News Flash

दुर्गाबाईंशी ऐसपैस खाद्यगप्पा

पण घरचा स्वयंपाक मात्र अजूनही स्त्रियांनाच करावा लागतो, रोजच!

अलीकडच्या काळात वेगवेगळ्या देशांतील विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, तेथील खाद्यसंस्कृती यांबद्दल वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, पुस्तकांमधून भरपूरच लिहिलं जातंय. स्वयंपाक करणं हा आता फक्त स्त्रियांचाच प्रांत राहिलेला नाही. जगभरचे पुरुषदेखील आता या प्रांतात फक्त उतरलेलेच नाहीत, तर जगभर नावाजले जाऊ लागलेत. वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. स्वयंपाक करणं हा आता प्रतिष्ठित व्यवसाय समजला जाऊ लागला आहे; पण घरचा स्वयंपाक मात्र अजूनही स्त्रियांनाच करावा लागतो, रोजच!

दुर्गाबाईंचा खाद्यविषय आवडता. त्यांच्याशी या विषयावर बोलणं म्हणजे एक सुरेख खाद्यमैफल असायची. एकदा असंच बोलणं सुरू होतं, बोलता बोलता बाई म्हणाल्या, ‘‘अगं, महाभारतातला नळराजा उत्कृष्ट स्वयंपाकी होता. भीम उत्तम स्वयंपाकी, म्हणूनच तो विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणून नोकरी करीत होता. नळराजाचं ‘नलपाकदर्पण’ पुस्तक आहे. त्याची झेरॉक्स आहे माझ्याकडे. मला त्याचं भाषांतर करून पुस्तक प्रसिद्ध करायचं होतं; पण राहूनच गेलंय ते. तू कर.’’

‘‘पण बाई, मला जेमतेम रामरक्षा येतेय, त्याशिवाय संस्कृत नाही येत.’’

‘‘कुणाकडून तरी भाषांतर करून घे, पण करच.’’

खूप प्रयत्नांनंतर डॉ. अनुराधा जामखेडकर यांनी त्याचे भाषांतर करून दिले. मी त्याला विस्तृत प्रस्तावना लिहिली आणि २०१४ मध्ये ते पुस्तक प्रसिद्ध झाले, पण बाई नव्हत्या तेव्हा. वाटलं, प्रस्तावना वाचून त्यांनी मला शाबासकीच दिली असती.

खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती याबद्दलच्या आमच्या गप्पा सुरू झाल्या त्या एशियाटिक लायब्ररीतील कॅन्टीनमध्ये बसून आपापले डबे खाताना. शाळा सुटल्यावर मधल्या सुट्टीतला डबा घेऊन जाणे बंदच झालं होतं. तेव्हा दुर्गाबाई म्हणाल्या होत्या, ‘‘बुद्धाने सांगून ठेवलंय, उपाशीपोटी अभ्यास चांगला होत नाही. डबा आणीत जा.’’ मग कॅन्टीनच्या टेबलावर बसून ‘तुम्ही आज काय आणलंत?’ ‘तू काय आणलंस?’ सुरू झालं. बाई एकदम सुगरण असल्याने बाईंच्या डब्यातलं खायला फार मजाच यायची.

एकदा मी बाईंच्या घरी गेले होते तर तिथे बाईंची पाठची बहीण डॉ. कमला सोहनी आल्या होत्या. त्या दोघी बहिणी म्हणजे तोडीस तोड. कमलाबाई म्हणजे जगप्रसिद्ध बायोकेमिस्ट. आरे मिल्क फॅक्टरीत तयार होणारं दूध गिऱ्हाईकापर्यंत पोचेपर्यंत नासून जात होते. ते दूध नासू नये म्हणून संशोधन करून बाईंनी त्यांना दिले. ‘आरे दूध’ने राज्य केले. आम्ही भेटलो तेव्हा यांची, फिरोज रानडे यांची नुकतीच बायपास सर्जरी झाली होती. डॉक्टरांनी तेलातुपाशिवायचा स्वयंपाक करायला सांगितला होता. फोडणीशिवायचा स्वयंपाक यांना मुळीच आवडायचा नाही. तेव्हा कमलाबाईंनी मला पथ्याच्या पदार्थाची गुरुकिल्लीच दिली. त्या म्हणाल्या, त्यांचा मुलगा लहान, ५-७ वर्षांचा असताना त्याच्या हृदयाचं दुखणं लक्षात आलं होतं; पण मुलगा इतका लहान की, इथल्या डॉक्टरांनी त्यावर शस्त्रक्रिया होणार नाही म्हणून सांगितलं. मग कमलाबाई मुलाला घेऊन लंडनला गेल्या. तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं, हा मुलगा अशक्त आहे. प्रकृती सुधारू दे. मग २-४ वर्षांनंतर करू या शस्त्रक्रिया. कमलाबाई मुलाला घेऊन मुंबईला आल्या. आहाराबद्दल संशोधन करून जेवणात फरक केला. दोनच वर्षांत मुलगा सशक्त झाला. त्या वेळी त्यांनी कोणता आहार दिला हेच मला सांगितलं, ‘‘त्यांना पातेल्यातली फोडणी दिसत नाही, तर तू कढईत, पातेल्यात तेल न घालता मोहरी, जिरं घाल, तडतडली की भाजी, वरण घाल. जेवायला वाढ. वर मोहरी, जिरं दिसलं की झालं तुझं काम!’’ भाजीचाही एक प्रकार सांगितला. फळभाज्यांच्या साली, पालेभाज्यांच्या देठांची सालं काढून, बारीक कापून भाजी करायची. खूप पौष्टिक. छान लागते. दुर्गाबाई म्हणाल्या, ‘‘आपल्या ऋ षिपंचमी वेळच्या भाजीचाच प्रकार झाला हा.’’

मी म्हटलं, ‘‘अशी भाजी मी खाल्लेय- सालांची, देठांची.’’

‘‘कुठं?’’

‘‘इम्फाळमध्ये. मणिपुरी लोकांची ही भाजी फार नाही आवडली, कारण तुम्ही सांगितली तशी नाही करायचे ते.’’ मी सांगितलं, ‘‘लग्न झाल्यावर खूप फिरलो. वर्षभर कोलकाता, साडेतीन र्वष मणिपूरचं इम्फाळ, तीन र्वष आसाममधलं शिलाँग, मग बारा र्वष दिल्ली, त्यानंतर चार र्वष अफगाणिस्तानातील काबूल, तिथले पदार्थ काही खाल्लेत पण सगळेच नाही खाल्ले.’’

‘‘का?’’

‘‘कारण मी शाकाहारी ना.’’

त्यानंतर मग आमच्या त्याबद्दलच्या भरपूरच गप्पा सुरू झाल्या. एकदा मी त्यांना म्हटलं, ‘‘माझ्या आईला सुरुवातीला काही र्वष भाकरी करता यायची नाही.’’ दुर्गाबाईंना आश्चर्यच वाटलं. एका मराठी बाईला भाकरी येत नाही म्हणजे काय?’’

मी सांगितलं, ‘माझी आई सोळा-सतरा वर्षांपर्यंत काशी-ग्वाल्हेरलाच होती. विवाहानंतर कोल्हापूरला आल्यावर काही वर्षांनी शिकली.’’

‘‘तुझ्या आईला भेटून तिकडची मेतकुटाची, इमरती (जिलेबीचा सुधारित, सुंदर पदार्थ) शिकून घेते.’’

माझी आई खोबऱ्याच्या वडय़ा किंवा बर्फी वगैरे कापताना सुरीला अत्तर लावायची. काय सुगंध यायचा! मी सांगितलं त्यांना. आणखी एक गंमत, विवाहानंतर आईचे सगळेच नातेवाईक, उत्तर हिंदुस्थानातले, लग्न- पुण्याला, त्या काळात इतक्या दूर येणं फार कठीण म्हणून लग्नानंतर आईवडील दिल्ली, इंदूर, ग्वाल्हेर, काशीला गेले. देवासला गेले. तिथे आईचे आजोबा राहायचे. ते देवास संस्थानचे दिवाण. मोठी असामी! त्यांनी आईला विचारलं, ‘तुझ्या नवऱ्याला कोणती मिठाई आवडते विचारून घे. महाराजाला सांगून करवून घेतो.’ आईने वडिलांना विचारलं. ते म्हणाले, ‘सारख्या सारख्या पोळ्या, पुऱ्या खाऊन कंटाळा आलाय. भाकरी करायला सांग.’ हे ऐकल्यावर रावजी म्हणाले, ‘ऐकलं होतं तुझा नवरा गरीब आहे, पण आता पटलं.’’

बाई हसून म्हणाल्या, ‘‘अगं, ज्या ज्या प्रांतात जे जे पिकतं, तेच त्यांचं खाणं असतं. तू तर कोल्हापूरहून दुसऱ्या टोकाला कलकत्त्याला गेलीस. कसं वाटलं?’’

‘‘वेगळंच जग होतं ते. मुंबईहून दोन रात्री रेल्वेत घालवून पहाटे, बंगालमध्ये पोचलो. दोन्ही बाजूंनी दूरवर भातशेती, नारळ, केळ्यांच्या बागा आणि प्रत्येक बैठय़ा घराच्या मागेपुढे तळं. त्यात मासे पकडायची जाळी लावलेली. सकाळी साडेदहाला हावडा स्थानकावर उतरलो.  प्रचंडच मोठं. तासभरानं घरी पोचलो. तर गल्लीत शिरताना प्रत्येक घरासमोर लोखंडाच्या बादलीतील शेगडीत दगडी कोळसे पेटत ठेवलेले. त्याचा धूर, वास नाकात भरला. तास-दोन तासांनी सगळ्या बाजूंनी उग्र वास. हा कसला वास? तर सरसोचं तेल तापत ठेवलेलं. ते वास अजून ती आठवण आली की स्पष्टपणे जाणवतात ते मला. मग कळलं की, सरसोचं तेल चांगलं तापल्यावर धूर निघतो, धूर गेला की मग तेलाला वास नाही येत.’’

‘‘त्यांची जेवणं उशिराच… सकाळचे बारा-साडेबारा झाले की आमच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या मालकाच्या घराकडून घर घर घर खट्… असे आवाज यायचे. मग कळले की, सकाळी उठल्या उठल्या पाण्यात लाल मिरच्या, हळकूंड भिजत घालायची. ती पाटय़ा-वरवंटय़ावर वाटायची, गुळगुळीत. रात्री साडेनऊ -दहाला घरमालकाचा आवाज, ‘खाबार की की खबोरा?’ म्हणजे जेवणाचं काम झालं?  मग घुरघुर आवाज. त्याशिवाय पाच फोरण- ही फोडणी. त्यात बडीशेप, मेथीदाणे, कलोंजी म्हणजे कांद्याचे बी, जिरं, मिरं. कोणी कोणी वाटणात मोहऱ्याही घालायचा. सरसोच्या तेलाचा धूर निघून गेल्यावर पाच फोरण, मग वाटण – मग भाज्या, त्या कमीच, मुख्य म्हणजे हर तऱ्हेचे मासे आणि भात हेच मुख्य जेवण. त्यांची आमटी मात्र मला खूप आवडते. हरभऱ्याच्या डाळीची ही आमटी. त्यात वाटण, पाच फोरण आणि नारळाचे छोटे छोटे तुकडे आणि हव्या तर वरून तळलेल्या हिरव्या सबंध मिरच्या. छानच लागते ती आमटी..’’

‘‘बंगालचे रसगुल्ले तर आता जगभर गेलेत बघ.’’

‘‘रसगुल्ले तर आहेतच, पण त्याचबरोबर चमचम म्हणजे गोड पदार्थ, फार छानच. शिवाय मिष्टी दोई तर अप्रतिमच. दूध थोडंसंच आटवून त्यात ताडीचा गूळ, तर कधी मध घालून विरजण लावतात, तेही मातीच्या छोटय़ा, मोठय़ा सुगडामध्ये. इतकं खरपूस दही, शिवाय त्याला मातीचा गंध. कोणी कोणी त्या दह्य़ाच्या भांडय़ाला थोडंसं वाफवतातदेखील, ते ‘बाफ’. असं दही कुठेच नाही खाल्लं. कलकत्त्याला गेल्या गेल्याच मला विरजणाला दही हवं म्हणून कोपऱ्यावरच्या दुकानात गेले. मला आंबट दही हवंय, म्हटल्यावर दुकानदार चिडलाच. म्हणाला, आमच्याकडचं दही मिष्टीच असतं. तेव्हा समजावून सांगितल्यावर दुकानदारानं आतून केळ्याच्या पानाच्या द्रोणात डावभर विरजण आणून दिलं बघा बाई..’’

‘‘आणि तिथलं पान खाणं म्हणजे तर..’’

‘‘तर हो. पान खाणं हा बंगाली संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक घरात विविध आकार, कलाकुसर केलेले पानाचे डबे असतात. एवढंच नाही, तर बाहेर जाताना प्रत्येक जण जवळ पानाची लहानशी डबी घेऊन जायचे. ऑफिसला जाताना पुरुषच काय, पण तरुण मुलीदेखील पानाच्या ठेल्यावर थांबून आपल्याजवळच्या डबीत पानं भरून घ्यायच्या. एक पान तोंडात ठेवून पटापटा चालू लागायच्या. हे बघून मी तर थक्क झाले होते. गरिबांच्या घरी साधेसुधे, तर श्रीमंताच्या घरी चांदीचे डबे, डब्या असायच्या. कुणाकडे गेलो की गेल्या गेल्या ‘पान खाबो?’ म्हणून विचारलं जायचं, मग गप्पा सुरू. अशी मजाच ती सगळी.’’

‘‘आणखी मजा सांग.’’

‘‘मजा म्हणा, माझी फजिती म्हणा. एकदा रानडे मला चौरंगी चौकातल्या एका भल्या मोठय़ा हॉटेलात जेवायला घेऊन गेले. मी बावचळूनच गेले. ते तसलं काही कधी कल्पनाही केली नव्हती, हिंदी चित्रपटांत पाहिलं होतं तेवढंच. एक अँग्लो इंडियन बाई माइकसमोर डुलत डुलत इंग्लिश गाणं म्हणत होती. कडक इस्त्रीचे झकपक पोशाख, डोक्यावर तुरा असलेली उंच टोपी घातलेल्यानं आमच्या समोरच्या टेबलावर प्लेट्स, ग्लासेसच नव्हे तर डाव्या बाजूला काटे, चमचे नीटपणाने मांडून ठेवले. पदार्थ आल्यावर मी हात पुढे केला.. ‘हा.. हा.. काटय़ा-चमचानं जेवायचं.’ पण मला काहीच माहीत नाही, मग रानडय़ांनी मला शिकवलं. कसंबसं जेवले; पण बाई, हाताने जेवण्याची मजा असते ती तेव्हा आलीच नाही. आता शिकलेय काटे-चमचे वापरायला, मजा घ्यायला.’’

‘‘अगदी बरोबर म्हणालीस. अन्नग्रहण फक्त जिभेनं, चवीनंच नसतं करायचं. तर स्वाद आणि स्पर्शानंदेखील अन्नाचा आनंद घ्यायचा असतो.’’

‘‘पण सर्वसामान्य बंगाली लोक हातानंच जेवायचे. फक्त अन्नग्रहणच नव्हे तर भाज्या विकत घेतानाचाही माझा असाच अनुभव आहे. पालेभाज्या, फळभाज्या हातात घेऊन, सर्व बाजूंनी पारखून घेण्यात जी मजा असते ती प्लास्टिकच्या पिशवीतल्या भाज्यात नाही येत.’’

‘‘आसाम व बंगालमध्ये फरक कितपत वाटला?’’

‘‘फारसा नाहीच. भात, मासे हेच मुख्य अन्न, पद्धतही तीच फोडणीसाठी, पाच फोरणही तेच. बंगाल्यांप्रमाणे आसामी उच्चवर्णीय लोक मांस खात नाहीत; पण मासे खातातच. त्याशिवाय त्यांना जेवणच जात नाही.’’

‘‘बरोबर आहे.’’ बाई म्हणाल्या. ‘‘पण मणिपूरचा- इम्फाळचा अनुभव वेगळाच ना?’’

‘‘अगदीच वेगळा. कमलाबाईंशी बोलताना मी सांगितली तशी फळभाज्यांच्या साली, पालेभाज्यांच्या देठांची भाजी मी खाल्ली आहे. त्यांच्याकडे मसाले अगदीच कमी. जेमतेम कांदा, आले, हिंग असंच. अनेक मणिपुरी लोक वैष्णव, त्यामुळे गाईचं दूध, दुधाच्या पदार्थाना खूप महत्त्व आहे. तिथला भाजीबाजार म्हणजे कलकत्त्याच्या भाजीबाजाराच्या पासंगालाही न पुरणारा. तिथले सगळे बाजार स्त्रियांच्या ताब्यात. स्त्री-राज्यच ना ते, महाभारत काळापासूनचं. म्हणून तो ‘नुपीबाजार’. ‘नुपी’ म्हणजे बाई. भाज्याही कमीच. वेगळ्याच. कमळाची देठं, कमळाच्या बिया-मकाणे हे प्रथमच तिथं बघितलं. त्यांच्या भाज्या मात्र मला आवडल्या, शिकलेदेखील. आमच्या बंगल्याभोवती खूप मोठी मोकळी जागा. तिथं मी बटाटे, मटार, मेथी लावली. ती झाडं वाढायला लागली, एवढा आनंद झाला. मग मी बटाटे, मटारच्या कोवळ्या पानांची भाजी केली. फारच छान लागते. त्या भाज्या मी आपल्या पद्धतीप्रमाणेच केल्या. कलकत्त्याला गेल्यावर एका गोष्टीचा फारच त्रास झाला. तिथली विळी म्हणजे लाकडी पाटावर बसवलेला कोयताच. मला काही त्या पाटावर बसून भाज्या चिरताच यायच्या नाहीत. सुरी वापरायला सुरुवात केली; पण सुरीची सवय व्हायला खूप वेळ लागला. आता तर मला आपल्याही विळीवर बसून चिरताच येत नाही. बाई, स्वयंपाक करताना भाजीपाले, अन्नधान्य, मसाले जेवढे महत्त्वाचे तेवढय़ाच महत्त्वाच्या वस्तू म्हणजे भांडीकुंडीदेखील. किती तरी मणिपुरी बायका मातीच्या मडक्यातच भात, भाज्या, मासे वगैरे शिजवायच्या.’’

‘‘आणि त्यांची चव वेगळीच असते बघ. आपली नेहमीचीच भाकरी; लोखंडाच्या तव्याऐवजी मातीच्या तव्यावर केलेल्या भाकरीची चव फार चांगलीच लागते.’’ दुर्गाबाई.

‘‘होय बाई, मीपण करून बघितलाय तो प्रयोग एकदा. मातीच्या तव्यावरची भाकरी काय, पोळी काय, चवीला रवाळ लागते. खरपूस आणि त्याला छान सुगंधही येतो.’’

‘‘त्यानंतर पूर्वेकडून तू एकदम उलटय़ा दिशेला राहिलीस, दिल्लीला. तिथलं खाणंपिणं, भाजीबाजार, मसाले, गोड पदार्थ..’’

‘‘ते म्हणजे दुसरं टोक होतं. भाजीबाजार म्हणजे भरमारच. शिवाय कोपऱ्या-कोपऱ्यावरचे भाजीवाले, हाऽऽऽ एवढा पसारा मांडून बसायचे. मुख्य म्हणजे भाजी घेऊन पैसे देऊन झाले की भाजीवाला ‘मसाला’ म्हणजे कोथिंबीर थोडीशी, सात-आठ हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा पिशवीत टाकायचे, यांचे पैसे घ्यायचे नाहीत! त्याला ‘घलुआ’ म्हणायचं. तीच गोष्ट दूधवाल्याची. मापानं दूध घालून झालं की र्अध माप ‘घलुआ’. हा प्रकार पहिल्यांदा आणि शेवटचाच पाहिला दिल्लीला. थंडीच्या दिवसांत तर फ्लॉवर, गाजरं, मटार, मुळेसारख्या भाज्या ढिगाढिगानं हातगाडीवरून विकायला यायच्या. गाजरं, मुळे तर इतके रसाळ की, चावा घेतला की रस गळायचा. पाहुणे आले की पाच-दहा किलो मटार घेऊन रात्री गप्पा मारता मारता सोलून दाणे पाठवून द्यायची. तिथल्या मटारांचा गोडपणा, रसाळ कोवळेपणा अगदीच विरळा. माझी एक मावशी राजस्थानात राहायची, तिथं भाज्यांची कमतरता असायची तेव्हा, तर तिनं शिकवलेल्या भाज्या फारच क्वचित कुणाला माहीत असणार. मटारच्या साली सोलून काढून सालींची भाजी, कोवळ्या भेंडीच्या देठांची परतून केलेली भाजी, तर फ्लॉवरचे देठ स्वच्छ धुऊन, लहान लहान तुकडे करून, फोडणीत धण्याजिऱ्याची पावडर टाकून परतायचे. तिखट, मीठ घालायचं आणि वाचता वाचता, गप्पांचा फड रंगला की ते देठ चावून चावून चोथा झाला की चोथा थुंकून टाकायचा. त्या भाज्या खाताना एवढी काय मजा यायची म्हणून सांगू बाई.’’

‘‘हे कधी ऐकलंही नव्हतं गं.’’

‘‘आणखी एक मजा. थंडीच्या दिवसांत गाजर, मुळ्यांना चाटमसाला लावून, लिंबू पिळून विकणाऱ्या हातगाडय़ा गल्लोगल्ली फिरायच्या. उन्हाळ्याच्या दिवसांत लाल रंगाच्या गाजरांचे काप करून, त्यांना खूप मोठय़ा माठातल्या पाण्यात भिजत घालायचं. लिंबू पिळायचं. त्या माठाला लाल फडकं गुंडाळलेलं. त्या रसाला ‘शिंकजी’ म्हणायचं. चविष्ट लागायचं ते पाणी. तिथली दुकानं सात वाजता बंद आणि तेव्हा टी.व्ही. वगैरेही नव्हताच. की मग जेवणं झाली रात्रीची की फिरायला बाहेर पडायचो आम्ही मुलांना घेऊन. गल्ल्यांतून मग हरतऱ्हेच्या गरम गरम मिठाया, गोलगप्पे म्हणजे पाणीपुरी खात खात फिरायचो. दिल्लीला एक तर भूकही खूप लागते. चांदणी चौक म्हणजे तर खवय्यांसाठी स्वर्गच. तिथली ‘पराठेवाली गल्ली’ तर जगप्रसिद्धच.’’

‘‘तिथे तुला आठ घडय़ांची पोळी मिळाली का?’’ दुर्गाबाईंची चौकशी.

‘‘मिळाली ना. भली मोठी पातळ पोळी लाटायची, त्यावर तेल नाही तर तूप पसरून लावायचं, त्यावर कणीक भुरभुरायची. मग त्या पोळीवर शंकरपाळ्यासारखे काप यायचे. ते एकावर एक ठेवून पोळी लाटून भाजली की झाली आठच काय हव्या तेवढय़ा घडय़ांची पोळी.’’

त्यावर दुर्गाबाई म्हणाल्या, ‘‘ती नव्हे, तो तर पराठाच झाला. मला यायची नाही, पण एकदा एका खेडेगावात गेले होते, तिथल्या बाईकडून शिकले मी. पण तिथला एखादा खास असा पराठा सांगतेस का? बटाटा, फ्लॉवर, मटार, पनीरचे पराठे माहीत आहेत, पण त्यापेक्षा वेगळा.’’

‘‘सांगते. शिकलेय मी. मैदा आणि कणीक सम प्रमाणात घेऊन त्यात तेल, मीठ हवं तर कलोंजी नाही तर काळे तीळ घालून पीठ भिजवून खूप मळून घ्यायचे, त्याची पातळ पोळी लाटायची. मग त्या पोळीची घट्ट गुंडाळी करायची. मग त्या गुंडाळीची वळकटी करायची. मग त्याचे पदर वर येतील असं बघून हलक्या हातानं लाटायचं, जरा जाडसरच. मंद आचेवर तव्यावर शेकून झाले की गॅसवर, खरं तर निखाऱ्यांवरच मंद आचेवर भाजायची. मग पोळपाटावर घेऊन दोन्ही हातांच्या ओंजळीत पकडून, दोन्ही बाजूंनी दाबायचं. की त्याचे पदर सुटतात, गोल गोल. त्यावर तूप, लोणी लावून खायचा हा पराठा. त्याला खस्ता पराठा म्हणतात. हा पराठा गरम गरम खाल्ला तर त्याच्याबरोबर लोणचं, भाजी, कबाब काहीही लागत नाही.’’

‘‘मला एकदा करून खायला घाल,’’ बाईंनी म्हटलं. मी अतिशय आनंदानं म्हटलं,‘‘नक्कीच.’’

प्रतिभा रानडे

ranadepratibha@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2017 1:19 am

Web Title: loksatta interview with durga bhagwat
Next Stories
1 मानसिक हिंसा
2 ‘मी सुद्धा’ची वाढती क्षेत्रं
3 पालकत्वाचे सार्वत्रिक आव्हान
Just Now!
X