिल्या. ‘िस्प्रगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या दोन्ही शिष्यवृत्त्या मिळवणारीही ती पहिलीच विद्याíथनी. आणि शिक्षणाचा पुढचा टप्पा सुरू झाला. १८ सप्टेंबर १९३७ रोजी राणपुरा बोटीने इंग्लडला जाण्यासाठी तिने प्रस्थान ठेवलं. इंग्लंडमध्ये पुष्कळ कॉलेजेस् होती. पण कोणत्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा हे तिला माहीत नव्हतं. एक गोष्ट पक्की होती. जीवरसायनशास्त्रात संशोधन करायचं.
जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यामुळे कमलाला पीएच.डी.साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमधे प्रवेश मिळाला. मुंबईत असताना १९३६ मध्ये तिने अमेरिकेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण वेळ टळून गेली होती. तिला पुढच्या वर्षी अर्ज करा, असं त्या विमेन विद्यापीठानं कळवलं होतं. पण कमलाने केंब्रिजला प्रवेश मिळताच त्या विद्यापीठाला कळवून टाकलं. ‘मी यंदा अर्ज करणार नाही. मला दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. माझं संशोधन चालू आहे,’ असं पत्र एका स्त्रीकडून तेही एक मागास देशातल्या स्त्रीकडून, पाहून तिथल्या उच्चपदस्थांनी जीवरसायनशास्त्राचे जनक आणि नोबेल पुरस्कार विजेते सर गॉलंड हॉपकिन्स यांना पत्र पाठवून विचारलं, ‘ही अजब मुलगी कोण? तिची माहिती कळवा.’ हॉपकिन्सनी कळवलं, ‘अत्यंत बुद्धिमान, कठोर परिश्रम करणारी ध्येयवेडी मुलगी आहे.’ हॉपकिन्सचं हे प्रशंसापत्र पाहून ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ युनिव्हर्सटिी, विमेन’ फार प्रभावित झाली. त्यांनी कमलाला ताबडतोब पत्र लिहिलं, ‘‘आम्ही तुला प्रवासी शिष्यवृत्ती देत आहोत. तिच्या आधारे तू अमेरिकेत ये.’’ (१९३८) ‘काही तरी घोटाळा आहे. ही शिष्यवृत्ती तर प्रोफेसरना देतात, मला कशी?’ असा प्रश्न कमलाला पडला. तिने हॉपकिन्सना विचारलं. त्यांनी सगळी हकिगत सांगून म्हटलं, ‘यात काही घोटाळा नाही.’ अर्थात कमलाला अत्यंत आनंद झाला. मार्च १९३८मध्ये युरोपात लीग ऑफ नेशन्सची बठक होती. तेथील विद्यार्थी परिषदेला हजर राहा, असं तिला सांगण्यात आलं. तेही भारत, इंग्लड, अमेरिका या तीन देशांतील विद्यार्थ्यांची प्रतिनिधी म्हणून. कारण काय तर ती भारतीय, शिकत होती केंब्रिजमध्ये (म्हणजे युरोपात) आणि अमेरिकन फेडरेशनने तिला फेलोशिप दिली म्हणून ती अमेरिकन विद्यार्थिनीपण होती. लक्झेंबर्गला ती गेली. तिला ठरावीक प्रश्न विचारण्यात आले. आपल्या भाषणात तिने सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या संशोधनाच्या आवडीबद्दल सांगताना वडिलांचा संदर्भ दिला. घरातलं मोकळं वातावरण आणि वडिलांनी मुलगी म्हणून कधीच आडकाठी केली नाही. मला ज्यात रस होता ते शिकण्यासाठी मदत केली. तिच्या या भाषणाचं अर्थातच कौतुक झालं.
केंब्रिजला परतल्यावर तिचं संशोधनाचं काम सुरू झालं. आता तिनं व डॉ. डेरिक यांनी वनस्पतींवर काम सुरू केलं. प्रचंड आणि सातत्याने काम करत असताना तो क्षण आला. अचानक कमलाला एक महत्त्वाचा शोध लागला. बटाटय़ातील प्रेसिपिटेट हँड-स्पेक्ट्रोस्कोपमधून पाहताना तिला एक निराळ्याच रंगाची रेष दिसली. त्याचं नाव सायट्रोक्रोम ‘सी’. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या सायट्रोक्रोम घटकाचा शोध होता तो. तिने आणि मार्गदर्शक रॉबिन यांनी अधिक अभ्यास करून त्यावर लेख लिहिला. आजही जगात वनस्पतींच्या श्वसनाचा विषय चच्रेला येतो तेव्हा कमला भागवत यांचा व ‘नेचर’मधील त्यांच्या लेखाचा (१९३९) उल्लेख असतोच. ‘वनस्पतींमध्ये सायटोक्रोमचा शोध’ हा पीएच.डी.चा विषय तिला आवडला. तिने मार्गदर्शक रॉबिन यांचा सल्ला घेऊन प्रबंध लिहिला.
पीएच.डी.ची व्हायवा (तोंडी परीक्षा) होण्यापूर्वी सर हॉपकिन्स यांनी विद्वान शास्त्रज्ञांना आमंत्रण पाठवून एक विद्वत् सभा आयोजित केली. नामवंत संशोधक आणि नोबेल पुरस्कार विजेते त्यात उपस्थित होते. हॉपकिन्स यांच्या आग्रहावरून सायटोक्रोम ‘सी’ विषयावरचं आपलं संशोधन तिनं या सभेत उत्तम  भाषेत मांडलं.
12
१८ डिसेंबर १९३७ रोजी तिने सर विल्यम डन इन्स्टिटय़ूट ऑफ बायोकेमिस्ट्रीमधे प्रवेश घेतला आणि मार्च १९३९ मध्ये म्हणजे एक वर्ष तीन महिन्यांत आपला पीएच.डी.चा प्रबंध सादर केला. ४ जून १९३९ रोजी तिला पीएच.डी. मिळाली. केंब्रिज विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळवणारी ती पहिली भारतीय स्त्री आणि मराठी भाषिक. १४ महिन्यांत प्रबंध हा एक विक्रमच होता. अनेकांनी आग्रह करूनही परदेशात मिळालेलं शिक्षण, ज्ञान आपल्या देशासाठी उपयोगात आणायचं या उदात्त विचाराने ती भारतात परतली..
तत्पूर्वी, भारतात परतण्यापूर्वी एक घटना घडलेली होती.. दिल्लीच्या लेडी हार्डिज कॉलेजला ‘लेडी डफरीन फंड’ची मदत होत होती. आणि त्या फंडच्या सल्लागार समितीवर कमलाबाईंचे केंब्रिजमध्ये गुरू सर एफ. जी. हॉफकिन्स होते. त्या कॉलेजमध्ये जीवरसायनश्स्त्र विभाग नव्याने उघडण्यात येणार होता. तिथे विभाग प्रमुख म्हणून सर हॉफकिन्सनी कमलाबाईंचं नाव कळवून टाकलं. त्या वेळी कमलाबाई पीएच.डी.साठीच्या संशोधनात मग्न होत्या. त्या हॉफकिन्सना म्हणाल्या, ‘मी ज्या कामासाठी इथे आलेय ते पूर्ण झाल्याशिवाय परत जाण्याचा विचारही करणार नाही.’ हॉफकिन्सना त्याचं कौतुक वाटलं. त्यांनी दिल्लीला कळवलं, ‘ती जागा कमला भागवत यांच्यासाठी राखून ठेवावी. ते पद भरू नये.’ त्यामुळे भारतात आल्यावर १ ऑक्टोबर १९३९ पासून कमला भागवत दिल्लीत लेडी हाìडज कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्राच्या व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या. दिल्लीत वडील बरोबर आले होते. त्यांनी मुलीला जागा शोधून दिली. सोबत यमुताई या विश्वासू बाई आणि गणू नावाचा नोकर दिला. आणि कमलाबाईंचा दिल्लीतला संसार भांडय़ाकुंडय़ांसह थाटून दिला. कमलाबाईंना शेजारही चांगला मिळाला. संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे, रिझव्‍‌र्ह बँकेचे श्री. आडारकर, महात्मा गांधींचा मुलगा देवीदास गांधी आदी. कॉलेजबरोबरच दुसऱ्या आणि चौथ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानं द्यायची (जीवरसायनशास्त्र) आणि प्रॉक्टिकल्स करून घ्यायची. कॉलेजशी संलग्न असलेल्या रुग्णालयामधून आलेल्या रक्ताच्या नमुन्यांचं पृथक्करण करायचं आदी कामं असत. त्यांना स्वतंत्र ऑफिस व स्वतंत्र प्रयोगशाळा दिलेली होती. जवळच टेनिस कोर्ट, तर दुसऱ्या बाजूला पोहण्याचा तलाव होता. सर्व व्यवस्था उत्तम. पण जे काम होतं ते शुष्क आणि नीरस वाटायचं.
डॉ. सुशीला नायर या लेडी हॉìडज हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून काम करीत होत्या. त्यांनी एक दिवस कमलाबाईंना विचारलं, ‘तू मला संशोधनात मदत करशील का?’ संशोधन हा शब्द ऐकताच त्यांना आनंदून होकार भरला. त्यांच्या संशोधनाचा विषय होता, ‘रक्तातला कोलेस्टेरॉल व निरनिराळ्या दुखण्यांत त्याचा होणारा प्रभाव!’ डॉ. सुशीलांना एम.डी. पदवी मिळाली. दिल्लीत कमलाबाईंच्या वडिलांचे मित्र श्री. भांडारकर होते. त्यांनी कमलाबाईंचं टेनिसमधलं प्रावीण्य लक्षात घेऊन त्यांना तालकटोरा क्लबचं सभासद केलं.
पण इतकं सगळं सुरळीत आयुष्य एकटय़ा राहणाऱ्या तरुण स्त्रीच्या वाटय़ाला कसं येणार? त्यात ती बुद्धिमान, रूपवती, परदेशात डिग्री घेऊन आलेली, मोकळ्या स्वभावाची. काही अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी भांडारकरांची मदत घेऊन त्यांचा बंदोबस्त केला. एकटय़ा राहणाऱ्या कमलाबाईंना तीन वर्षांत दिल्लीत पुरुषांचे किळसवाणे अनुभव आले. तेही रस्त्यावरचे मवाली, गुंड नाही तर चांगले सुशिक्षित व प्रौढ होते. तरीही एकटी स्त्री दिसली की तिच्याकडे पाहण्याची हीन वृत्ती त्यांनाही अनुभवायला आली. तेवढय़ात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने कुन्नूर येथील आहारशास्त्रातील संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेसाठी ‘साहाय्यक प्रमुख’ या पदासाठी अर्ज मागवले होते. कमलाबाईंनी लगेच अर्ज पाठवला आणि त्यांची नेमणूक झाल्याचंही पत्र आलं. कुन्नूर हे उत्तम हवा असलेलं तामिळनाडू राज्यातील एक रम्य गाव. म्हणूनच तिथे आय.सी.एम.आर. ने पाश्चर इन्स्टिटय़ूट व न्यूट्रिशन रिसर्च लॅब या दोन प्रयोगशाळा स्थापण्यासाठी या गावाची निवड केली. पाश्चर लॅबचे डायरेक्टर होते कर्नल अय्यंगार व न्यूट्रिशन लॅबचे डायरेक्टर होते डॉ. ऑक्रॉइड हे ब्रिटिश गृहस्थ. मार्च १९४२ मध्ये न्युट्रिशन रिसर्च लॅबच्या साहाय्यक संचालक या पदावर कमलाबाईंची नेमणूक झाली व त्या कुन्नूरला आल्या. थोडय़ाच दिवसांत डायरेक्टर अय्यंगार यांनी त्यांना लॅबच्या आवारातच मोठा बंगला भाडय़ाने मिळवून दिला. तिथे प्रयोगासाठी लागणाऱ्या प्राण्यांची व्यवस्था पाहणारे डॉ. कृष्णन, केमिकल टेस्टस् पाहणारे रंगनाथन व डॉ. स्वामीनाथन शिवाय तीन-चार स्कॉलर्स होते. म्हणजे सर्व पुरुष आणि कमलाबाई एकटय़ाच. पण या गोष्टीची त्यांना आता सवय झाली होती आणि प्रत्येक गोष्टीत पहिली स्त्री असण्याची किंमत चुकवावी लागत होती. त्यामुळे इथेही पुरुषांच्या अहंकाराला त्यांना तोंड द्यावं लागलं. पण ती पुढची गोष्ट.
इथे हजर झाल्यावर कामांनी वेग घेतला. त्यांनी प्रथम पोषणशास्त्रावर सपाटून वाचन केलं. त्यातूनच संशोधनासाठी विषय मिळत गेले. त्यात जीवनसत्त्व ‘ब’, ‘क’वरचे प्रयोग. एकदा वडिलांबरोबर कोल्हापूरला गेल्या असता तिथले कुस्तीगीर मूठभर हरभरे भिजवून गुळाबरोबर खाताना पाहिलं होतं. त्यामुळे शक्ती येतेच पण खेळताना लागलं तर रक्तस्राव होत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी हरभऱ्यावर प्रयोग करायचं ठरवलं. निरनिराळी द्रावणे वापरून, हरभऱ्यापासून द्राव तयार केले, त्यांचा गिनीपिगवर वापर केला. त्यांना जीवनसत्त्वविरहित आहार दिला. तेव्हा असं आढळून आलं की त्यांना रक्तस्राव होत होता. पण हरभऱ्याच्या द्रावाने तो कमी झाला. दुसऱ्या प्रयोगात गिनीपिग्जना समतोल आहार दिला व पाठीवर पंपाने जास्त दाब दिला तेव्हा रक्तस्राव झाला पण त्यांना जेव्हा पाणी वापरून केलेला हरभऱ्याचा द्राव दिला. तेव्हा रक्तस्राव झालाच नाही. म्हणजे या द्रावात शक्ती आहे. ती रक्तवाहिन्या मजबूत करते, असं आढळून आलं.
दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू होतं तेव्हा जवानांना जीवनसत्त्व ‘ब’ देता यावं म्हणून लॅबमध्ये तोरूला यीस्ट तयार करण्याचं काम सुरू करून त्याच्या गोळ्या बनवून आहाराबरोबर देण्यासाठी पाठवण्यात आल्या. मग शाळकरी मुलांसाठी खाऊ तयार करण्याचं काम सुरू झालं. त्या वेळी मलबारमध्ये टाटांची शेंगदाण्याचं तेल काढण्याची फॉक्टरी होती. तेल काढल्यावर जो चोथा शिल्लक राहतो त्यात ‘ब’ जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणावर असतं. त्यावर संस्करण करून कमलाबाईंनी शाळकरी मुलांना दिल्या जाणाऱ्या आहारात त्याचा वापर केला. डॉ. बीर राघवन त्याच सुमारास ‘राबीज’ची लस तयार करीत होते. त्यांना त्यासाठी ‘बायोटीन’ या ‘ब’ समूहातील जीवनसत्त्वाची गरज होती. पण ते बाजारात मिळत नव्हतं. कमलाबाईंनी बदकांच्या अंडय़ापासून ते तयार करून त्यांना दिलं.
पण इथे त्यांना पुरुषी अहंकाराचा प्रत्यय आलाच. वरिष्ठ कमी शिकलेले होते आणि तरीही उद्दामपणे वागत. शिवाय त्यांच्या संस्थेने त्यांची अर्हता मोठी असून त्यांना पदोन्नती दिली नाही. तरी कमलाबाईंचं काम तन्मयतेनं सुरू होतं. सुरुवातीला प्राण्यांवर, पण त्यांना माणसांवर संशोधन करण्याची संधी मिळाली ती सरकारी हॉस्पिटलमध्ये. एक ७-८ वर्षांचा मुलगा स्कव्‍‌र्ही रोगाने आजारी होता. डॉ. अनंतन् यांनी न्युट्रिशन लॅबला सल्ला विचारला. ‘क’ जीवनसत्त्व देऊनही त्याचा त्वचेखालचा रक्तस्राव थांबत नव्हता. कमलाबाईंनी मग आपला हरभऱ्यावरचा प्रयोग उपयोगात आणला. हरभऱ्यांना मोड आणून ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले व त्यात मीठ व िलबाचा रस घालून, दिवसातून दोनदा अर्धी अर्धी वाटी मुलाला खायला दिले. आणि चारच दिवसांत त्या मुलाचा रक्तस्राव आटोक्यात आला. हरभऱ्यातील अल्प प्रमाणातील जीवनसत्त्व ‘प’ व ‘क’ आणि िलबू रसातील जीवनसत्त्व ‘क’ यांच्यामुळे ही किमया घडून आली. मुलगा बरा झाला.
दुसरा प्रयोग कमलाबाईंनी आपल्या डॉक्टर आत्यावर केला. लष्करातील जवानांसाठी ‘ब’ जीवनसत्त्व कमी पडू नये म्हणून ‘तोरूला यीस्ट’ त्यांनी लॅबमध्ये तयार केलंच होतं. आत्या कृष्णाबाई फडके त्यांच्याकडे राहायला आल्या तेव्हा त्या डोळ्यांच्या आजाराने त्रस्त होत्या. कमलाबाईंनी आत्याला यीस्टची माहिती सांगितली. ‘या यीस्टमध्ये ‘ब’ समूहातील रायबोफ्लेव्हिनसह सर्व जीवनसत्त्वं आहेत. हे जीवनसत्त्व वनस्पतीपासून तयार केलेलं असल्याने नसíगक आहे हे तू घे.’ दिवसातून दोनदा चहाचा अर्धा चमचा यीस्ट पावडर आत्याला द्यायला सुरुवात केली. मुंबईला परतेपर्यंत आत्याचे डोळे पूर्ण बरे झाले होते.
स्वत:कडे गुणवत्ता आणि शिक्षण असून आपल्याला डावललं जातंय ते केवळ ‘स्त्री’ म्हणून हे कमलाबाईंच्या आता गंभीरपणे लक्षात येऊ लागलं, म्हणून त्यांच्या मनात राजीनाम्याचे विचार घोळू लागले. आणि आयुष्याला वळण देणारी अनपेक्षित घटना घडली.. एक दिवस लॅबमध्ये कामात असताना एक गृहस्थ त्यांना भेटायला आले, माधवराव सोहोनी. सोहोनींनी आपला व्यवसाय, शैक्षणिक, कौटुंबिक पाश्र्वभूमी सांगितली. आणि म्हटलं, ‘‘मी ‘विल्सन’चा आहे तेव्हापासून तुम्हाला ओळखतो. तुमच्या बुद्धिमत्तेचा, निश्चयी वृत्तीचा मी आदर करतो. माझ्याशी लग्न कराल का?’’ कमलाबाईंमधली विदुषी, शास्त्रज्ञ, संशोधक क्षणभर गप्प झाली. पण दुसऱ्याच क्षणी म्हणाली, ‘‘मी तुमची मागणी स्वीकारीन पण माझीही एक मागणी आहे. निव्वळ गृहिणी बनून राहणं जमणार नाही मला. संशोधनाचं काम सुरू ठेवायचं आहे.’’ अर्थात सोहोनींनी मागणी मान्य केली आणि ४ सप्टेंबर १९४७ रोजी कमला भागवत यांचा माधव सोहोनी यांच्याशी मुंबईत विवाह झाला. त्याचं वास्तव्य मुंबईतच शेवटपर्यंत होतं.
संशोधनाचं काम मुंबईत जोरदारपणे सुरू झालं. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील विज्ञानसंस्थेत जीवरसायनशास्त्राचा विभाग नव्याने उघडला. तिथे कमलाबाई १९ जून १९४९ ला विज्ञान संस्थेत रुजू झाल्या. म्युझियमसमोर या विभागाला स्वतंत्र जागा मिळाली आणि कमलाबाईंनी सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. आपल्या विद्यार्थ्यांना (एम.एस्सी.) त्या सहा-आठ महिने शिक्षण देऊन नंतर संशोधन करायला सांगत. दुसरे प्रो. डॉ. एन. पी. मगर होते. दोघांकडे दहा-दहा असे वीस विद्यार्थी होते. संशोधनाचे विषय होते. नीरा पेयाची पौष्टिक उपयुक्तता आणि कडधान्ये आणि त्यातील ट्रिप्सीन इन्हिबिटर्स. हाफकिन्स इन्स्टिटय़ूटची पुनर्रचना समितीतही डॉ. कमलाबाईंना घेतलं गेलं. बडोद्याच्या महाराज सयाजीराव विद्यापीठाने जीवरसायन विषयाचा नवा स्वतंत्र विभाग उभारला. त्यासाठी कमलाबाईंना बोलावण्यात आले. त्यामुळे त्यांना मुंबई बडोदा अशा वारंवार फेऱ्या माराव्या लागत. आपली दोन लहान मुलं सांभाळून त्या ही सारी धावपळ करीत. विज्ञानसंस्थेत असतानाच राट्रपती राजेंद्र प्रसाद आणि होमी भाभा यांनी संस्थेला भेट दिली. तेव्हा त्यांना नीरा या पेयावर संशोधन करायला सुचवलं गेलं. आणि काम सुरू झालं. खादी ग्रामोद्योग मंडळ पहाटे तीन वाजता नीरा पाठवत. ती घ्यायला प्रयोगशाळेत स्वत: बाई जात. विद्यार्थ्यांना सांगत नसत. हे संशोधन १०-१२ र्वष चाललं. त्याचे चांगले फायदे हाती लागले. त्याबद्दल डॉ. कमलाबाईंना सर्वोकृष्ट संशोधनाचं पदक राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते २९ एप्रिल १९६० साली मिळालं.
कमलाबाईंचं काम आणि त्यांची सचोटी, बुद्धिमत्ता सर्वाना ठाऊक होती मान्य होती, तरी विज्ञान संस्थेतल्या एक-दोन संचालकांनी त्यांना त्रास दिलाच. कमलाबाईंचा संचालक होण्याचा ज्येष्ठता क्रम असताना अनेक खटपटी लटपटी करून आधीच्या संचालकांनी स्वत:साठी चार र्वष एक्स्टेन्शन पदरात पाडून घेतलं. कमलाबाईंना चार र्वष संचालकपदापासून वंचित राहून आíथक नुकसान (पगार, पेन्शन) सोसावं लागलं, इतकंच नाही, तरी वरिष्ठांकडे कमलाबाईंच्या टेनिस खेळण्याची तक्रार केली गेली की, ‘मिसेस सोहोनी कामाच्या वेळात टेनिस खेळायला जातात. इन्स्टिटय़ूटच्या शिस्तीवर वाईट परिणाम होतो. त्यांना वॉìनग द्यावी.’ या पत्राची प्रत कमलाबाईंना जेव्हा मिळाली तेव्हा त्या संतापल्याच. ते पत्र घेऊन त्या सचिवांकडे गेल्या आणि म्हणाल्या, ‘‘कार्यालयीन वेळ सकाळी ११ ते ५ आहे. मी संध्याकाळी १५ मिनिटं लवकर जाते. पण सकाळी ८ वाजता म्हणजे रोज ३ तास लवकर येते. इतक्या वर्षांत एकही रजा घेतली नाही. सर्वात जास्त पेपर्स मी प्रसिद्ध केले. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना माझ्या हाताखाली एम.एस्सी., पीएच.डी. पदव्या मिळाल्या. त्यांना माझी १५ मिनिटं दिसली? आता यापुढे निषेध म्हणून ४ वाजताच जाईन. हा माझ्यावर अन्याय आहे. तुम्हाला जे पाहिजे ते करा.’’ नंतर खोडसाळपणानं दिलेलं ते पत्र मागे घेण्यात आलं.
पुढे कमलाबाई इन्स्टिटय़ूटच्या संचालक झाल्या. या पदाची धुरा नि:पक्षपाती बुद्धीने सांभाळून १८ जून १९६९ रोजी निवृत्त झाल्या. प्रख्यात शास्त्रीय संशोधन संस्थेच्या त्या पहिल्या स्त्री संचालक ठरल्या. त्यांनी इतिहास घडवला. कमलाबाईंचे काही विद्यार्थी आपल्या कर्तृत्वाने प्रसिद्धीस आले. आणि देशापरदेशात मोठय़ा हुद्दय़ावर काम करू लागले. एम. के. गायतोंडे यांनी वाल या कडधान्यामधील ट्रिप्सीन इनहिबीटर्सवर काम केलं, बी. व्ही. हातवळणे यांनी नीरा व ताडगुळावर संशोधन केलं, ए. व्ही. इनामदार यांनी कडधान्यातील प्रथिनांवर काम केलं, के. एस. आंबे यांनी आहार विषयक प्रयोग केले तर लता मानगे या कमलाबाईंच्या लाडक्या विद्यार्थिनीने त्यांच्या हाताखाली एम.एस्सी., पीएच.डी. केलं. पुढे कर्करोगावर संशोधन केलं. श्रीनिवास नेरूरकर यांनी एन्झाइम कायनेटिक्सवर संशोधन करून पीएच.डी. मिळवली. कमलाबाईंनी संशोधनासाठी मार्गदर्शन केलं ते एम.एस्सी. पदवीसाठी २५ विद्यार्थी आणि पीएच.डी. करिता १७ विद्यार्थी. कमलाबाईंच्या संशोधनात्मक प्रसिद्ध लेखांची संख्या १५५ इतकी आहे.
त्यांचे अनेक विद्यार्थी परदेशात गुरूचं नाव उज्ज्वल करीत आहेत. विद्यार्थ्यांना त्यांनी भरभरून आणि आपुलकीने प्रेमाने ज्ञान दिलं. निवृत्त झाल्यावरही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. ग्राहक मार्गदर्शन सोसायटी ऑफ इंडियासाठी काम करीत तिथेही अन्नातली भेसळ कशी ओळखायची यावरती शिबिरं घेतली. यावरती प्रात्यक्षिक देऊन खेडय़ापाडय़ात, शहरात सर्वसामान्य ग्राहकाला वापरता येईल अशी शोध पेटी तयार केली. विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण दिलं. १९७० पासून सतत त्या ग्राहक मार्गदर्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रथम चेअरपर्सन मग अध्यक्ष मग विश्वस्थ अशा जोडलेल्या होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय परिषदांना त्या जात असत. या संस्थेमध्ये काम करताना त्यांना पुन्हा पुरुषी अहंकाराचा विदारक अनुभव आला. ऑक्टोबर १९७६ मध्ये कौलालंपूर इथे परिषद होती, कमलाबाई प्रमुख वक्त्या. त्यांनी आपला वाचायचा पेपर पुढे पाठवून दिला. जाण्याची तयारी केली, जायच्या आदल्या दिवशी पोलीस मुख्यालयात त्यांना बोलावलं आणि कमलाबाईचा व्हिसा, तिकीट वगरे काढून घेण्यात आला. आणि त्यांच्या पासपोर्टवर ‘नॉट अलाऊड टू लीव्ह इंडिया’ असा शिक्का मारला. (जणू त्या गुन्हेगार होत्या)कमलाबाईंनी पोलिसांना कारण विचारलं तर म्हणाले, ‘आम्हाला वरून ऑर्डर्स आहेत.’ अपमानित होऊन त्या परतल्या. संस्थेची दुसरी कार्यकर्ती पुढे गेली होती तिने परिषदेत बाईंचं भाषण वाचलं. नंतर बाईंना समजलं एका केंद्रीय मंत्र्यांना परिषदेला जायचं होतं; परंतु त्यांना आमंत्रण नव्हतं. ‘मी नाही तर भारतातून कुणीच जाणार नाही.’ म्हणून हा खटाटोप आयत्या वेळी केला गेला. तेही जगप्रसिद्ध अशा शास्त्रज्ञ ‘स्त्री’च्या बाबतीत!
१९७८, १९८१ मध्ये मनिला, बँकॉक इथे ग्राहक संरक्षण परिषदांना कमलाबाई जाऊन आल्या. सरकारच्या अन्नभेसळ प्रतिबंध समितीवर त्यांना सल्लागार म्हणून नेमलं गेलं. यातूनच घरात मुलांना खाऊ करून देताना तो पोषक कसा होईल, यासाठी आहारशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी ‘आहारगाथा’ हे पुस्तक लिहिलं. दुर्गाबाई भागवतांप्रमाणे त्यांच्या या शास्त्रज्ञ बहिणीला स्वंयपाकघरात पाकशास्त्रावर प्रयोग करायला आवडत. माधवराव व कमलाबाईंना वाचनाचा छंद होता. पण बाईंना वीणकामचीही आवड. घरातल्या सर्वासाठी त्यांनी लोकरीचे कपडे घरीच विणले.
त्यांना माधवरावांची उत्तम साथ लाभली. एम.एस्सी. झालेले माधवराव ऑक्चुअरी म्हणजे विमातज्ज्ञ म्हणून काम करीत. पुढे ते खूप मोठय़ा पदावर राहिले. विमाकंपनीने अधिक उच्च शिक्षणासाठी (व्यवसायविषयक) त्यांना लंडनला पाठवलं. आयुर्वम्यिाचे मॅनेजिंग डायरेक्टर झाले. १९७२ला ते निवृत्त झाले. कमलाबाईंबरोबर घरातली कामं ते करीत. शिस्त, टापटीप, प्रामाणिकपणा हे त्यांचे गुण आणि प्रखर बुद्धिमत्ता त्यामुळे दोघांनीही आपआपले व्यवसाय उत्तम सांभाळले. कमलाबाईंचे दोन्ही मुलगे उत्तम शिकले आणि आपापल्या व्यवसायात उच्च पदावर पोहोचले. सुना-नातवंड यांनी त्यांचं घर भरून गेलं. २२ सप्टेंबर १९९५ ला माधवराव नागिणीच्या आजाराने वारले.
कमलाबाई निवृत्त झाल्यावर ग्राहक हिताचं काम करीतच होत्या. माधवरावांसारख्या गुणी, बुद्धिमान, प्रेमळ, जाणकार जोडीदाराबरोबर ४८ र्वष म्हणजे चार तपं अत्यंत सुखासमाधानात गेली. याबद्दल त्या स्वत:ला भाग्यवान समजत.
१९९७ मध्ये आयुष्याच्या अखेरीस कमला सोहोनी यांना विज्ञान क्षेत्रामध्ये उत्कृष्टता आणि त्यांच्या योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. भारतीय वैद्यकीय संशोधन खात्याने त्यांना सन्मानित करण्यासाठी एक खास कार्यक्रम दिल्ली इथे आयोजित केला. कमलाबाई सोहोनी यांच्या सन्मानार्थ खूप प्रेक्षक सभागृहात जमले होते. सर्वानी उभं राहून टाशांचा कडकडाटात त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हातात पुरस्कार घेऊन उभ्या असलेल्या कमलाबाई व्यासपीठावर कोसळल्या. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण अगदी थोडय़ा दिवसांत त्या गेल्याच. तारीख होती २६ सप्टेंबर १९९७. वयाच्या ८५ व्या वर्षी त्या अनंतात विलीन झाल्या; परंतु त्यांनी केलेल्या संशोधनाने त्या आजही आपल्यात आहेत, ही भावना सुखदायी वाटते.
कमला भागवत-सोहोनी यांचं भागवत घराणं साधी राहणी, उच्च विचारसरणी असं होतं. सर्वच माणसं बुद्धिमान. घेतलेलं काम उत्तमरीत्या तडीस नेणारी. कमलाबाईंचा जन्म १९११ सालचा म्हणजे त्यापूर्वी मागच्या पिढीतली त्यांची आजी मॅट्रिक झालेली, इंग्रजीवर प्रभुत्व असलेली होती. मुलींनी शिक्षण घेतलंच पाहिजे, त्यापूर्वी लग्न नाही, या ठाम विचारांची. त्यांच्या नाती त्यांना इंग्रजीबद्दलच्या शंका विचारीत. आत्या, काका घरातले सर्वच लोक उच्च शिक्षण घेतलेले.
दुर्गाबाई, कमलाबाई आणि विमलाबाई तिघीही बहिणी शिकल्या. विमला (जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनी) त्याही कमलाबाईंसारख्या बॅडिमटन उत्तम खेळत असत. या पाश्र्वभूमीवर कमलाबाईंनी केंब्रिजपर्यंत धडक मारली आणि प्रत्येक ठिकाणी आपला प्रथम क्रमांक कायम राखला. कसलीही प्रसिद्धीची हाव नाही. आयुष्यभर ज्ञानार्जन आणि विद्यार्थ्यांना प्रेमाने ज्ञान देणं यात त्या रमल्या. सरकारी नोकरीतही त्यांनी देशहित पाहिलं. कुणाचाही दबाव सहन न करता उत्तम काम केलं. या प्रखर बुद्धिमत्ता लाभलेल्या प्रेमळ कर्तव्यतत्पर शास्त्रज्ञ ‘स्त्री’ला माझे लाख लाख प्रणाम!
(संदर्भ – कमलाबाई सोहोनी यांच्या आठवणी – वसुमती धुरू)
madhuvanti.sapre@yahoo.com

First Published on June 18, 2016 1:51 am

Web Title: kamala sohonie distinguished scientist in india